Wrestlers’ protest: २०१६ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट आणि टोक्यो २०२० कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांसारखे भारतातील काही नामवंत कुस्तीपटू लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रीजभूषण सिंग यांच्या विरोधात एका महिन्यापासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. सिंग यांच्यावर सात महिला कुस्तीपटूंचा छळ करण्याचा ( त्यापैकी एक अल्पवयीन आहे) आरोप आहे. त्यात सरकार ऐकत नसल्याने काल कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण, तो ५ दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. आता यावर सिंग यांची प्रतिक्रिया आली आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ६६ वर्षीय खासदार सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे आंदोलन "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले,'' लैंगिक शोषण केव्हा झालं, कुठे झालं अन् कोणासोबत झालं... हे सांगा... माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झालं तर मी स्वतः फासावर लटकेन... ४ महिने झाले, मला फाशीवर लटकवायचं आहे. सरकार मला फासावर चढवत नाही हे पाहून मेडल गंगेत विसर्जित करत आहेत. गंगेत पदक विसर्जित केल्याने मला फाशी नाही मिळणार. माझ्यावर आरोप करण्याऱ्यांनो, तुमच्याकडे पुरावा आहे, तर पोलिसांना द्या, न्यायालयाला दा. त्यांनी मला शिक्षा दिल्यास ती मला मान्य आहे. माझ्यासमोर ही नौटंकी करू नका.''
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( IOC) भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांकडून दिलेली वागणूक 'अत्यंत त्रासदायक' असल्याचे म्हटले आहे आणि WFI (भारतीय कुस्ती महासंघ) चे माजी प्रमुख ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जलद तपास करण्याची मागणी केली आहे. जागतिक कुस्टी संघटनेनेही ४५ दिवसांत निवडणूक घ्या अन्यथा निलंबनाची कारवाई करू असे WFI ला खडसावले आहे.