पत्नीने दिलेली हॅट ठरली ‘लकी’, मनीष नरवालला सुवर्ण, सिंहराज अडानाला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 05:33 AM2021-09-05T05:33:07+5:302021-09-05T05:33:39+5:30
पॅरालिम्पिक नेमबाजीत डबल धमाका
सिंहराज अडाना यांनी फायनलमध्ये पत्नीने दिलेली हॅट घातली होती. ही हॅट आपल्यासाठी फार लकी असल्याचे त्यांनी दुसरे स्थान घेतल्यानंतर सांगितले. सिंहराजचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सेनेत काम केले. सिंहराज हे बालपणापासून गरीब मुलांचे शिक्षण आणि दिव्यांगांच्या अधिकारासाठी झटत आहेत. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी नेमबाजी सुरू केली. त्यासाठी ४० किलोमीटर दूर असलेल्या नेमबाजी रेंजवर सराव करायचे. राष्ट्रीय कोच सुभाष राणा हे त्यांचे मार्गदर्शक. लॉकडाऊन काळात सिंहराज यांनी घरीच रेंज बनवून सराव केला.
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये शनिवारी भारतीय नेमबाजांनी डबल धमाका केला. मनीष नरवाल आणि सिंहराज अडाना यांनी पी४ मिश्र ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविले. पात्रता फेरीत सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह भारताच्या पदकांची संख्या १५ झाली. त्यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षांच्या सिंहराजचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्य जिंकले होते. विश्वविक्रमाचा मानकरी असलेल्या १९ वर्षांच्या नरवालने २१८.२ गुण मिळवीत विक्रम केला, तर सिंहराजने २१६.७ गुणांसह रौप्य जिंकले. हे दोन्ही नेमबाज फरिदाबादचे आहेत.
मनीषला सहा, सिंहराजला चार कोटी मिळणार
हरियाणा सरकारने फरिदाबादचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण विजेता मनीष नरवाल याला सहा कोटी तर रौप्य विजेता सिंहराज अडाना याला चार कोटी रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे.
मनीषला बनायचे होते फुटबॉलपटू
मनीष नरवालला बालपणापासून खेळाची आवड होती. त्याला फुटबॉलपटू बनायचे होते. उजव्या हाताला अपंगत्व असल्याने त्याचे स्वप्न भंगले. त्याचे पहिलवान वडील दिलबाग यांनी प्रयत्नपूर्वक दिव्यांग मुलाला २०१६ ला राकेश ठाकूर या नेमबाजी कोचच्या स्वाधीन केले. तेथे मनीषने मेहनत घेतली. पॅरालिम्पिकबाबत त्याला कोच जयप्रकाश नौटियाल यांनी माहिती दिली. २०१७ च्या बँकॉक विश्वचषकात मनीषने वैयक्तिक सुवर्ण जिंकले.