मेरीकोमने उपांत्य फेरीसह निश्चित केले सातवे पदक; लवलिना बोरगोहेनचीही विजयी आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:40 AM2018-11-21T00:40:08+5:302018-11-21T00:41:05+5:30
नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार व पाच वेळा जेतेपदाचा मान मिळवणारी एम. सी. मेरीकोम (४८ किलो) हिच्यासह लवलिना बोरगोहेन ...
नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार व पाच वेळा जेतेपदाचा मान मिळवणारी एम. सी. मेरीकोम (४८ किलो) हिच्यासह लवलिना बोरगोहेन (६९ किलो) यांनी मंगळवारी येथे सुरू असलेल्या दहाव्या एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह दोघींचे पदक निश्चित झाले असून मेरीकोमने या स्पर्धेतील विक्रमी सातवे पदक पक्के केले.
युवा बॉक्सर मनीषा मौन (५४ किलो) हिला मात्र २०१६ च्या विश्व चॅम्पियनशिपच्या रौप्यपदक विजेत्या स्टोयका पेट्रोव्हाविरुद्ध १-४ ने तर भाग्यवती काचरीला (८१ किलो) कोलंबियाच्या जेसिका पी.सी. सिनिस्टराविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला.
मेरीकोमने दिवसाची सुरुवात उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या यु वूविरुद्ध ५-० विजयाने केली. आता उपांत्य फेरीत मेरीकोमला उत्तर कोरियाच्या हयांग मी किमच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तीन राऊंडमध्ये पाच जजेसने मेरीकोमच्या बाजूने ४९-४६, ५०-४५, ४९-४६ असे गुण बहाल केले.
आसामच्या २१ वर्षीय लवलिनाने आक्रमक खेळ करताना आॅस्ट्रेलियाच्या ३४ वर्षीय काये फ्रांसेस स्कॉटचा ५-० ने पराभव करीत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. २२ नोव्हेंबर रोजी लवलिनाना उपांत्य फेरीत चिनी ताइपेच्या चेन निएन चिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पाच जजेसने लवलिनाला ३०-२७, २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असे अंक दिले. (वृत्तसंस्था)
लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती मेरीकोमने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना चीनच्या बॉक्सर्सला स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. तिच्या ठोशाला यू वूकडे कुठले प्रत्युत्तर नव्हते.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहा पदक जिंकणारी मेरीकोम आत्ममश्गुलता टाळण्यास प्रयत्नशील आहे. ती एकावेळी एकाच लढतीवर लक्ष केंद्रित करीत आहे. लढतीनंतर प्रतिक्रिया देताना मेरीकोम म्हणाली, ‘ही लढत सोपीही नव्हती आणि कठीणही नव्हती. मी रिंगमध्ये लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेते. त्याचा लाभ मिळला. चीनची बॉक्सर मजबूत आहे, पण तिच्याविरुद्ध मी प्रथमच खेळले.’
लवलिनासाठी ही शानदार कामगिरी आहे. तिने आपल्या पदार्पणाच्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक निश्चित केले आहे, पण ती सुवर्णपदकाशिवाय कुठल्याही पदकावर समाधान मानण्यास तयार नाही.
दुपारच्या सत्रात भारताची मनीषा रिंगमध्ये उतरली. ती अव्वल मानांकित खेळाडूच्या तुलनेत अनुभवात कमी पडली. बल्गेरियाच्या बॉक्सरने मनीषावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. काही शानदार पंच लगावत तिने मनीषाला कुठली संधी दिली नाही. बँथमवेट बॉक्सर मनीषाला सुरुवातीपासून ड्रॉमध्ये कडव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळावे लागले.
यतिरिक्त सोनिया (५७ किलो), सिमरनजीत कौर (६४ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. भारताची विश्व चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम कामगिरी २००६ साली होती. त्यावेळी भारताने चार सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण ८ पदके पटकावली होती.
फिनलँडच्या अव्वल मानांकित व आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मीरा पोटकोनेनला धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. तिला थायलंडच्या सुदापोर्न सिसोंदीविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला.