ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी करणं योग्य नसल्याचं मत विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या सगळ्या प्रकारांमध्ये विराट कोहली अत्यंत फॉर्ममध्ये असून तो सध्या आयपीएलदेखील गाजवत आहे.
वर्ल्ड टी - 20 मध्ये विराट कोहलीने मॅन ऑफ दी टूर्नामेंटचा किताब पटकावला तर यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने दोन शतकं झळकावली आहेत, तसेच 561 धावा फटकावत सर्वाधिक धावा फटकावणारा यंदाचा फलंदाज तोच आहे. अर्थात हे सगळं असलं तरी त्याची सचिनशी तुलना करू नये असं मत सेहवागनं व्यक्त केलं आहे. दोन खेळाडुंची तुलना करणं अयोग्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
लोक माझी तुलना सचिनशी करायचे, माझी तुलना रिचर्ड्सशी करायचे, जे योग्य नाही असंही त्यानं पुढं म्हटलं आहे. काळ वेगळा असतो, त्यामुळे तुलना अयोग्य ठरते असंही त्यानं स्पष्ट केलं आहे. सेहवाग सध्या किंग्ज 11 पंजाबचा मेंटॉर असून, त्यानं विराट कोहलीचं वर्णन सध्याचा सगळ्यात जास्त खतरनाक खेळाडू असं केलं आहे.