पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 03:58 AM2019-09-29T03:58:34+5:302019-09-29T03:58:50+5:30

भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल.

World Youth Chess Championship to be held in Mumbai from October 1 | पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

Next

मुंबई : भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल. या स्पर्धेत एकूण ६६ देशांतील सुमारे ४५० हून अधिक खेळाडूंचा समावेश निश्चित झाला असून, यजमान भारताकडून १४५ खेळाडू जेतेपदासाठी भिडतील.
विशेष म्हणजे या स्पर्धेत तब्बल ५६ खेळाडू असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये किमान एक स्पर्धा जिंकली आहे. शिवाय या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टर्सही खेळतील. १४, १६ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रगनंनंधा आकर्षणाचे केंद्र असेल. तो जगातील दुसºया क्रमांकाचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर आहे. त्याचबरोबर अर्मेनियाचा सार्गसायान शांत आणि भारताचाच इनियान पी. हे अन्य ग्रँडमास्टर्स स्पर्धेत आपला जलवा दाखवतील.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि अखिल मराठी बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या स्पर्धेची नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने म्हटले की, ‘भारतात आयोजित होणारी ही स्पर्धा कदाचित सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठित आहे. नवोदित आणि बुद्धिबळप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणीच ठरेल. युवा खेळाडूंना या स्पर्धेतून खूप काही शिकण्याची संधी मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळताना त्यांना पुढील वाटचालीसाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.’
या स्पर्धेमध्ये यजमान भारतासह रशिया, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि अझबैजान यासारख्या प्रमुख देशांतील युवा बुद्धिबळपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
 

Web Title: World Youth Chess Championship to be held in Mumbai from October 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.