'सुशीलसाठी चाचणी पुढे नेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:56 AM2020-01-03T01:56:02+5:302020-01-03T01:56:13+5:30
भारतीय कुस्ती महासंघाने केले स्पष्ट; ऑलिम्पिकसाठी मिळू शकते संधी
नवी दिल्ली : दुखापतग्रस्त सुशील कुमार याने ७४ किलो फ्रीस्टाईल वजनगटासाठी शुक्रवारी होणारी चाचणी पुढे ढकलण्याची विनंती केली असली, तरी चाचणी पुढे ढकलणार नसल्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. या गटाची चाचणी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल. दोनदा आॅलिम्पिकचे वैयक्तिक पदक जिंकणाऱ्या सुशीलने हाताला दुखापत झाल्यामुळे चाचणीतून माघार घेतली. ७४ किलोची चाचणी पुुढे ढकलण्याची त्याने महासंघाला विनंती केली होती.
त्याला मात्र मार्चमध्ये टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठण्याची संधी मिळू शकते. चाचणीतील विजेता मल्ल रोम येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान रँकिंग सिरीजमध्ये, नवी दिल्लीत १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत व चीनमध्ये २७ ते २९ मार्च या कालावधीत होणाºया आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यांच्यानुसार सर्व गटाची चाचणी शुक्रवारीच होईल. ते पुढे म्हणाले, ‘चाचणीचे आयोजन टाळता येणार नाही. आमच्याकडे ७४ किलो गटात लढणारे मल्ल आहेत. सुशील दुखापतग्रस्त झाला असेल, तर आम्हाला पुढचा मार्ग शोधावाच
लागेल.’
पुरुष फ्री स्टाईलमध्ये रवी दहिया(५७ किलो), बजरंग (६५) व दीपक पुनिया (८६) तसेच महिलांमध्ये विनेश फोगाट (५३) यांनी नूर सुल्तानमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये टोकियो आॅलिम्पिकसाठी कोटा मिळविला. रवी, दीपक व विनेश यांना चाचणीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. या गटातील लढती केवळ रोम व नवी दिल्ली येथील स्पर्धांसाठी होतील. कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले, ‘मार्चमध्ये होणाºया आशियाई पात्रता फेरीसाठी दमदार मल्ल नसल्याचे महासंघाला वाटले तरच सुशीलला चाचणीची संधी मिळेल.’ सुशील पुनरागमनासाठी संघर्ष करीत असून रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव्ह यांच्या मार्गदर्शनात सराव करतोय.