बुमरा  आणि  शमी - हे दोन फास्टर्स ऑस्ट्रेलियात चालतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:04 PM2020-10-22T17:04:05+5:302020-10-22T17:04:18+5:30

भारतात फास्ट बॉलर्स जन्माला येत नाहीत, हा जुनाट समज मोडीत काढत हे दोघे नवा इतिहास लिहितील का?

Bumra and Shami - will these two fasters get success in Australia? | बुमरा  आणि  शमी - हे दोन फास्टर्स ऑस्ट्रेलियात चालतील?

बुमरा  आणि  शमी - हे दोन फास्टर्स ऑस्ट्रेलियात चालतील?

Next

- अभिजित पानसे

आयपीएल म्हणजे गोलंदाजांसाठी स्मशानभूमी असते. बॅट्समन फ्रेण्डली खेळपट्टय़ांप्रमाणेच बॅट्समन फ्रेण्डली नियमांमुळे बॉलर हे फक्त बॉलिंग मशीन म्हणून वापरण्यात येत आहे अशी स्थिती भासते. त्यातही यावर्षी आयपीएल जेव्हा यूएईमध्ये भरवण्यात येत आहे तेव्हा वाळवंटातील खेळपट्टय़ा वेगवान बॉलरला मुळीच मदत करणार नाही, इथे स्पीन बॉलरचा बोलबाला असेल हे क्रि केट तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. जे खरंसुद्धा आहे. 
पण चार दिवसांपूर्वी रविवारी जे झालं ते अद्भुत होतं. एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर्स झाल्या. त्या दिवशी दोन सुपर ओव्हर्समध्ये वेगवान बॉलरनं जी कामगिरी केली ती अफाट होती. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की ते दोन्ही वेगवान बॉलर्स भारतीय आहेत.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी जो खेळ दाखवला ती आहे बॉलिंगची ताकद. आणि टेस्टमध्ये टिच्चून केलेल्या बॉलिंगच्या कौशल्याची कमाल.
भारतीय क्रि केट इतिहासातील बुमराह हा सर्वोत्तम वेगवान बॉलर आहे असं सोशल मीडियावर म्हटलं जातंच. जे खरंही आहे.
पण मोहम्मद शमी, योग्य यॉर्कर टाकणं हे वेगवान बॉलरसाठी अत्यंत कठीण काम असतं. यॉर्करसाठी प्रचंड शिस्त, सराव लागतो. संपूर्ण शरीराचा त्यात सहभाग असतो. बहुतेकवेळा कठीण आणि नाजूक परिस्थितीमध्ये यॉर्कर टाकताना तो फूलटॉस पडतो, तर क्वचित बीमर होतो. दोन्ही गोष्टी बॉलरला मारक ठरतात; पण फक्त पाच धावा वाचवताना सहाही बॉल्स मोहम्मद शमीनं अचूक यॉर्कर टाकले. त्यानंतर पुढचा इतिहास आता सर्वज्ञात आहे.
त्या दिवशी सामना कोणत्या टीमनं जिंकला हे महत्त्वाचं नसून दोन भारतीय वेगवान बॉलर्सने जो बॉलिंगचा शो केला तो अद्भुत होता.


के.एल. राहुलने परवा एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तो व संपूर्ण टीम सुपरओव्हरसाठी मानसिकरीत्या तयार नव्हती. कोणाला बॉलिंग द्यावी हेही समजत नव्हतं. फक्त पाच धावा केल्यावर सामना हरलोय हे सगळ्यांनी स्वीकारलं होतं; पण मोहम्मद शमीनं त्याला म्हटलं की तो सहाही बॉल यॉर्कर टाकू शकतो. 
लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात मोहम्मद शमीनं त्याच्या उत्तर प्रदेशातील फार्महाऊसच्या खेळपट्टीवर दररोज सराव केला. त्यामुळे जिथे बहुतेक सर्व खेळाडू आयपीएलमध्ये सुरुवातीला ‘आऊट ऑफ टच’ दिसलेत तिथे मोहम्मद शमी मात्र पहिल्या सामन्यापासून पूर्ण फॉर्ममध्ये आहे.               
लॉकडाऊनचा काळ त्यानं आपल्या बॉलिंगवर मेहनत करण्यात घालवला.  त्यामुळे तो नाजूक स्थितीत सहा सलग अचूक यॉर्कर टाकू शकला. याशिवाय मोहम्मद शामीनं ‘नकल बॉल’चं अस्रही आपल्या भात्यात वाढवलं आहे.
दीड महिन्यानी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जात आहे. चार कसोटी सामन्यांची मानाची मालिका भारत खेळणार आहे. शिवाय यात प्रथमच डे- नाइट कसोटी खेळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी भारताचे हे दोन्ही वेगवान बॉलर्स आता ऑस्ट्रेलिया दौर्‍यात जबरदस्त कामगिरी करतील आणि भारतीय फास्टर्सचा दरारा जगाला दाखवतील, अशी आशा आहे.
भारतात फास्ट बॉलर्स जन्माला येत नाहीत, ही जुनाट प्रथाच हे दोघं मोडीत काढून नवी वाट चालतील अशी आशा तरी आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)

Web Title: Bumra and Shami - will these two fasters get success in Australia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.