नवी दिल्ली : गुडघ्याच्या जखमेमुळे सध्याची विजेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये माघार घेतली, पण यामुळे पदकाचा मार्ग सोपा होणार नाही. महिला सर्किटमध्ये अव्वल दहा खेळाडूंना सारखाच स्तर असल्यामुळे पदक जिंकणे सोपे नाही, याची आपल्याला जाणीव असल्याचे मत अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने व्यक्त केले.साईद्वारा आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सिंधू म्हणाली,‘एक खेळाडू खेळणार नसेल तर स्पर्धा सोपी होते, असे नव्हे. ताय ज्यु यिंग, रतनाचोक इंतानोन, नोजोमी ओकुहारा आणि अकेनी यामागुची यांच्यासारखे अव्वल दर्जाचे खेळाडू असल्यामुळे जेतेपदासाठी मला स्वत:च्या सर्वात्कृष्ट कामगिरीवर भर द्यावा लागेल. त्यादृष्टीने नवे कौशल्य आणि तंत्रावर भर देत आहे. कोरोनामुळे जी विश्रांती मिळाली त्या काळात खेळातील उणिवा दूर करणे शक्य झाले, शिवाय नवीन गोष्टीदेखील शिकता आल्या.’२०१६ च्या ऑलिम्पिक फायनल आणि २०१७ च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधू मारिनकडून पराभूत झाली होती. याविषयी सिंधू म्हणाली,‘रतनाचोक ही फारच कौशल्यपूर्ण खेळ करीत असल्याने धोकादायक आहे. त्यामुळेच मी विश्रांतीचा काळ कौशल्यविकास करण्यासाठी खर्ची घातला. आगामी ऑलिम्पिकदरम्यान माझ्याकडे नवे कौशल्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूला कमकुवत मानून चालणार नाही. अनेकांसोबत काही महिन्यापासून खेळलो नसल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये परिस्थिती फार वेगळी राहणार आहे.‘मी नेहमी आक्रमक खेळ पसंत करते. आक्रमण ही माझ्या मजेची बाजू असल्याने प्रत्येक स्ट्रोक आणि बचावासाठीही सज्ज राहावे लागेल. हैदराबादच्या गाचीबावली स्टेडियममध्ये सराव करणे ही आदर्श तयारी असेल. यामुळे मोठ्या स्टेडियममध्ये खेळत असल्याचा भास होतो. आपल्याकडे असलेल्या सोयीसुविधांचा योग्य लाभ घेणे कधीही चांगले असते’,असे सिंधूने एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.‘सायना, श्रीकांत हवे होते’पात्रता फेरी रद्द झाल्यामुळे सहकारी खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांची ऑलिम्पिक संधी हुकली. यावर सहानुभूती दाखवीत सिंधू म्हणाली,‘दोघेही टोकियोत असते तर फार बरे झाले असते. अशी स्थिती ओढवेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. प्रत्येकाने आपल्यानुसार सर्वाेत्कृष्ट प्रयत्न केले. मात्र खेळाडूची सुरक्षा लक्षात घेता दुर्दैवाने स्पर्धा रद्द झाली.
ऑलिम्पिक पदक जिंकणे साेपे नाही- पी.व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 6:02 AM