अनघा पाठक
पहिल्यांदा कुणी बिकिनी घातली त्याला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली. त्याही काळी बिकिनीनं काही प्रश्न उपस्थित करत लाथाडल्या होत्या काही सामाजिक प्रथा! इथवरच्या प्रवासात तोडल्या किती बेडय़ा, आणि आता आजही तीच बिकिनी नव्या तरुणींचे काही थेट प्रश्न घेऊन समाजाला विचारतेय की,आहे का ढोंग सोडायची तयारी?
------------------
‘बिकिनी’.
हा शब्द आजही ‘स्फोटक’ वाटतो.
कल्पना करा, 5 जुलै 1946 या दिवशी पहिल्यांदा जिनं बिकिनी घालून ‘मॉडेलिंग’ केलं असेल, तेव्हा काय झालं असेल?
झाकण्यापेक्षा ‘दाखवण्याला’च जास्त प्राधान्य देणारे कापडांचे दोन तुकडे, एवढंच म्हणत बिकिनीवर तेव्हा प्रखर टीका झाली असेल. आपल्या समाजात तर आजही अनेकांना बिकिनी म्हटलं की सांस्कृतिक त्रस होतो, तर मग सत्तर वर्षापूर्वी या बिकिनीनं काय आग लावली असेल याचा विचारही करणं अवघड आहे!
एक मात्र नक्की, तेव्हापासून आजर्पयत बिकिनी हे काही केवळ फॅशनचं किंवा स्त्रीदेहाच्या मुक्त प्रदर्शनाचं प्रतीक नाही आणि नव्हतंही!
बिकिनी हे कायम महिलांच्या बंडखोरीचं, तिच्या स्वातंत्र्याचं आणि पुरुषी बंधनांना ठोकर मारून मनमर्जी जगण्याचं प्रतीक ठरत गेलं! बिकिनीचा संबंध स्त्रीमुक्तीशी थेट जोडला गेला. फ्रेंच फॅशन इतिहासकार ऑलिव्हर सैलार्डच्या मते, ‘बिकिनीची लोकप्रियता हा स्त्रीशक्तीचा विजय आहे, फॅशनचा नव्हे! बिकिनी परिधान करणं हे बंडखोरीचं लक्षण मानण्यापासून एक पोषाख म्हणून ती स्वीकारली जाणं हे स्त्रियांच्या संघर्षाचं आणि त्यातून त्यांनी केलेल्या प्रगतीचं निदर्शक आहे!’
बिकिनी नावाच्या या बंडखोरीचा प्रवास आज ती सत्तरीत पोहचत असताना समजून घेणं म्हणूनच अत्यंत महत्त्वाचं आहे. उथळ देहविचार आणि फॅशन यांच्या पलीकडे जाऊन एक सुंदर आणि रोखठोक तरीही मादक बंड म्हणून जग बिकिनीची चर्चा का करतं आहे हे समजलं तर समजू शकते त्याकाळच्या ‘तरुण’ बंडखोरीची आणि बदलत गेलेल्या बंडाची, स्वतंत्र जगण्याची एक नवी व्याख्या.
कारण काळाच्या पटलावर आज काही चक्र उलटी फिरत आहेत.
जी बिकिनी पूर्वी स्त्रीस्वातंत्र्याचं प्रतीक ठरली त्याच बिकिनीवर आजची तरुणी काही नवीन प्रश्नचिन्हं उभी करते आहे.
बिकिनीनं जन्माला घातलेली ‘बिकिनी बॉडी’ ही कन्सेप्ट सध्या जगभर धुमाकूळ घालते आहे. मात्र या बिकिनी बॉडीच्याच हव्यासापायी जगभरातील लाखो मुली ‘इंटिंग डिझऑर्डर’च्या आणि डिप्रेशनच्या बळी ठरत आहेत. मीडियाही बिकिनी बॉडीचं सतत मार्केटिंग करत असल्यानं अनेकींना त्या बिकिनी बॉडीची क्रेझ वाटते आहे; मात्र दुस:या बाजूला बिकिनीतून होणा:या स्त्रीदेहाच्या प्रदर्शनामुळे स्त्री ही आजही उपभोग्य वस्तूच आहे आणि देहाच्या सौंदर्याची पुरुषी व्याख्याच आजच्याही पुरुषांच्या मनात बळावते असं अभ्यासकांचं मत आहे. प्रिस्टन विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासाने या मताला पुष्टीही दिली आहे.
त्यातून आता एक नवीन ट्रेण्ड जन्माला येत आहे. आजच्या तरुणी म्हणताहेत की, मी जशी आहे तशीच बिकिनी घालेन, खड्डय़ात गेली तुमची बिकिनी बॉडीची कल्पना. तुम्ही कोण आमच्या शरीराच्या सौंदर्याची ‘मापं’ ठरवणार?
ताजं उदाहरण द्यायचं झालं तर महिनाभरापूर्वी लंडनमध्ये काही स्त्रियांनी निदर्शनं केली. एका प्रोटीन शेकच्या ‘आर यू बीच रेडी’ या बीच बॉडीची जाहिरात करणा:या कंपनीविरुद्ध लंडनमधल्या स्त्रिया हाईडपार्कमध्ये एकत्र झाल्या. सगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बिकीनी ह्या स्त्रियांनी घातल्या होत्या. त्यातून त्यांनी संदेश दिला की, धिस इज माय बीच बॉडी, डील विथ इट!!
मुद्दा काय, बिकिनी सत्तरीची झाली तरी बिकिनीला चिकटलेले वाद संपायला तयार नाहीत.
उलट काळाच्या या टप्प्यावर बिकिनी तरुणींचे आणि समाजाच्या मानसिकतेचेही काही नवीन प्रश्न घेऊन उभी आहे.
आणि जो प्रश्न ती सत्तर वर्षापूर्वी विचारत होती तोच आजही विचारते आहे,
सोंगढोंग बाजूला ठेवून, स्त्रियांच्या खंबीर-स्वतंत्र जगण्याला खरंच पाठिंबा आहे तुमचा?
- अनघा पाठक