कोण ठरणार ‘महाराष्ट्र केसरी’?; कुस्तीप्रेमींची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:06 AM2020-01-03T02:06:43+5:302020-01-03T07:09:02+5:30
आजपासून थरारक लढती, अभिजित कटकेवर लक्ष
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण असणार, याबाबत राज्यभरातील कुस्तीच्या चाहत्यांसह तमाम क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. शुक्रवारपासून पुण्याच्या म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाची गदा पटकावण्यासाठी अनेक दिग्गज मल्ल आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत.
७ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेसाठीची तयार पूर्ण झाली असून मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत माती आणि गादीवरील (मॅट) प्रत्येकी १० अशा एकूण २० वजन गटांमध्ये लढती होतील. स्पर्धेत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असे दहा वजनी गट आहेत. राज्याच्या विविध भागांतील सुमारे ९५० मल्ल आणि १२५ पंच या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून ५७ तसेच ७९ किलो वजन गटातील लढतींद्वारे स्पर्धेला सुरुवात हाईल. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार महेश लांडगे, संग्राम थोपटे, सुनील शेळके, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, सुधीर मोरे, अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
गुरूवारी स्पर्धास्थळी पदकांचे अनावरण बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते झाले, तसेच दिवसभरात पंचांचे दोन उजळणी सत्र झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुस्ती लढणाऱ्या सुमारे २०० मल्लांची वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती राहतील.
असा तयार केला आखाडा...
मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखडे बनविण्यात आले. या मातीत १ हजार लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक व ६० लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झालेत. मल्लांना स्पर्शांतून, जखमांतून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण न होण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चार आखडे बनविण्यात आलेत. आखाड्यांचा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फूट भाग मल्लांच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
र्अिभजित कटकेवर लक्ष
पुण्याचा अभिजित कटकेवर कुस्तीप्रेमींचे विशेष लक्ष असेल. तो दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविण्याच्या इराद्याने लढेल. २०१७ मध्ये महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर २०१८ मध्ये मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत बुलडाण्याचा बाला रफिक शेखने त्याला धक्का दिला होता. बाला रफिक आणि २०१७ चा उपविजेता किरण भगत दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अभिजितच्या दुसºया किताबाची उत्सुकता आहे.