कॉपी? - ती तर होणारच!!

By Admin | Published: March 26, 2015 09:03 PM2015-03-26T21:03:47+5:302015-03-26T21:03:47+5:30

कॉपी रोखण्यासाठीच्या स्कॉडमध्ये गेली अनेक वर्षं काम करणार्‍या एका प्राध्यापिकेचा विषण्ण अनुभव

Copy? - That is going to happen !! | कॉपी? - ती तर होणारच!!

कॉपी? - ती तर होणारच!!

googlenewsNext

प्रा. डॉ.लीना पांढरे

 
कॉप्या कुठं कुठं लपवून ठेवल्या जातात म्हणून सांगू? शर्टच्या कॉलरमध्ये, बाह्या दुमडून त्यांच्या आत, मोजांमध्ये, बुटाच्या सोलच्या आत, कंबरेच्या रुंद बेल्टवर आतील बाजूने मार्करने लिहून ठेवतात. 
अंडरपॅण्टला खास खिसे शिवून त्यातसुद्धा चिठ्ठय़ा ठासून भरलेल्या असतात. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात मुली कमी नाहीत, ओढण्या, दुपट्टे, साड्यांच्या पदरांना आतून कागद स्टेपल करतात, मुद्दाम साड्या नेसून निर्‍यांमध्ये कागद ठेवतात, ब्लाऊजमध्ये चिठय़ा लपवतात, काही गजनी तर, अंगावर सगळं लिहून आणतात आणि मग करंगळी वर करत, शौचालयात जाऊन ते वाचतात, मग पेपर लिहितात!
बाकी, शिपायापासून सुपरवायजर, प्राध्यापक ते प्राचार्य मॅनेज केले जातात, काही कनवाळू तर स्वत: पेपर फळ्यावर लिहून देतात, शंभर टक्के रिझल्टसाठी भरारी पथकाला मॅनेज करतात!एवढं सगळं कशासाठी, तर पास होण्यासाठी! कॉपी रोखण्यासाठीच्या स्कॉडमध्ये गेली अनेक वर्षं काम करणार्‍या एका प्राध्यापिकेचा विषण्ण अनुभव
----------------------
 
