सुटीत फुकट करता येतील अशा 10 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:56 PM2019-05-09T16:56:28+5:302019-05-09T16:57:14+5:30

भली मोठी सुटी असून, हातात पुरेसा वेळ असूनही आपण काहीच केलं नाही, असं वाटतं? त्यावर उत्तर शोधा.

 10 things for Summer, its free & easy! | सुटीत फुकट करता येतील अशा 10 गोष्टी

सुटीत फुकट करता येतील अशा 10 गोष्टी

Next
ठळक मुद्देएकटय़ानं जमेल तेवढं करा. आपण कुणासाठी थांबून राहू नये हे उत्तम.

- निकिता महाजन

उन्हाळ्याची सुटी सुरू झाली. आता या सुटीत काय करायचं, असा प्रश्न असतोच. मुळात मनात आपण अनेकदा ठरवलेलं असतं की, या सुटीत काहीतरी लाइफ चेंजिंग करावं असं मनात येतं. प्रत्यक्षात होत काहीच नाही, कारण आपण करत काहीच नाही. 
का करत नाही?
कारण आपल्याला काहीतरी भव्यदिव्य करायचं असतं आणि ते भव्यदिव्य करायला आपल्याकडे पैसा नसतो, कधी घरच्यांची परवानगी मिळत नाही, कधी दोस्त आपल्यासोबत ते करायला तयार होत नाहीत. कारणं काढून पाहा, आपण शंभर कारणं सांगू की अनेकदा भली मोठी सुटी असून, हातात पुरेसा वेळ असूनही आपण काहीच का करू शकलो नाही? ते केलं नाही म्हणून आपण काही स्किलही कमावले नाहीत आणि आनंदही कमावला नाही. सुटीचा सदुपयोग केलाच नाही तर हा महत्त्वाचा वेळ हातातून निसटून जातो आणि मग पुढे नोकरी-कामाच्या रगाडय़ात काहीच करता आलं नाही, येत नाही म्हणून खंत वाटत राहाते.
म्हणून ही घ्या यादी. यापैकी काहीही एक गोष्ट करून पहायला तुम्हाला पैसे पडणार नाहीत. किरकोळ पैसे क्वचित लागतील. आणि डोकं लावलं, जरा विचार केला तर तुम्हालाही अनेक कल्पक गोष्टी सुचून ही सुटी सत्कारणीच लावता येणार नाही, तर ती जगण्याला नवीन आकार आणि नजर द्यायलाही तयार होईल.
अजून एक महत्त्वाची गोष्ट. कुणीच दोस्त सोबत नाहीत, बाकीचे हसतात. ते करत नाहीत म्हणून मी करत नाही असं काही स्वतर्‍ला सांगू नका. आपल्या दोस्तांना आपण करत असलेल्या गोष्टींचं महत्त्व पटवून द्या. ते सोबत  येतील असं पाहा. पण नाहीच म्हणाले तर एकटय़ानं जमेल तेवढं करा. आपण कुणासाठी थांबून राहू नये हे उत्तम.
तर काय काय करता येऊ शकेल याची ही एक सोपी यादी.


