नवी दिल्ली : अनुभवी एल. सरिता देवीने (६० किलो) भारताच्या १० सदस्यांच्या बलाढ्य बॉक्सिंग संघात स्थान मिळवले तर पाच महिला बॉक्सर्स महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणार आहेत.सरिता विश्व चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या व्यतिरिक्त इंडिया ओपनची सुवर्णपदक विजेती नीरज (५७ किलो) आणि जमुना बोरो (५४ किलो) यांनी संघात स्थान मिळवले. पथकाचे नेतृत्व सहा वेळची विश्वविजेती एम.सी. मेरीकोम(५१ किलो) करणार आहे. गेल्या महिन्यातील कामगिरीच्या आधारावर बुधवारी तिची चाचणीविना निवड करण्यात आली.मंजू राणी (४८ किलो), जमुना, नीरज, मंजू बोम्बोरिया (६४ किलो) आणि नंदिनी (८९ किलो) प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.निकहत जरीने बुधवारी मेरीकोमची निवड चाचणीविना करण्यात आल्यामुळे टीका केली होती आणि म्हटले होते की, तिला मंगळवारी चाचणी लढतीत सहभागी होण्यापासून रोखले होते. विश्व चॅम्पियनशिपची कांस्य विजेती लवलीना बोरगोहेन (६९ किलो) हिचीही चाचणीविना निवड झाली. निवड चाचणी गुरुवारी संपली. विश्व चॅम्पियनशिप ३ ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. आठवेळच्या आशियाई पदकविजेत्या सरिता देवीने गेल्या वर्षीची विश्व कांस्यपदक विजेत्या सिमरनजित कौरचा पराभव करीत आपले स्थान निश्चित केले. सिमरनजितने गेल्या महिन्यात प्रेसिडेंट््स कपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या आठवड्यात उमाखानोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हरियाणाची बॉक्सर नीरजने कामगिरीत सातत्य राखताना आशियाई चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेता मनीषा मोऊनचा पराभव करीत ५७ किलो वजन गटात आपले स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)भारतीय संघमंजू राणी (४८ किलो), एम.सी. मेरीकोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो), नीरज (५७ किलो), सरिता देवी (६० किलो), मंजू बोम्बोरिया (६४ किलो), लवलीना बोरगोहेन (६९ किलो), स्विटी बुरा (७५ किलो), नंदिनी (८१ किलो), कविता चहल (८१ किलोपेक्षा अधिक).
महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप: भारतीय संघात सरिता, मेरीकोम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:57 AM