अमरावती : अभ्यासा इंग्लिश स्कूलचा तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी स्वराज गिरीने सीबीएसईमार्फत आयोजित स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविली. स्केटिंगमध्ये असा बहुमान मिळविणारा तो अमरावतीतून व सात वर्षे वयोगटात विदर्भातून पहिला खेळाडू असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या प्राचार्य कांचनमाला गावंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. सीबीएसई (दिल्ली) मार्फत बेळगाव (कर्नाटक) येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देश-विदेशातील विद्यार्थी सहभागी होऊन त्यांचे क्रीडानैपुण्य दाखवतात. याच स्पर्धेत स्पीड स्केटिंग (५०० मीटर व १००० मीटर) या दोन्ही क्रीडाप्रकारांत स्वराजने या स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदके मिळविली. या स्पर्धेत नऊ झोनमधील उत्तम खेळाडू उतरले होते. यामध्ये गल्फ झोन, दुबई, नेपाळ, अंदमान निकोबार आदी ठिकाणांवरून खेळाडू सहभागी झाले होते. स्वराजचा स्केट स्पीड हा प्रति तास ४० किलोमीटर आहे. त्याने ५०० मीटर स्पर्धा ही ५८ सेकंदांत पूर्ण केली, तर १००० मीटर अंतर २ मिनिटे ४ सेकंदात पार केले. त्याला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी वाइल्ड कार्ड मिळाले आहे. राष्ट्रीय स्केटिंग फेडरेशनचे निवडकर्ते पी.के. सिंह यावेळी उपस्थित होते.पत्रपरिषदेला अभ्यासा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे, प्राचार्य कांचनमाला पाटील, अॅकेडमिक हेड श्रीलता राव, प्रशिक्षक अनुज परतानी उपस्थित होते. स्वराजच्या यशाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.
अभ्यासा शाळेच्या स्वराजला दोन सुवर्णपदके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 6:38 PM