दरवर्षाप्रमाणे यंदाही शाळा-कॉलेजच्या परीक्षांचा हंगाम धामधुमीत सुरू झाला. बारावीच्या परीक्षा आटोपल्या, दहावीच्याही संपत आल्या. आता मार्चअखेरीस डिग्री कॉलेजच्या परीक्षांची सुरुवात झाली. पदव्युत्तर परीक्षांचा धुराळा खाली बसायला थेट मेअखेर उजाडावी लागते. आपल्या देशात निवडणुकीच्या खालोखाल मोठी यंत्रणा राबवणारं, प्रचंड जिकरीचं, मोठ्ठं काम म्हणजे विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षांचं आयोजन करणं. परीक्षा सुखरूप पार पाडणं आणि मग ‘विद्यार्थ्यांचा निकाल’ लावण्याची प्रक्रिया; उरलेले सोपस्कार उरकणं!
लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुखरूप पार पाडणं ही सोपी बाब नाही राव! 
पण लक्षात कोण घेतो?
पेपरवाले, टीव्हीवाले, तमाम मीडियावाले कुठंतरी बिहारमध्ये स्पायडरमॅन होऊन परीक्षेला बसलेल्या गरीब लेकरांना कॉप्या पुरविण्यासाठी चार-सहा मजले उंच भिंत तानाजीच्या घोरपडीसारखे चढून जाणारी सज्जन मंडळी दाखवतात!  ‘व्हॉट्सअँप’वरून दहावीचा बीजगणिताचा पेपर परीक्षागृहातून बाहेर पाठवला गेला आणि लगेच उत्तरं तयार करून विद्यार्थ्यांना पुरवली गेली अशाही बातम्या आपण वाचल्या!  खरं तर गणित, इंग्रजी असले भयंकर विषय मुलाबाळांना मुद्दाम नापास करून मार्च-ऑक्टोबरच्या वार्‍या करायला लावायलाच निर्माण झालेले आहेत, हे कसं सांगणार कुणाला?
पण मुलांना आणि त्यांच्या पालकांना मात्र ते कळतं! त्यांना अभ्यासात काही रस नसतो म्हणून तर काही पालक आम्हाला भेटायला येतात आणि म्हणतात, ‘सर/मॅडम आमच्या पोरांना जरा मदत करा. तो नोकरी करतो, त्याला कॉलेजात येणं जमत नाही. अभ्यासाला वेळ मिळत नाही. तेवढं जरा परीक्षेच्या वेळी मोकळं सोडा.’ 
आमच्यातल्या कनवाळू हृदयाच्या काही मास्तरांना पाझर फुटतो. ते ‘समाजकार्य’ म्हणून पुरवतात सर्रास कॉप्या! त्यात या कॉपीमुळे झेरॉक्सवाल्यांचा धंदा केवढा तेजीत आलेला आहे. आमच्या इथल्या झेरॉक्सवाल्याने घरावर दुसरा मजला ‘नॅनो झेरॉक्सिंग ’म्हणजे रिडक्शन क ॉप्यांच्या जिवावर चढवला पहा ! नॅनो झेरॉक्सिंग ठाऊक नाही का? गाइड, शार्प, आशिष, प्रगती, नवनीत, २१ अपेक्षित, मोस्ट लाईकली क्वेशन्स असे महान ग्रंथ बारीक टायपात एकदम तहळाताच्या पंजाएवढं लहान झेरॉक्स करून तिथं ‘भेटतं !’
पोरं पण हुशार, परीक्षेच्या काळात कार्गोपॅन्ट घालतात! कारण तिला खूप खिसे असतात!! सुपरवायजरने एका खिशातलं मटेरियल काढुन घेतलं तरी दुसर्‍या खिशातलं वापरता येतं!! पोरं कॉप्या कुठं-कुठं ठेवतात म्हणून सांगू? शर्टच्या कॉलरमध्ये, शर्टच्या बाह्या दुमडून त्यांच्या आत, मोजांमध्ये, बुटाच्या सोलच्या आत चिठ्ठय़ाचपाट्या दडवलेल्या असतात. कंबरेच्या रुंद बेल्टवर आतील बाजूने मार्करने लिहून आणलेलं असतंच. अंडरपॅण्टला खास खिसे शिवून त्यातसुद्धा चिठ्ठय़ा ठासून भरलेल्या असतात.
स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात मुलीपण कॉपीच्या बाबतीत आघाडीवर!  ओढण्या, दुपट्टे, साड्यांच्या पदरांना आतून कागद स्टेपल केलेले असतात. साड्यांच्या निर्‍यांमध्ये कागद असतात. सलवारीवर - कमीजवर आतमधून लिहिलेले असतं. ब्लाऊजमध्ये चिठ्ठय़ा लपवल्या जातात. रायटिंग पॅडचा पुठ्ठा उचकटून मधे कागद घालून पुन्हा पॅड चिकटवले जातं. परीक्षकांनी विचारलंच तर पोरं डौलात रूमाल झटकून दाखवतात, पण रुमालाच्या मध्ये कागद स्टेपल केलेले असतात, जे फक्त सराईत मास्तरांच्याच ध्यानात येतं, बाकीच्यांना ते कागद दिसतही नाही!
याशिवाय मैत्रीला तर तोडच नाही! दारं खिडक्यातून मित्रमंडळी कागदाचे बाण आणि कागदाचे बोळे यांचा वर्षाव करत असतातच! गणित, अकाउण्टन्सी या पेपरांच्या वेळी पोरंपोरी पेपर लिहिताना एकमेकांशी एवढी बडबड करतात की, परीक्षा हॉलला भाजीबाजाराचं स्वरूप येतं. याशिवाय पर्सेस, कंपासपेट्या, दाराच्या फटी, बेंचेसमधल्या फटी, खिडक्या यांचा उपयोग चिठ्ठय़ाचपाट्या लपविण्यासाठी केला जातो. कधी खिडकीला दोरा बांधून बाहेर गाइड लोंबत ठेवलेलं असतं. संधी मिळाली की, ते वर ओढून घेता येतं. टॉयलेटला जायच्या बहाण्यानं अंगावर लिहून आणलेलं वाचता येतं. हे गझनी शरीरावर बारीक अक्षरात बरंच काहीबाही लिहितात ते शौचालयात जाऊन वाचतात, आल्यावर जोमानं पेपर सोडवतात. काहीजण तर  पाणी द्यायला येणार्‍या कॉलेजातल्या शिपायांना मॅनेज करून ठेवतात. ते शिपाई मग  बाहेरून चिठ्ठय़ाचपाट्या आणून देतात.
खेड्यापाड्यातली पोरं काही कमी नसतात. खेड्यापाड्यात शाळा, कॉलेजच्या गच्यांवर, पाण्याच्या टाक्यांवर, उंच झाडांवर टेहळणी करायला खास मावळे बसवले जातात. स्कॉडवाल्यांची म्हणजे कॉप्या पकडणार्‍या भरारी पथकाची मोटारगाडी लांबून दिसली रे दिसली की आरोळ्या ठोकून तमाम कॉलेजला सावध केलं जातं ! मग भराभरा कॉप्या गोळा करून सगळा वर्ग शांतपणे पेपर सोडवायला लागतो. भरारी पथकाला परीक्षा एकदम आलबेल, सुरळीत सुरू आहे, असं दृश्य पहायला मिळतं. कधी कधी ‘भरारी मारणारी’ मंडळीही मॅनेज होणारी असतेच मग  संबंधित कॉलेजचे प्राचार्य त्यांची किती आवभगत करतात ते विचारू नका.
म्हणतात, ‘बसा राव !’ उन्हाचे आलात, जा हो नंतर वर्गात. बाळू जरा थंड सरबत आण !  आता जेवूनच जा’ असा प्रेमळ आग्रह करतात. मग काय तोवर तिकडे पेपर संपतोही कॉपी करत! सगळेच सुखात!
कधी कधी तर भरारी पथकातले प्राध्यापक स्वत: फोन करून कॉलेजात प्राचार्यांना कळवतात. ‘आम्ही बारा वाजेपर्यंत पोहोचतोय!’ मग त्यावेळेस सगळे शहाणे शिस्तीत पेपर सोडवतात. किती ही परोपकारी भावना, एकमेकांना मदत, काही विचारू नका ! पण काही सेंटर्सना ‘मास कॉपी’ चालते म्हणजे सुपरवायजरच ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं स्वत: फळ्यावर लिहून देतात. डायग्रॅमस् फळ्यावर काढून देतात. किती ते परस्पर सहकार्य, त्याला तोडच नसते परीक्षा काळात!
पण काही काही प्रामाणिक प्राध्यापक असतात भरारी पथकात. ते कुठल्याच मोहात न अडकता प्रामाणिकपणे भरार्‍या मारत, अतिप्रामाणिकपणे सुपरव्हिजन करतात. ही मास्तर मंडळी जरा जास्तच कडक असतात! केवळ त्यांच्याचमुळे अनेक कॉलेजचा शंभर टक्के रिझल्ट लागत नाही!
बाकी सगळे कॉपी बहाद्दर, महाबहाद्दर, एकमेकांना प्रचंड सहकार्य करत राहतात! 
अनेकदा परीक्षेच्या काळात मास्तरांच्या गाड्या पंक्चर होतात, त्यांना धमक्या दिल्या जातात. दहावी-बारावीचा निकाल शंभर टक्के लागला पाहिजे असं टेन्शन व्यवस्थापनाकडूनच त्यांच्या डोक्यावर ठेवलं जातं. कधी कधी पार वरच्या साहेबांचा फोन येतो. कधी साहेबाचे चिरंजीव परीक्षेला बसतात, मग त्यांना कसं हटकायचं, असा प्रश्न पडतो. ‘मी कोण आहे ठाऊक आहे का?’ असं दरडावून एखादा विद्यार्थी विचारतो तेव्हा मऊ मंजूळ आवाजात ‘बाळा तू पेपर लिही’ असं प्राध्यापक सांगतात आणि गोड बोलून त्याच्याकडच्या जमेल तेवढय़ा चिठ्ठय़ाचपाट्या काढून घेतात. तेवढा एकच उपाय त्यांच्या हातात असतो. 
गेली कित्येक वर्षे परीक्षेच्या हंगामात कॉपीला असे सुगीचे दिवस आलेले दिसतात, पण त्या सगळ्याचा खेद मुलांना तर सोडाच अनेक पालकांनाही नसतो! आणि शिक्षक-सुपरवायजर; त्यांनाही आपण कॉपी पुरवतो याचा खेद नसतो, ना खंत वाटते!
 
