व्यायामाविषयी हे 8 गैरसमज वेळीच दूर करा, नाही तर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:38 PM2018-06-15T14:38:46+5:302018-06-15T14:38:46+5:30

व्यायाम करण्यापेक्षा त्याविषयी चर्चाच जास्त. त्यात चुकीचे समज आणि त्याहूनही मोठे गैरसमज. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडून व्यायाम करणार कसा?

8 mistakes killing your exercise | व्यायामाविषयी हे 8 गैरसमज वेळीच दूर करा, नाही तर.

व्यायामाविषयी हे 8 गैरसमज वेळीच दूर करा, नाही तर.

googlenewsNext

- डॉ. यशपाल गोगटे

व्यायाम सगळ्यांनीच करायला हवा, त्यातून मिळणारे फायदे याविषयी आपण गेल्या आठवडय़ात बोललो आहोतच; पण तरीही व्यायामाविषयी अनेकांच्या मनात बरेच समज-गैरसमज दिसतात. ते जरा तपासून पाहू.
व्यायामाने वजन कमी होतं.  हा काहीअंशी गैरसमज आहे. आजकालच्या युगात वजन कमी करण्याची एक क्रेझ आहे! त्यामुळे वजन कमी करण्याचा एक उपाय म्हणून व्यायामाकडे बघितलं जातं. पण, व्यायामानं अपेक्षित वजन कमी होत नाही म्हणून निराश होऊन व्यायामच करणं सोडून दिलं जातं. वजन कमी खाण्यानंच कमी होते, व्यायामाचा त्यात फार मोठा भाग नाही. पण, कमी केलेलं वजन टिकवून ठेवण्यासाठी व्यायामासारखा दुसरा पर्याय नाही. 
समज : माझं व्यायामाचं शरीर आहे, त्यामुळे मी काहीही/कितीही खाल्लं तरी चालेल. 
हा एक गैरसमज आहे. वाट्टेल ते खाल्लेलं हे जास्त व्यायाम करून पचवता येत नाही. त्यामुळे व्यायामाबरोबर योग्य आहाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे. नुसता व्यायाम करून अनहेल्दी- जंक फूड खाल्ल्यास ते शरीराला घातकच ठरतं.
समज : व्यायाम करण्यासाठी एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट जागा असावी. 
हा एक गैरसमज आहे. व्यायाम दिवसभरातून कुठल्याही वेळी करता येतो. एवढंच नाही तर दिवसातून तीन-चार वेळेला विभागून केला तरी त्याचा फायदा होतो. व्यायाम हा दिनचर्येचा भाग म्हणूनदेखील करता येऊ शकतो. जसं की आवरासावर करणं, घर झाडणं, फरशी पुसणं, हातानं कपडे धुणं, बागकाम करणं इ. हे व्यायामाचेच प्रकार आहेत. त्यामुळे व्यायाम करणं निवडताना विशिष्ट प्रकारचा, विशिष्ट जागी करण्याचा अट्टाहास सोडून विविध शारीरिक हालचाली होणं हे गरजेचं आहे.
समज : विशिष्ट व्यायाम प्रकाराला वयोमर्यादा असते. 
हा एक गैरसमज आहे. व्यायाम सुरू  करण्याला कुठलंही वयाचं बंधन नसतं. कुठलाही व्यायामप्रकार हा सगळ्याच वयातील लोकांसाठी फायदेशीर ठरतो. पण, यथाशक्ती तो सरावानं हळूहळू वाढवणं गरजेचं आहे. 
समज : बारीक माणसाला व्यायामाची काही गरज नाही. 
हा एक मोठा गैरसमज आहे. बारीक असो वा जाड व्यायाम करण्यानं प्रत्येक शरीर प्रकृतीला फायदा होतो. बारीक माणसांमध्ये हाडं आणि स्नायूंना बळकटी येऊन लवचिकता वाढते. वजन उचलण्याचा व्यायाम बारीक माणसांना जास्त फायदेशीर ठरतो.
समज : व्यायाम करण्यापूर्वी पोट रिकामं असावं.
हा एक गैरसमज आहे. व्यायाम करणं हे फायद्याचं ठरतं मग पोट रिकामं असो वा भरलेलं. उलट मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जेवणानंतर व्यायाम केल्यास त्यांची रक्तातील साखर कमी होते असं आढळून आलं आहे. खूप भरपेट न खाता हलका आहार घेण्यास हरकत नसते.समज : केवळ व्यायामाने सर्व रोग निवारण होऊ शकते. 
व्यायामाकडे एक उपचार म्हणून बघणं चुकीचं आहे. काही हाडांच्या व्याधी जसे पाठदुखी, गुडघेदुखी या सोडल्यास व्यायाम ही उपचार पद्धती नव्हे. जीवनशैलीशी निगडित आजार जसे की स्थूलता, मधुमेह, हृदयविकाराचे आजार, उच्च रक्तदाब यात काही अंशी नियमित व्यायाम केल्यानं चांगले परिणाम दिसून येतात. परंतु त्याबरोबर इतर औषधोपचार करणं महत्त्वाचंच नव्हे तर गरजेचंही आहे. व्यायामाकडे उपचार पद्धती म्हणून न बघता दिनचर्येचा एक अविभाज्य घटक म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आजार झाल्यावर व्यायाम नव्हे तर आजार होऊ नये म्हणून व्यायाम हे तत्त्व पाळणं गरजेचं आहे. 
समज : जिम करू नये तो काही व्यायाम नाही. 
साधारणपणे रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजेच जिममधील वजन उचलण्याच्या व्यायामाकडे एक नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं. पण खरं पाहता हा सर्वासाठी एक गरजेचा व्यायाम आहे. या व्यायामप्रकारामुळे स्नायू बळकट होऊन हाडं मजबूत होतात; म्हणून चयापचयाचे आजार तर दूर होतातच, पण तोल सांभाळणं सोपे जाऊन फ्रॅक्चर व धडपडण्याचा धोका कमी होतो. 
dryashpal@findrightdoctor.com
 

Web Title: 8 mistakes killing your exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.