कोलकाता : निवडणुका पार पडल्यानंतर जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय महासंघावरील बंदी गुरुवारी मागे घेतली.जागतिक तिरंदाजी महासंघाने एका वृत्तात, ‘भारतीय महासंघ जागतिक तिरंदाजीची घटना आणि नियमांचे पालन करून चांगले प्रशासन देईल,’ असा विश्वास व्यक्त केला. भारतीय तिरंदाजांना निलंबनामुळे आशियाई अजिंक्यपदमध्ये त्रयस्थ ध्वजाखाली खेळावे लागले होते. आता हे खेळाडू तिंरग्याखाली खेळू शकतील. भारताला पुढील स्पर्धा तीन आठवड्यांच्या आत लॉस वेगास येथे विश्व इनडोअर सिरिज खेळावी लागणार आहे.केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना मागच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष निवडण्यात आले. एएआयचे माजी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांच्या मदतीने मुंडा यांनी बीव्हीपी राव यांचा ३४-१८ अशा मतफरकाने पराभव केला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे निवडणूक झाल्याने प्रथमच विरोधी गट एकमेकांपुढे आले होते. जागतिक तिरंदाजी महासंघाने या निवडणुकीसाठी पर्यवेक्षकही पाठविला होता. (वृत्तसंस्था)
भारतावरील बंदी घेतली मागे, जागतिक तिरंदाजी महासंघाने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:48 AM