दीपिका पदुकोन / लोकमत दीपोत्सव
खरं तर सगळं छान चाललं होतं.हातात नवं प्रोजेक्ट होतं.त्यातली नवी आव्हानं होती.स्वतर्मधल्या क्षमता नव्यानं गवसत होत्या. उणिवांवर मात करण्याच्या प्रयत्नांमधला आनंद सापडू लागला होता;- आणि अचानक सगळं बदलत गेलं.सगळं नीट चालू असताना अचानक आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं. कामाच्या, स्नेहाच्या माणसांबरोबरच्या सवयीच्या संवादात मध्येच अडथळे यायला लागले. कुणीतरी आपल्याशी काही बोलत असावं आणि बटण बंद करून दिवा विझवल्यासारखा अंधारच वाटेत यावा, तसं ! आतून अचानक विझल्याचे हे क्षण माझ्या सवयीचे नव्हते. सुरुवातीला गडबडले. नंतर सावरून घ्यायला शिकले. तो तुटला क्षण पटकन उचलून मागचा संवाद पुढे चालूच असल्याचं दाखवणं, हा तर माझ्या व्यवसायाचाच भाग होता. ती चतुराई मला सवयीनं साधत गेली. शूटिंग सुरू आहे, मी सेटवर आहे, पुढल्या सीनची चर्चा करते आहे. स्क्रिप्ट्स-डायलॉग्ज-कॉश्चुम्स-रिहर्सल्स-शूट यांनी गजबजलेल्या दिवसाला सामोरी जाते आहे.. इव्हेण्ट आहे, अवॉर्ड शोज आहेत, त्या आधीची तारांबळ आहे.. मी मित्रमैत्रिणींबरोबर डिनरला आले आहे, गप्पांना उधाण आलं आहे.. मी प्रवासात आहे, पोहचल्यावर तिथं जाऊन करायच्या कामांबद्दलचे तपशील, तिथल्या मिटिंग्जमध्ये चर्चेला येणारे विषय अशा नेहमीच्या गोष्टींबद्दल माझी टीम मला अपडेट्स देते आहे.... हे सगळं आधी होतं तसं चालू आहे. ताज्या यशानं नव्या जबाबदार्या आणल्या आहेत, त्यामुळे या धावपळीचा वेग वाढला आहे.. त्याबरोबर आलेल्या नव्या आव्हानांशी मी सगळ्या शक्तीनिशी झगडा मांडला आहे..आणि या लढणार्या शरीरातलं, त्यामागे धावणार्या मनातलं काहीतरी बिनसलं आहे !असं काहीतरी, जे माझ्या सवयीचं नाही. परिचयाचं नाही.डोकं दुखतं. पोट ठीक नाही. शरीरात कुठंतरी असह्य वेदना आहे. या गोष्टी समजतात. त्यावर उपाय केला पाहिजे हे कळतं. त्यामागची कारणंही अनेकदा आपली आपल्यालाच शोधता येतात. ताण आहे. खाण्यापिण्याकडे नीट लक्ष नाही. धावपळ फार झाली. थोडी विश्रांती घेतली की शरीराचा थकवा जाईल. ताण आणणारे विषय-माणसं यांच्याशी ‘डील’ करणंही सवयीनं शिकतोच आपण. .. इथं मी एकटी होते..आणि मला नेमकं काय होतं आहे, हे माझं मलाच कळत नव्हतं.मध्येच विझणार्या दिव्यासारखी अचानक आटून जाणारी एनर्जी. कुणाशी काही बोलता-बोलता अचानक काही म्हणता काही न सुचून मध्येच तुटू पाहणारा संवाद. उगीचच डोळे भरून येणं. सगळ्यापासून दूर पळावंसं वाटणं. आपल्याशी कुणी काही बोलायला येऊ नये, नको त्या क्षणी आपण पकडले जाऊ नये अशी एक विचित्र तळमळ.होता होईतो या अशा विचित्र भावनांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या वर येऊ पाहतात, तर त्यांना आणखीच आत, अंधारात लोटत राहतो. त्या जणू नाहीतच असं स्वतर्ला पटवू पाहतो.मीही तेच करत होते.पण मनाआड दडपलेल्या गोष्टीचं गाठोडं गाठीच्या आत राहीना. हळूहळू ते फुटू लागलं.हे ‘बोलणं’ सोपं नसतं. ती अवघड वाट मी चालले. मी ती हिंमत केली आणि मला मदत करणार्या डॉक्टरांसमोर माझं मन उघडं केलं. पिंजर्यात कोंडून घातलेल्या श्वापदासारखी अवस्था होती माझी. बाटलीत बंद केलेला प्राण असावा कुणाचा तशी तगमगीची अवस्था.मला मोकळं व्हायचं होतं. सुटका हवी होती..