युवा खेळाडूंमुळे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:01 AM2019-07-26T01:01:53+5:302019-07-26T06:12:50+5:30

संदीप नरवाल : घरच्या मैदानावर खेळण्यास उत्सुक

Young players don't bother with senior players! | युवा खेळाडूंमुळे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही!

युवा खेळाडूंमुळे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही!

googlenewsNext

रोहित नाईक 

मुंबई : ‘कबड्डीमध्ये आज खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एक खेळाडू अपयशी ठरला, तर त्याची जागा भरून काढायला दुसरा खेळाडू सज्ज असतो. अनेक युवा खेळाडू आज दमदार खेळ करत आहेत. असे असले तरी वरिष्ठ खेळाडूंवर कोणतेही दडपण नाही,’ असे मत यू मुंबाचा उपकर्णधार संदीप नरवाल याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रात शनिवारपासून मुंबईतील साखळी सामन्यांना सुरुवात होईल. या वेळी घरच्या मैदानावर खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगताना संदीप म्हणाला की, ‘घरच्या मैदानावर खेळण्याची उत्सुकता आहे. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची खात्री आहे आणि घरच्या प्रेक्षकांपुढे जिंकण्याची मजाच वेगळी असते. त्यासाठी आम्ही तयार आहोत. ’ घरच्या मैदानावर मुंबईकर पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पुणेरी पलटणला सामोरे जातील. विशेष म्हणजे याआधी ५ मोसममध्ये यू मुंबाकडून खेळलेला अनुप कुमार यंदा पुणेरी पलटणचा प्रशिक्षक आहे, तर गेल्या मोसमात पुण्याकडून खेळलेला संदीप यंदा मुंबईचा उपकर्णधार आहे. याविषयी त्याने म्हटले की, ‘नक्कीच आम्ही अनुप कुमारच्या मार्गदर्शनाखालील संघाविरुद्ध खेळू. पण प्रशिक्षक सर्व काही नसतो. प्रशिक्षक मैदानात केवळ ३० सेकंद उतरतो आणि आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो, पण प्रत्यक्ष खेळ खेळाडूंनाच करायचा असतो. त्यामुळे विशेष फरक पडणार नाही.’

त्याचप्रमाणे, ‘आज अनेक ज्युनिअर खेळाडू संधी मिळताच आपली छाप पाडत आहेत. यामुळे खेळामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असली तरी, वरिष्ठ खेळाडूंना याचे काहीच दडपण नाही. तसेही जर अशा प्रकारचे दडपण हाताळता आले नाही, तर कोणताही खेळाडू यशस्वी होऊ शकणार नाही,’ असेही संदीप म्हणाला.

फिजिओचा सल्ला मोलाचा!
कबड्डीमध्ये कधीही आणि कुठेही दुखापती होऊ शकतात. त्याकडे लक्ष देऊनच खेळावे लागते. जेव्हा आम्ही मॅटवर खेळतो, तेव्हाच आम्ही मानसिकरीत्या संभाव्य दुखापतीकडे लक्ष देऊनच खेळतो. दुखापती कधीही होऊ शकतात. यासाठी वेगळ्याप्रकारे आम्ही तयारी करतो. प्रत्येक वेळी फिजिओच्या सल्ल्यानुसारच कामगिरी करतो. - संदीप नरवाल

Web Title: Young players don't bother with senior players!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.