नवी दिल्ली : प्रदीर्घ कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेला अष्टपैलू युवराज सिंग आणि डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यास प्रयत्नशील असून आयपीएलच्या आठव्या पर्वात चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.युवराज व झहीर आयपीएलच्या आठव्या पर्वात दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत युवी व झहीर यांनी आपला निर्धार व्यक्त केला. या वेळी युवी व झहीर यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू अॅल्बी मॉर्केल, दिल्ली डेअर डेव्हिल्सचे सीईओ हेमंत दुआ आदी उपस्थित होते. झहीर व युवी यांनी आयपीएलच्या आठव्या सत्रात दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाला नवे स्थान गाठून देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. दिल्ली संघाला गेल्या सत्रात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. दिल्ली संघाने या वेळी संघात मोठा बदल करताना आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजला १६ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. युवराज म्हणाला, ‘‘यंदाच्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये माझी कामगिरी उल्लेखनीय ठरल्यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. या वेळी दिल्ली संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवून देण्यास प्रयत्नशील असून त्यासाठी सांघिक कामगिरी होणे आवश्यक आहे.’’आगामी सत्र आव्हानात्मक असल्याचे मत झहीरने व्यक्त केले. संघात अनेक नवे चेहरे असून आम्हाला चमकदार कामगिरीची आशा आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबत चांगला ताळमेळ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा असल्याचे झहीर म्हणाला.दिल्ली डेअर डेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू मॉर्केलने युवी व झहीरच्या सुरात सूर मिसळताना यंदाच्या मोसमात संघाला नवे शिखर गाठून देण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. युवी व झहीर यांनी दिल्लीवासीयांना संघाला समर्थन करण्याचे आवाहन केले. (वृत्तसंस्था)
आयपीएलच्या माध्यमातून युवी व झहीर राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास उत्सुक
By admin | Published: March 31, 2015 11:29 PM