Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यानं अंतिम फेरीत प्रवेश केला असून सुवर्ण पदकापासून तो आता फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे भारताचं बॅडमिंटनमधलं एक पदक निश्चित झालं आहे. अंतिम फेरीत प्रमोद भगतनं विजयी कामगिरी केली तर सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा होईल आणि पराभवाला समोरं जावं लागलं तरी रौप्य पदक निश्चित झालं आहे. वर्ल्ड नंबर वन प्रमोद भगत यानं सेमिफायनलमध्ये जपानच्या स्पर्धकाला मात देत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या फुजीहारा याच्यावर २१-११, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केला.
सेमीफायनलमध्ये प्रमोद भगत यानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पहिल्या दोन गेममध्ये अडखळत सुरुवात झाली होती. पण त्यानंतर प्रमोद भगत यानं संपूर्ण सामन्यावर अखेरपर्यंत पकड कायम ठेवली आणि फायनलमध्ये समावेश केला. प्रमोद भगत फायनलमध्ये दाखल होताच भारताच्या खात्यात १४ वं मेडल निश्चित झालं आहे.
मनोज सरकार कांस्य पदकासाठी खेळणारसेमीफायनलमध्ये भारताच्या मनोज सरकार याला ग्रेट ब्रिटनच्या स्पर्धकाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. सेमीफायनलमध्ये मनोज सरकारच्या पराभव झालेला असला तरी कांस्य पदकाची आशा अजूनही कायम आहे. प्रमोद भगतविरुद्ध पराभूत झालेल्या जपानी स्पर्धकाविरुद्ध मनोज सरकारला याला विजय प्राप्त करुन कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. तर प्रमोद भगत याचा सुवर्णपदकासाठीचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथहेल विरुद्ध होणार आहे.