जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर 21-14 21-17 असा विजय मिळवला. भारताचे हे बॅडमिंटनमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यापाठोपाठ मनोज सरकारनं कांस्यपदकाची लढत जिंकून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केलं. भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली. दुसरीकडे कृष्णा नागर यानं भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू कृष्णानं पुरुष एकेरी SH6 गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टीन कूम्ब्सचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.
कोण आहे प्रमोद भगत?बिहार येथील वैशाली गावातला त्याचा जन्म. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला अन् त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो ओडिसा येथे स्थायिक झाला. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्यानं पहिली स्पर्धा खेळली आणि प्रेक्षकांचा पाठींबा पाहून त्याला आणखी प्रेरणा मिळाली.