ग्रोथ इंजिनच्या शोधात सायकल
By admin | Published: January 29, 2016 01:47 PM2016-01-29T13:47:48+5:302016-01-29T13:47:48+5:30
स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया असा नारा देशात घुमतोय, पण ज्यांनी स्टार्टअपचे डाव मांडलेत ते देशभरातील तरुण नक्की काय आणि कसं करताहेत, हे जाणून घ्यायला तेलगंणातला एक तरुण इंजिनिअर सायकलवरून इंडियन स्टार्टअप टुरवर निघाला आहे.
Next
>आपलं काय होणारे, हे असंच चालणार. शाळा संपली की कॉलेज आणि मग नोकरी. मग दहा ते सहा हापिसात बसायचं, पैसे कमवायचे, घरगाडय़ा घ्यायच्या आणि लग्नबिग्न झालं की सेटल झालो असं म्हणायचं. अशा विचारांचं सॉफ्टवेअर आपल्याकडे फार लहानपणापासूनच शिकवलं जातं. तुम्ही इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केलं तर तुमच्या वाटय़ाला सरळ उपेक्षा किंवा हेटाळणी येते.
पण तरुण मुलांनीच आता हे जुनं सॉफ्टवेअर नव्या पद्धतीनं अपडेट करायला सुरुवात केली आहे. विशेषत: करिअरच्या नेहमीच्या साधनासाठी पारंपरिक मार्गाऐवजी पर्याय शोधण्याची धडपड तरुण करू लागले आहेत. त्यातही करिअर म्हणजे उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवण्याची कृती असा नेहमी घेतला जाणारा मर्यादित अर्थ नसून जगण्याचा एक आनंददायी भाग म्हणून काहीजण करिअरकडे पाहतात.
त्यातलाच एकजण सध्या सायकलवरून भारतभ्रमणाला निघाला आहे. पण सायकलला पायडल मारताना त्याच्या डोक्यात काहीतरी भलतंच भन्नाट शिजतं आहे.
तेलंगणच्या खम्मम शहरातला 22 वर्षाचा अक्षय गुनेटी.
तुमच्या आमच्यासारख्या साध्या सरळ आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्याच्या डोक्यात उद्योजकतेची कल्पना घोळू लागली. अभियांत्रिकीच्या शिक्षणापेक्षा उद्योगाकडेच आपला नैसर्गिक ओढा असल्याचं त्याला जाणवू लागलं. मग त्यानं मध्येच ब्रेक घेतला आणि सरळ नव्या उद्योजकांना मदत करणा:या संकेतस्थळाची निर्मिती केली. केरळमधले आदिवासी समुदाय मातीपासून दागिने बनवतात त्यांच्यासाठी तो काम करू लागला. पण एक प्रश्न त्याच्या मनात उरलाच. तो म्हणजे, मी हैदराबाद-बेंगळुरात शिक्षण घेतोय पण देशभरातली बाकीची तरुण मुलं काय काय करताहेत, हे समजून घ्यायला हवं. तोवर त्याच्या मनात स्टार्टअपचं बी चांगलं रुजलं होतंच. मग आपल्या देशात तरुण स्टार्टअप्सची काय स्थिती आहे हे प्रत्यक्ष जाऊन पाहायचं असं त्यानं ठरवलं.
आणि एक दिवस सरळ आपण इंडियन स्टार्टअप टुरवर जाणार असल्याचं घरी जाहीर करून टाकलं. देशात विविध ठिकाणी, लहानमोठय़ा शहरांमध्ये नवे उद्योजक कसे आकारास येत आहेत, त्यांचे उद्योग कसे वाढत आहेत याची माहिती घेत ही स्टार्टअप केंद्र जोडण्याचा प्रवास सायकलने करण्याचं त्यानं ठरवलं. येत्या फेब्रुवारीपासून त्याची ही इंडियन स्टार्टअप टुर सुरू होईल. त्यासाठी देशातील 27 लहान-मोठय़ा शहरांची त्यानं निवड केली आहे. दहा हजार किलोमीटर्सच्या या प्रवासामध्ये तो 2क्क्क् हून अधिक स्टार्टअप्सना भेट देणार आहे. नवे विचार, तरुणांच्या कल्पना, त्या कल्पनांवर भरवसा ठेवून उद्योग म्हणून पैसे गुंतविणा:या लोकांची मतं तो जाणून घेणार आहे. विविध राज्यांमधील सरकारी योजना, त्यांची नवउद्योगांना कशी मदत होते याचीही माहिती घेत ‘कनेक्टिंग द डॉट्स’ म्हणत त्याची ही सायकलवारी सुरू होते आहे.
पण सायकलच का?
हा प्रश्न त्याला विचारलाच, तर सांगतो,
‘पोहणं आणि सायकलिंग हे माङो छंद आहेत. सायकलवर तर जिवापाड प्रेम. म्हणून ठरवलं की भारत पाहायचा, देशभरातील स्टार्टअप्सवाल्या तरुण दोस्तांना भेटायचं तर सायकलनेच प्रवास करायचा. सायकलिंगचं वेड आणि देश पाहत स्टार्टअप समजून घेण्याची हौस हे सारं एकाच वेळी जमतंय, अजून काय हवं?’
देशात स्टार्टअपचं वारं वाहत असताना तरुण किती गांभीर्यानं या सा:याकडे पाहतात, याचंच हे एक उदाहरण!
- ओंकार करंबेळकर