Tokyo Olympic 2020 : भारताची पी व्ही सिंधू आणि जपानची यामागूची अकाने यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. क्रॉस स्मॅश, नेट जवळील खेळ अन् प्रदीर्घ रॅली यामुळे चाहत्यांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत गेली होती. दोन्ही खेळाडू प्रचंड थकलेल्या असूनही एकमेकांना कडवी टक्कर देत होते. त्यांचा अप्रतिम खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कमबॅक केले. सिंधूनं दोन गेम पॉईंट वाचवताना यामागूचीचा प्रत्येक वार पलटवून लावला. यावेळी सिंधूनं जपानच्या खेळाडूचीच रणनीती वापरत खेळ केला अन् उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला.
पहिल्या गेममध्ये यामागूचीनं नेट जवळचा खेळ करताना आघाडी घेतली होती, परंतु सिंधून स्वतःला सावरून जबरदस्त कमबॅक केले. रिओ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडू यामागूचीनंही सुसाट स्मॅशचा खेळ केला. पण, यामागूचीच्या प्रत्येक वार परतावून लावण्यासाठई रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती सिंधू सज्ज होती. सिंधूनं १३-९ अशी आघाडी मजबूत केली. पण, सिंधूकडून अनफोर्स एरर झाले अन् यामागूचीला कमबॅक करण्याचे बळ मिळाले. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅलीचा खेळ पाहायला मिळाला. सिंधूनं जपानच्या खेळाडूला संपूर्ण कोर्टवर नाचवले. यामागूचीनं हाफ स्मॅश चांगला खेळ केला, परंतु सिंधूनं पहिला गेम २१- १३ असा घेतला. ( QUARTER FINALS - Sindhu takes the 1st game 21-13) दुसऱ्या गेमचा पहिला पॉईंट सिंधून वेगवान स्मॅशनं घेतला, परंतु यामागूचीकडून तिला लगेच प्रत्युत्तर मिळाले. सिंधूकडून क्रॉस स्मॅशचा सुरेख खेळ झाला. यामागूच्या एररचाही सिंधूला फायदा झाला. सिंधू व यामागूची यांच्यात रॅलीचा चांगला खेळ रंगलेला पाहून बॅडमिंटन चाहते सुखावले होते. सिंधूनं यामागूचीचा फॉर्म्युला वापरत दमदार खेळ केला अन् जपानची खेळाडू दडपणाखाली गेलेली दिसली. सिंधूनं ११-६ अशी आघाडी घेतली. तिच्या या खेळाडू क्रॉस स्मॅशचा बहारदार होत गेला. जपानच्या खेळाडूची अवस्था पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले सहकारी खेळाडूही निराश झालेले दिसले. हिंदी कॉमेंटेटरचं एक वाक्य भारतीय पाठीराख्यांना सुखावत होतं अन् ते म्हणजे, 'सिंधूने अकाने को थकाने का मन बना लिया है!' यामागूचीनं ६ गुणांची पिछाडी तीननं कमी केली ( १५-१२). यामागूचीनं १५-१५ अशी बरोबरी मिळवून कमबॅक केला. ( Brutal, brutal rally. Both were exhausted by the end of it) प्रदीर्घ रॅलीमुळे दोन्ही खेळाडू थकलेल्या पाहायला मिळाल्या. यामागूचीनं १८-१६ अशी आघाडी घेतल्यानं सामन्याची रंजकता अधिक वाढली. पण, सिंधूनंही नेट जवळचा खेळ करताना गेम पुन्हा १८-१८ असा बरोबरीत आणला. यामागूची सामना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, तर सिंधू विजयासाठी टक्कर देत होती. मात्र दोन्ही खेळाडू प्रचंड थकल्या होत्या. यामागूची २०-१८ आघाडीवर असताना सिंधूनं दोन गेम मॅच पॉईंट वाचवले अन् २०-२० अशी बरोबरी घेतली. सिंधूनं सलग दोन गुण घेताना हा गेम २२-२० असा जिंकला अन् उपांत्य फेरीत प्रवेश केला.