1. निअर टू फार
अनेकांना वाटतं की आपण प्रवास करायला हवेत. म्हणजे अमेरिका, थायलंड, इंग्लंड अशा देशात आपण फिरलो असतो; पण आपल्याकडे पैसे नाहीत, साधं मुंबई-दिल्लीला जाता येत नाही. परदेशात काय जाणार?
मात्र असा विचार करू नका. जगभर एक महत्त्वाचं सूत्र मानलं जातं. ते म्हणजे निअर टू फार. म्हणजे आधी जी गोष्ट आपल्या जवळची आहे ती पाहा. अगदी गावातली, पंचक्रोशीतली, तालुक्यातली, जिल्ह्यातली गोष्ट समजून घ्या. आपल्या जिल्ह्याचा तरी किमान इतिहास-भूगोल, प्रश्न, खानपान हे सारं समजून घ्या. अगदी जवळ आहे तिथून सुरुवात करा आणि मग जग पाहा. त्यासाठी पैसे नाही फक्त नजर लागते.
2. गो लोकल
पुन्हा सूत्र तेच. लोकल ग्लोबल असण्याचा हा जमाना आहे. मोअर द पर्सनल, मोअर द लोकल इज मोअर द ग्लोबल असं नवीन समीकरण आहे. त्यामुळे लोकल अर्थात स्थानिक जे जे महत्त्वाचं ते ते सारं समजून घ्या. गावचं मंदिर ते गावातली नदी, तिचं प्रदूषण, ते पीकपाणी इथून माहिती काढत गेलं तर हाती लागेल त्याची लिंक कुठंतरी ग्लोबल काळात लागेल.
3. प्रवास . कमी खर्चात!
म्हणजे काय अभ्यासच करायचा का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अभ्यास नव्हे, प्रवास करा. आणि तोही जवळच्या जवळ, एसटीनं, सार्वजनिक वाहनानं, पायी करा. फिरा. किमान आपला जिल्हा, आपलं राज्य तरी या उन्हाळ्यात समजून घ्या.
4. पायी फिरा.
अगदी एसटीचेही पैसे नाहीत तुमच्याकडे असं मानलं तर पायी फिरा. घरून डबा घेऊन जा, एक दहा किलोमीटरचा परीघ फिरून या. नोंदी काढा की कोण कोण भेटलं, काय बोललं, काय दिसलं. इतकं चांगलं ग्राउण्ड वर्क करायची संधी एरव्ही कधीही मिळणार नाही.

5. अनुभव कमवा

आपल्याला जे काम आवडतं किंवा ज्यात करिअर करायचं आहे असं वाटतं, त्याचा आपल्याला अनुभव काय?
तर काहीच नाही. तो मिळण्याची शक्यताही नसतेच. मग आपण आपल्या विषयात काम करणार्‍या तज्ज्ञांना, अनुभवी लोकांना भेटावं. काम समजून घ्यावं. संधी मिळालीच तर पैसे न मागता झोकून देऊन काम करावं. काम शिकावं. हे काही दिवस जरी केलं तरी आपल्या स्किलची कमाई मोठी असेल.

6.कधीच केलं नाही ते.
असं काम जे आपण आजवर कधीच केलेलं नाही, करण्याची शक्यता नाही ते करून पाहा. काहीही. अगदी गवंडी काम, सुतार काम शिकता येतं का? रोज घरात कपडे धुतले तर? रांगोळी काढायला शिकली तर? स्वयंपाक शिकला तर? वाळवणं करायला मदत केली तर?
असं बरंच काही आहे, जे करायला पैसे नाही तर फक्त उत्साह लागतो.  आळस सोडला तर तोही चटकन संचारतो.

7. सिनेमे पाहा.

पायरेटेड नव्हे तर चांगल्या सिनेमाच्या सीडी मिळवा, यू-टय़ूबवर अनेक फिल्म्स, शॉर्टफिल्म उपलब्ध आहेत, उत्तम गाणी आहेत, उत्तम भाषणं आहेत. ते भरपूर पाहा. हातातल्या फोनचा, दीड जीबीचा उत्तम उपयोग करा.

8. पुस्तकं ऐका.
पुस्तकं भरपूर वाचाच, पण वाचनाचा कंटाळाच असेल तर आता पुस्तकं ऐकण्याचीही सोय उपलब्ध आहे. ती पुस्तकं ऐका.

9. गाव आणि ग्रामपंचायत
आपल्याला आपलं गाव, ग्रामपंचायतीचं काम, ग्रामसभा, तिचे हक्क हे तरी कुठं माहिती असतं. ते समजून घ्या. गावात आपण दोस्त मिळून काय छोटं काम करू शकतो, याचा अंदाज घ्या. आपल्याला आपलं गावही समजून घेता येणं गरजेचं आहे.

10. व्यायाम
यादीत शेवटीच येतो हा विषय नेहमी. आणि कुणी विचारेलही की, उन्हाळ्यात कुणी व्यायाम करतो का? मात्र सुटी आहे नियमित चालणं, वेट ट्रेनिंग, पळणं हे तर सहज करता येईल. स्वतर्‍कडे लक्ष देणं हे काही कमी महत्त्वाचं नाही.

 

Web Title:  10 things for Summer, its free & easy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.