तंत्रज्ञान नुस्तं वापरणार नाही,
तर यंदा ते आपण अंगावर घेऊन फिरू
रिअॅलिटी म्हणून जगू
आणि घरबसल्या
अष्टावधानी बनू!
२०१५ मध्ये एकीकडे फोरजी, वेअरेबल्स यांचा जोर होता, तर दुसरीकडे टॅब्लेट्सची क्रेझ कमी झाल्याचं चित्र आपण पाहिलं. अधिक टच फ्रेंडली असलेली विंडोज १० सारखी आॅपरेटिंग सिस्टिम, मोबाइलच्या विश्वात नवी क्र ांती घडवून आणणारा थ्रीडी टच सुविधा असलेला आयफोन ६ एस आणि असंख्य नव्या कंपन्यांचे अँड्रॉईड फोन्स याच वर्षात दाखल झाले. २०१६ च्या अखेरीस ‘फेसबुक’नं सुरू केलेली ‘फ्री बेसिक्स’साठीची मोहीम. (तत्पूर्वी सहा महिने इंटरनेट डॉट ओआरजी नावाने हीच मोहीम सुरू होती.) ही २०१६ हे वर्ष टेक्नॉलॉजीच्या आघाडीवर विविध घटकांना ‘स्थिरावण्याची’ गरज भासत असल्याची ग्वाहीच देते.
त्यामुळे २०१६ हे वर्ष टेक्नॉलॉजीचे नवे ट्रेण्ड्स घेऊन येईल आणि त्यानं आपलं आयुष्यच बदलून जाईल.
त्या बदलांची ही एक फक्त झलक..
5ॠ
आपल्याकडे अजूनही थ्रीजीचीच चलती असली तरी एअरटेलच्या जाहिरातींमुळे फोरजीची माहिती लोकांना आता कळली आहे. २०१६ च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणाऱ्या रिलायन्स जिओ या नव्या मोबाइलसेवेमुळे फोरजीचा नेमका वापर कशासाठी होऊ शकतो हे समजायला लागेल. पण असं असलं तरी, फोरजी जेवढ्या लवकर आलं तेवढ्याच लवकर मागे पडण्याचीही शक्यता आहे. कारण जग आता फाईव्ह जीकडे वेगानं वाटचाल करतंय. काही मोजक्या देशांत फाईव्हच्या प्राथमिक चाचण्या सुरू झाल्या असून, फोरजीच्या दुप्पट डाऊनलोड आणि अपलोड स्पीड फाईव्हजीमध्ये मिळणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २०१६ च्या शेवटच्या काही महिन्यांत फाईव्ह जी सुरू होण्याची शक्यता आहे.
बदलेल काय?
त्यातून आपला मोबाइलवरून नेट वापरण्याचा अनुभवच बदलून जाईल!
डिव्हाइस मेश
गेल्या वर्षभरात तुम्हाला जाणवलं असेल की आपण एकाहून अधिक गॅजेट्स वापरायला लागलो आहोत आणि ही गॅजेट्स एकमेकांशी कनेक्टेड असतात. उदा. मोबाइल आणि लॅपटॉप, मोबाइल आणि टॅब, मोबाइल आणि डिजिटल टीव्ही, मोबाइल आणि डिजिटल वॉच इ. २०१६ मध्ये आपल्याभोवती अशा गॅजेट्सचं जाळं वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाला तज्ज्ञांनी डिव्हाइस मेश असं नावं दिलं आहे. यात आता एसी, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह यांसारखी घरगुती उपकरणंही येतील. शिवाय टू-व्हीलर, फोर-व्हीलर आदिंचा समावेशही होईल.
बदलेल काय?
आणि आपला गॅजेट वापरण्याचा पर्सनल एक्सपिरीयन्सच बदलून जाईल!
युजेबल वेअरेबल्स
अॅपल वॉच, मोटो वॉच, फिटबिट सारखी गॅजेट्स आता आपल्या परिचयाची झाली आहेत. परंतु ही गॅजेट्स अजून मोबाइलसारखी आपल्या आयुष्यात स्थिरावलेली नाहीत. ती स्थिरावण्यासाठी त्यांच्या उपयुक्ततेत अजून भर पडण्याची गरज आहे, हे त्या-त्या निर्मात्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे आता नोकरी आणि व्यवसायाशी या गॅजेट्सचा संबंध कसा प्रस्थापित करता येईल, याच्यावर निर्मात्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. अमेरिकेतील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर असे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामुळे नव्या स्वरूपातील, अधिक उपयुक्त विअरेबल्स २०१६ मध्ये येण्याची शक्यता आहे.
