खेळाडूंमधील अंडरस्टॅँडिंग हीच यशाची गुरुकिल्ली : धोनी
By admin | Published: April 22, 2015 03:04 AM2015-04-22T03:04:20+5:302015-04-22T03:04:20+5:30
चेन्नई सुपर किंग्ज संघातील सिनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंमध्ये असलेले चांगले ‘अंडरस्टँडिंग’ हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.
बंगळुरू : चेन्नई सुपर किंग्ज संघातील सिनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंमध्ये असलेले चांगले ‘अंडरस्टँडिंग’ हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.
संघाच्या मुख्य प्रायोजक असलेल्या एका आयटी कंपनीद्वारा आयोजित कार्यक्रमात धोनी म्हणाला, ‘‘आमच्या खेळाडूंचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सहयोगी स्टाफच्या मदतीने संघात चांगला ताळमेळ जमला आहे.’’ इतर संघांप्रमाणे चेन्नईकडून एखादा युवा खेळाडू चमकताना का दिसत नाही, असे विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘सीएसकेने युवा खेळाडूंना नेहमीच संधी दिली आहे.
रवींद्र जडेजा, ईश्वर पांडे आणि मोहित शर्मा हे सीएसकेचे युवा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करीत आहेत. परंतु युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून अनुभवी खेळाडूंना बाहेर बसवू शकत नाही. युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ब्रँडन मॅक्युलमसारख्या खेळाडूला बाहेर बसविण्याचा धोका घेऊ शकत नाही. संघातील सुरेश रैना, माईक हसी यांसारख्या खेळाडूंकडून युवा खेळाडू शिकत आहेत.’’
मुलगी जीवाबद्दल विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘ज्या वेळी तिचा जन्म झाला तेव्हा मी भारतात नव्हतो. मी तिला पाहू शकलो नव्हतो. हा आयुष्यातील खडतर काळ होता. मुलांचा जन्म आयुष्य बदलवून टाकतो.’’ (वृत्तसंस्था)