रिकाम्या खिशानं शिकवलेली जगण्याची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 07:20 AM2018-12-27T07:20:27+5:302018-12-27T07:25:02+5:30
रिकामा खिसा,रिकामं पोटआणि तुटलेलं काळीज काय नाही शिकवत. ते शिकत राहायचं!
-- अंकलेश वाणी
नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असणारं माझं छोटंसं मानोरी नावाचं गाव. अतिशय गरिबीत दिवस गेले. शेती म्हणून काही नव्हतीच वडिलांची. ठेक्याने शेती करायचे बाबा. त्या शेतीत कुटुंबातील सर्वच सदस्य जुंपलेले असायचे! चांगला दिवस, चांगले कपडे, चांगलं अन्न काय असतं हे त्यावेळेस कधी बघायलाच मिळालं नाही. असं म्हणतात की जी गोष्ट तुम्ही वास्तविक आयुष्यात पूर्ण करू शकत नाही ती तुमच्या स्वप्नात का होईना पूर्ण होतेच! पण प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. स्वप्नसुद्धा पाठ फिरवून नाहीशी होतात हे तेव्हा कळलं!
बर्फाचा गोळा किंवा बुढ्ढीके बाल विकत घ्यायलासुद्धा पैसे नसायचे तेव्हा. पण शौक बडी चीज है म्हणत गावभर अनवणी पायानं हिंडून लौवा-लोखंड गोळा करत बालमनाच्या त्या इच्छा पूर्ण केल्यात. सहा किलोमीटर दूर शाळेत पायदळी जाऊन शाळा पूर्ण केली. खूप दिवसांनी सायकल मिळाली. हिवाळ्यात स्वेटर किंवा पावसाळ्यात रेनकोट काय असतो हे माहीतच नव्हतं. पावसात एका हातात सायकलचं हॅण्डल आणि एका हातात छत्री असा अखंड प्रवास! शूज हा प्रकार ऐकिवताच नव्हता! वर्गाचा कॅप्टन होतो तेव्हा प्रार्थनेच्या वेळी समोर जाऊन रांग लावावी लागे. एकदा पायात चप्पल नव्हती म्हणून थोड्या वेळासाठी मित्राकडे त्याची उधार मागितलेली चप्पल आजही लक्षात आहे!
दिवाळीसाठी फटाके पाहिजे असतील किंवा शिकण्यासाठी वह्या-पुस्तकं घ्यायचे असतील तरी शेतात काम करूनच पैसे जमवावे लागत. त्यानंतर अकरावीपासून नागपूर. दोन वर्षे हॉस्टेलला गेली आणि त्यानंतरचं आयुष्य भाड्याच्या खोलीत.
2010 साली नागपुरातल्या प्रसिद्ध थ्री स्टार हॉटेलमध्ये स्टुअर्ट म्हणून काम करण्याचा योग आला. त्यावेळी आयपीएलच्या चिअर गर्ल्सना जवळून बघण्याचा तेव्हाच योग आला. पैशांसाठीच देहप्रदर्शन करावं लागतं असं त्यांच्याकडूनच कळलं; एरवी त्यांनाही तो जॉब अवडतोच असं नाही. तिथं लक्षात आलं, एव्हरीबडी फायटिंग हीज और हर बॅटल. त्यानंतर बीए केलं. मोठा भाऊ पैसे पाठवायचा. लहानपणापासून इंग्रजीची खूप आवड होती म्हणून नंतर एमए केलं. मरेपर्यंत अभ्यास केला. पण इथपर्यंत येत असताना वेटरचं काम केलं, कार वॉश केलं. एमए केल्यानंतर कॉलसेंटरमध्ये काम केलं. अमेरिकन क्लायंटशी बोलताना खूप मजा यायची. त्यानंतर नागपुरातल्या नामवंत अभियांत्रिकी कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्रोफेसर म्हणून शिकवण्याचा योग आला. मग पुन्हा दुसरं कॉलेज, मग मार्केटिंग, मग इन्शुरन्स, स्वत:चा कथासंग्रहसुद्धा लिहून काढला. स्पोकन इंग्रजीचे क्लाससुद्धा चालवलेत, खासगी शाळांमध्ये आणि ट्युशनमध्ये सुद्धा शिकवलं. आणि आता ट्रेनर आहे.
बरेचदा शिक्षण घेणं पैशाअभावी अशक्य झालं होतं. माझे बरेचशे मित्न इंजिनिअरिंगकडे वळले. आपण ते करू शकलो नाही याची खंत नेहमी असायची; पण आता बरंच झालं असं वाटतं. आज इंजिनिअरिंग शिकवायला मिळतो यापेक्षा दुसरा मोठा आनंद पुन्हा काय असणार!
आयुष्यामध्ये येणा-या लोकांनी बरंच काही शिकवलं. पुस्तकं, मित्न, बरेवाईट अनुभव, माझे शिक्षक. सगळ्यांनी साथ दिली. रिकामा खिसा, रिकामं पोट आणि तुटलेलं हृदय ह्यापेक्षा पुन्हा मोठा दुसरा शिक्षक कोण असू शकतो बरं!
कधी कधी आयुष्यच जिथं संपलं असं वाटतं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ख-या अर्थानं तिथूनच एक नवी सुरु वात आपल्या वाट्याला आलेली असते. आता ती कशी शोधायची आणि तिचा वापर कसा करून घ्यायचा हे मात्न ज्याचं त्यानं ठरवायला हवं. तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळेलच, धीर सोडू नका आणि स्वप्न पाहणं सोडू नका!