- बराक ओबामा(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष)
मी जगभर फिरलोय, त्यातून एकच प्रवास निवडणं आणि सांगणं तसं अवघड आहे. मात्र आता माझ्या मुलींसोबतचे प्रवास जास्त हवेहवेसे वाटतात. विविध स्थळं, विभिन्न संस्कृती, जगण्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन हे सारं मोहात पाडतं. प्रवास तुमच्या वाढीला हातभार लावतो, पोषक-पूरक ठरतो. आता तर पालक म्हणून मी माझ्या मुलींच्या प्रवासानं बदललेल्या नजरा पाहातो तेव्हा ते जास्त मोलाचं वाटतं.
आता माझ्या मुली 20 आणि 17 वर्षाच्या आहेत. एक शिक्षणासाठी घराबाहेर असते, दुसरीही लवकरच बाहेर शिकायला जाईल. त्यामुळे प्रवासात त्यांच्यासोबत राहायला मिळतं. तरुण मुलांनी प्रवास करणं फार महत्त्वाचं आहे. तारुण्यातला प्रवास तुम्हाला बरंच काही देऊन जातो..
माझे वडील केनियाचे होते; पण मला त्यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती. मी एकदाच त्यांना भेटलो होतो. मी अमेरिकेतच वाढलो. मी पहिल्यांदा केनियाला गेलो तेव्हा माझी विशी उलटून गेलेली होती. ग्रॅज्युएट झालो होतो. थोडंबहुत काम करत होतो. त्याचदरम्यान माझे वडील गेले. मग मला वाटलं की, त्यांना अधिक समजून घ्यायला हवं होतं, ते ज्या देशात राहायचे तो देश समजून घ्यायला हवा. म्हणून मग मी महिनाभर केनियाला गेलो. आधी मी युरोपात गेलो. त्याआधी मी युरोपही पाहिलेला नव्हता. त्या प्रवासानं मला माझीच नव्यानं ओळख करून दिली. स्व-शोधाचाच तो प्रवास होता. मी एकटय़ानं तो प्रवास केला. युरोपात मी साध्याशा गेस्ट हाउसमध्ये राहायचो. फ्रेंच ब्रेड आणि थोडं चिझ घेऊन त्यावरच रोज दिवस काढायचो. कधीतरी क्वचित वाइन प्यायचो.
मला अजून आठवतं मी मादरीदहून बार्सिलोनाला जायला रात्री बसने निघालो. मला फार काही बरं स्पॅनिश बोलता यायचं नाही. पण जुजबी बोलून संवाद व्हायचा. बसमध्ये शेजारी एक प्रवासी होता. त्याच्याशी दोस्ती झाली. त्याला इंग्रजी अजिबातच येत नव्हतं. तरी माझ्या मोडक्यातोडक्या स्पॅनिशच्या बळावर आमच्या गप्पा झाल्या. त्याला मी माझ्याकडचा ब्रेड दिला, त्यानं मला त्याच्याकडची वाइन दिली. आणि मग आम्ही बार्सिलोनाला पोहोचलो. दिवसभरच होतो तिथं. खूप फिरलो. या अशा आठवणी कायम लक्षात राहातात. आपण कोण आहोत, जगात आपलं स्थान काय, हे शोधायला असे प्रवास तुम्हाला खूप मदत करतात.
त्यानंतर मी केनियाला गेलो. तिथं महिनाभर राहिलो. माझ्या कुटुंबाला भेटलो. त्यांना पूर्वी मी कधीही भेटलो नव्हतो. ते सारं जग मला भेटलं, कळू लागलं.आता आपण म्हणतो की तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं आहे. तंत्रज्ञान आणि माहितीला कुठल्याच सीमा रोखून ठेवू शकत नाहीत. मात्र असं असतानाही आपण अवतीभोवती संघर्ष पाहातो, शेजारी देशात आणि माणसांत मोठे संघर्ष पेटलेले दिसतात. आता एका कुठल्या देशापुरता एक प्रश्न उरलेला नाही. जागतिक झालेले आहे सारे.
म्हणून प्रवासाचं महत्त्व वाढलं आहे. या गृहावरची विविधता लोक समजून घेतील. वेगवेगळ्या प्रकारच्या चवी अनुभवतील. आपण परस्परांत काय वाटून घेतो, काय साधर्म्य, आपण त्यातून कशाप्रकारे जगू शकतो हे सारं उमजेल. स्वतःलाच स्वतःची ओळख पटू शकेल. तुम्ही केनियातल्या लहानशा खेडय़ातून प्रवास करता, एक लेकरू आणि त्याची आई छान मायेनं हसत असतात. खेळत असतात. ते चित्र आणि हवाई किंवा व्हर्जिनियातलं चित्र काही वेगळं नसतं.
म्हणून प्रवास केले पाहिजे. उदारमतवादी नजर, मनमोकळेपणा हे वाढीस लागायचं तर प्रवास करायला हवा. वेगवेगळा समजा, संस्कृती पाहता यायला हवी. वेगळ्या विचारांची माणसं भेटायला हवीत. त्यांचं म्हणणं ऐकून घेता यायला हवं. सगळंच आपल्याला पटेल असं नाही, सहमती घडेलच असं नाही. मात्र सतत आपल्याला हवं तेच पाहण्याची आणि ऐकण्याची सवय त्यानिमित्तानं सुटेल. म्हणून प्रवास महत्त्वाचा. तरुण मुला-मुलींनी तर तो करायलाच हवा.