Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहिया याला ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कडव्या झुंजीनंतर रशियाच्या रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. २३ वर्षीय रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्यानं मिळवलेलं हे यश सुवर्णपदकापेक्षा कमी नक्कीच नाही. त्यामुळेच रवीचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे. रवी कुमार दहियाच्या या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचे अभिनंदन केले. हरयाणा सरकारनं तर त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला. ( Tokyo Olympics: Wrestler Ravi Dahiya takes silver after losing final to Zavur Uguev)
दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली. रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली.
रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले आणि त्याला हार मानावी लागली.