गरीब मास्तराने करायचं काय? 
 परवाचीच गोष्ट, खेडेगावतलं दूरवचं एक कॉलेज. तिथं बारावीची परीक्षा सुरु होती. एक अपंग विद्यार्थी त्याच्या लेखनिकासह स्वतंत्र वर्गात परीक्षा देत होता. दोन वाजता पेपर सुटल्यावर सारी मुलं निघून गेली. अपंग मुलाला मात्र अर्धा तास जास्त दिलेला होता. 
तेवढय़ात सिनीअर कॉलेजची पोरं स्वत:हून त्या मुलाला मदत करायला वर्गात घुसली.  पण तिथला सुपरवायजर भलताच सिन्सिअर. तो पोरांना कॉपी पुरवू देईना. मग पोरांनी मास्तराची गच्चीच धरली. बापड्या मास्तराचा श्‍वास कोंडला.  वर्गाला कुलपं घालायला आलेल्या शिपायांनी ते दृष्य पाहून बोंब ठोकली आणि बाकीचे लोक धावून आले. मग त्या मास्तराची सुटका झाली. रात्री थेट बारापर्यंत कॉलेजातले निम्मे लोक पोलीस स्टेशनात होते, पण काय उपयोग झाला? दुसर्‍या दिवशी गुंडागर्दी करणारी ती पोरं विजयी मुद्रेने कॉलेजात फिरत होती. आता सांगा गरीब मास्तराने करायचं काय? 
 
 
( स्कॉड अर्थात भरारी पथकाच्या सदस्य म्हणून राज्यभर कॉपी निरीक्षक म्हणून काम केलेल्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षक आणि पालकही कॉप्या पुरवायला कसा हातभार लावतात, हे त्यांनी  गेली अनेक वर्षे प्रत्यक्षच पाहिलेलंआहे.)

 

Web Title: Copy? - That is going to happen !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.