बदलेल काय?
जितक्या सरावानं आपण मोबाइल वापरतो आहोत, त्याच सरावानं आपण अंगाखांद्यावर हे टेक्नॉलॉजीचे दागिनेही मिरवू शकू!
व्हर्च्युअल रिअॅलिटी
घरात बसून सिनेमा थिएटरचा आनंद देणारे टीव्ही सेट्स आणि म्युझिक सिस्टिम्स अस्तित्वात असल्या तरी ३६० अंशात सिनेमा बघण्याचा आणि आपण प्रत्यक्ष सिनेमातील वातावरणातच आहोत याची अनुभूती देणारी यंत्रणा क्चचितच काही ठिकाणी उपलब्ध आहे. २०१६ मध्ये हा अनुभव तुम्हाला घरबसल्या मिळू शकतो. त्याला म्हणतात व्हर्च्युअल रिअॅलिटी किंवा व्हीआर. आभासी वास्तव. फेसबुकने अॅक्वायर केलेल्या आॅक्युलस या कंपनीचे रिफ्ट मालिकेतील व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट्स २०१६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. सिनेमा बघण्यासह अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी या हेडसेट्सच्या माध्यमातून तुम्हाला करता येऊ शकतील.
बदलेल काय?
उदा. बाजीराव-मस्तानी फीव्हरमध्ये असणारी मंडळी प्रत्यक्ष शनिवारवाड्याच्या आत उभी राहून ३६० अंशात १७३५ मध्ये शनिवारवाडा कसा होता, याचा थेट अनुभव घेऊ शकतील. या प्रयोगावर सध्या काम सुरू आहे. सोनी आणि एचटीसीही याच प्रकारचे व्हीआर हेडसेट्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
प्रायव्हसी इज करन्सी
२०२० कडे वेगानं वाटचाल करताना आपली वैयक्तिक माहिती ही किती महत्त्वाची आहे, हे आता आपल्याला कळून चुकलं आहे. दुर्दैव एवढंच की, मोठमोठ्या कंपन्यांना या माहितीची महती दहा वर्षांपूर्वीच समजली होती. त्यामुळे आपण दिलेल्या माहितीचा या कंपन्या व्यवसायासाठी वापर करतात हे उघड सत्य आहे. येत्या दोन-तीन वर्षांत ग्राहक म्हणून अशा माहितीच्या वापरास विरोध करणारी मोठी चळवळ उभी राहण्याची शक्यता आहे. वैयक्तिक माहिती वापरायची असेल तर त्यासाठी पैसे मोजा, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे. २०१६ मध्ये ‘प्रायव्हसी इज करन्सी’ या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होईल, अशी शक्यता आहे.
बदलेल काय?
आपली खासगी माहिती जपण्याची, त्यातून खासगीपण जपण्याची एक जाणीव येत्या काळात निर्माण होऊ शकेल!
आॅनलाइन खंडणीखोर
आॅनलाइन फ्रॉडच्या बातम्या आता नेहमीच्या झाल्या आहेत. बँक अकाउंट हॅक करणे म्हणजे दरोडा समजला, तर एखाद्याचा मोबाइल फोन हॅक करून तो पूर्ववत करण्यासाठी पैसे आकारणे अशा आॅनलाइन खंडणी वसूल करण्याच्या घटना येत्या काळात होतील अशी शक्यता कॅस्पर्सकीने वर्तवली आहे. आपण आजकाल अनेक गेम्स किंवा अॅप्स विकत घेतो. त्या माध्यमातून अशा प्रकारचे खंडणीखोर आपल्या गॅजेट्समध्ये शिरकाव करू शकतात.
बदलेल काय?
नवीन अॅप, गेम डाऊलोड करताना सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, नाहीतर आपल्या गॅजेट हॅक होण्याची शक्यता यावर्षी आहेच.
- अमित टेकाळे
( लेखक तंत्रज्ञान अभ्यासक आहेत)