नवी दिल्ली : भारताच्या कोनेरू हम्पीने येथे महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध आर्मेगेडन गेम बरोबरीत सोडविल्यानंतर जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३२ वर्षीय भारतीय खेळाडूने चीनच्या आणखी एक खेळाडू टांग झोंगयीविरुद्ध चमकदार पुनरागमन करीत १२ व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यामुळे तिला टिंगजीविरुद्ध टायब्रेकर खेळावा लागला.बाळाला जन्मदिल्यानंतर २०१६ ते २०१८ या दोन वर्षांच्या कालावधीत ब्रेक घेणाऱ्या हम्पीने फिडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,‘ज्यावेळी मी तिसºया दिवशी आपला पहिला गेम सुरू केला त्यावेळी मी अव्वल स्थानी राहील, असा विचार केला नव्हता. मी अव्वल तीनमध्ये राहण्याबाबत आशावादी होते. तसेच टायब्रेक गेम खेळण्याचाही विचार केला नव्हता. पहिला गेम गमावल्यानंतर मी दुसºया गेममध्ये पुनरागमन केले. धाडसी खेळ करत मी यामध्ये विजय मिळवला. अखेरच्या गेममध्ये चांगल्या स्थितीत होते आणि त्यानंतर मी सहज विजय नोंदवला.’ हम्पीने एकूण ९ गुणांची कमाई केल्यामुळे तिला टिंगजी व तुर्कीच्या एकेटरिना अटालिकची बरोबरी साधता आली.हम्पीने पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ४.५ गुणांची कमाई करीत चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर रशियाच्या इरिना बुलमागाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे पिछाडीवर पडली. हम्पीला दमदार पुनरागमनाची गरज होती आणि तिने अखेरच्या दोन फेºयांमध्ये विजय मिळवला.दरम्यान, भारताच्या या दिग्गज खेळाडूला नशिबाची साथही आवश्यक होती. त्यात टिंगजी अटालिकविरुद्ध पराभूत होणे आवश्यक होते व तेच घडले. अखेर ही रंगतदार नाट्यमय लढत येथेच संपली नाही कारण हम्पीने पहिला टायब्रेक गेम गमावल्यानंतर दुसºयामध्ये विजय मिळवत आर्मेगेडनमध्ये दाखल झाली. (वृत्तसंस्था)हम्पीने काळ्या सोंगट्यासह खेळताना तिसरा गेम बरोबरीत रोखला. ही बरोबरीच निर्णायक ठरली, कारण यानंतर सुवर्णपदक पटकावण्यासाठी हम्पीला ड्रॉ पुरेसा ठरणार होता. हम्पीच्या या धडाक्यापुढे टिंगजीला रौप्य, तर अटालिकला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.भारतीय बुद्धिबळ स्टार विश्वनाथन आनंदने २०१७ मध्ये खुल्या गटात या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्याचवेळी, हम्पी सध्याच्या प्रारुपामध्ये रॅपिड सुवर्णपदक जिंकणारी केवळ दुसरी भारतीय ठरली आहे.नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने १५ फेºयांमध्ये ११.५ गुणांची कमाई करीत खुल्या गटात पुरुषांमध्ये जेतेपद पटकावले. इराणचा स्टार फिरौजा अलीरेजा फिडे ध्वजांतर्गत खेळला. त्याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पिछाडीवर टाकत रौप्यपदक पटकावले.
महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ: ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी बनली विश्वविजेती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 3:03 AM