दोहा : पहिल्याच सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय फुटबॉल संघापुढे फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मंगळवारी आशियाई चॅम्पियन कतारचे कडवे आव्हान असेल.
ओमानविरुद्ध गुवाहाटीत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या लढतीत सुरुवातीच्या आघाडीनंतरही अखरेच्या आठ मिनिटात पकड शिथिल केल्याने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. २०२२ च्या विश्वचषकाचा यजमान असलेल्या कतारने गेल्या काही वर्षांत खेळात लक्षणीय सुधारणा घडवून आणली. कतारने यंदा यूएईत आशिया चषक जिंकला. तसेच, यानंतर आमंत्रण मिळाल्यानंतर कोपा अमेरिका चषकात द. अमेरिकेतील संघांनाही कडवे आव्हान दिले होते.
भारताने जानेवारीत आशिया चषक स्पर्धेत यूएई आणि बहरीनसारख्या संघांना त्रस्त केले होते. मात्र बाद फेरी गाठण्यात भारताला अपयश आले. भारताविरुद्ध कतारचे पारडे जड आहे. चारपैकी तीन सामने या संघाने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांतील मागचा अधिकृत सामना सप्टेंबर २००७ ला विश्वचषक पात्रता फेरीत झालेला. त्यावेळी कतारने भारताला ६-० ने पराभूत केले होते.
भारताने २०११ मध्ये दोहा येथे कतारविरुद्ध झालेल्या मैत्री सामन्यात २-१ ने बाजी मारली होती, पण तो अधिकृत सामना नव्हता. त्यावेळी भारताने नियमबाह्यपणे अधिक बदली खेळाडू खेळविले होते.
‘चुका टाळण्यावर लक्ष’ओमानविरुद्ध भारताकडून एकमेव गोल नोंदविणारा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,‘आम्ही या सामन्याबाबत उत्सुक आहोत. आम्ही कुठल्याही संघाविरुद्ध खेळणार असलो तरी कडवा संघर्ष करणारच. लहान-लहान चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. अशा चुकांमुळेच ओमानविरुद्ध आम्ही तीन गुण गमावले, हे ध्यानात ठेवूनच कतारविरुद्ध खेळावे लागणार आहे.’