शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

मोबाइल ड्रेनेजमध्ये पडतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 7:00 AM

मोबाइलचा टॉवर शेतात आला. त्यापायी आता कंपनी दर महिन्याला पैसे देते म्हणून काहीजण राबायचं थांबले.

- माधुरी पेठकर

मोबाइल म्हणजे संपर्काचं अत्याधुनिक साधन. पण  मोबाइल आता अन्य साधनांसारखा दुय्यम राहिला नसून तो हातालाच फुटलेला एक अवयव झाला आहे. खरं तर मोबाइलच्या फीचरप्रमाणे मोबाइलची ओळखही सतत अपग्रेड होतेय. एका साधनाचं रूपांतर मुख्य गरजेत कसं होतं हे मोबाइलकडे पाहिल्यावर सहज समजतं.  पोटातल्या भुकेच्या तीव्रतेइतकी काहींना मोबाइल डाटाची चिंता सतावू लागली आहे. 

पण या मोबाइलने माणसांतला प्रत्यक्षातला, जिव्हाळ्याचा संवाद गिळला आणि आता वास्तवाचं भान , माणसाचं स्वत:शी असलेलं नातं हा मोबाइलमधला छुपा राक्षस गिळू पाहतोय का?

विक्रांत बदरखे या तरुण दिग्दर्शकानं ‘ड्रेनेज’ या आपल्या 15 मिनिटांच्या मराठी लघुपटात मोबाइलमधल्या या राक्षसाचा वेध घेतला आहे. ड्रेनेज ही शॉर्ट फिल्म मोबाइलनं निर्माण केलेल्या समांतर जगावर काही न बोलता फक्त दृश्याच्या माध्यमातून टोकदार भाष्य करते. या फिल्मचा नायक अंबादास. त्याच्या हातातला स्मार्टफोन त्याला ( आणि आपल्यालाही) वास्तवातून फुटून वास्तवाशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका समांतर जगात घेऊन जातो. 

 

अंबादास हा पुण्याजवळच्या एका खेड्यात राहणारा  शेतकरी किंवा शेतमजूर असावा. तो त्या दिवशी एक वेगळ्याच आनंदात असतो. धावतपळत सिक्ससीटर पकडून तो सकाळी सकाळी शहर गाठतो. पुण्यात आल्या आल्या तो एका मोबाइलच्या दुकानात शिरतो. तिथे मोबाइमधल्या एका खेळात दंग झालेल्या सेल्सगर्लला आवाज देऊन तिला भानावर आणतो. खिशातून एक कागद काढून औषधांची प्रीस्क्रिप्शन ठेवावी तसा तो कागद  तिच्या पुढय़ात ठेवतो. त्या कागदावर अंबादासनं एक मॉडेल नंबर लिहून आणलेला असतो. तो बघून ती त्या फोनमध्ये आलेल्या लेटेस्ट व्हर्जनची माहिती देते. अंबादासच्या भाषेतला वॉटरप्रूफ असलेला एक स्मार्टफोन अंबादासला काढून देते. अंबादास आपल्या खिशातला जुनाट फोन दुकानात देतो. आणि जुना एक्सचेंज करून काही हजार रुपये भरून नवीन फोन घेतल्याच्या खुशीत बाहेर पडतो.

हातातल्या स्मार्टफोनमुळे अंबादासला अगदीच भारी वाटत असतं. तो छाती काढून रस्त्यावरून चालू लागतो. नुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनमुळे आलेली ऐट मिरवत चालत असतानाच तो आपल्या मित्राला आप्प्याला फोन लावतो. आपण स्मार्टफोन घेतल्याचं सांगतो. तो फोनमधल्या फीचरबद्दल ओ का ठो माहीत नसलेला अंबादास लॉलीपॉप, गोरिला, टचस्क्रीन असे शब्द फेकत आपल्या फोनचं कौतुक करत असतो. तितक्यात अंबादासला एक दुचाकीस्वार कट मारून निघून जातो. अंबादास गडबडतो. गोंधळतो. हातातला फोन निसटून कुठे पडला हे शोधू लागतो. आणि नुकताच कौतुकानं घेतलेला तो स्मार्टफोन ड्रेनेजमध्ये पडलेला बघून अंबादासचा धीरच सुटतो. तो जीव तोडून ते ड्रेनेजचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करतो; पण ते सीमेंटनं पक्क केलेलं असल्यामुळे ते उघडत नाही. तो हताशपणे ड्रेनेजमध्ये निपचित पडलेल्या फोनकडे पाहात राहातो.

सकाळपासून रात्रीपर्यंत अंबादास त्या फोनच्या काळजीपोटी त्या ड्रेनेजभोवतीच घुटमळत राहातो. कधी तो एकटा प्रयत्न करतो. कधी प्रयत्न करताना त्याच्या आजूबाजूला माणसांची गर्दी जमते. पण ती गर्दी आपापली मतं व्यक्त करण्यापलीकडे अंबादासला मदत करत नाही. रात्रीच्या काळोखातही अंबादास एकटा ड्रेनेजजवळ बसून राहातो. दिवस उजाडल्यावर तो पुन्हा प्रयत्न सुरू करतो. पण आता त्याच्या प्रयत्नांचं रूपांतर एका संघर्षात होतं. हा संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती हाच या फिल्मचा मूळ गाभा आहे. फिल्म संपल्यानंतर एका भयानक स्वप्नातून जाग आल्यानंतरची सुन्नता मनाला आणि डोक्याला व्यापून राहाते.

15 मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये विनोद, संघर्ष आणि नाट्य या तीन गोष्टींद्वारे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक गुंतून राहातो. प्रेक्षकांना गुंतून ठेवणं हेच विक्रांतचं मुख्य ध्येय होतं. त्याला आपल्या फिल्ममधून एका शब्दाचाही  उपदेश करायचा नव्हता. तर एका शॉर्ट फिल्मच्या मर्यादित  अवकाशात त्याला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारं नाट्य निर्माण करायचं होतं.

विक्रांत म्हणतो,  ‘आपण मोबाइल अँडिक्ट आहोत हे एव्हाना सर्वांनीच मान्य करून टाकलंय; पण या मोबाइलनं निर्माण केलेलं समांतर जग मात्र अजून कोणाच्या लक्षात येत नाहीये. या जगात कमालीचा विरोधाभास आहे. येथे प्रचंड गर्दी आहे आणि जीवघेणा एकांत आहे. येथे  मतांचा, टिप्पण्यांचा कोलाहाल आहे आणि आपल्याला आपलं काहीही व्यक्त करता येत नाही ही जीवघेणी घुसमटही आहे.’ या समांतर जगाचा एक अंधारा चेहरा विक्रांतला दाखवायचा होता. 

मोबाइलचा टॉवर शेतात आला. त्यापायी आता कंपनी दर महिन्याला पैसे देते म्हणून काहीजण राबायचं थांबले. मोबाइलनं आळसावलेली लोकं विक्रांतनं आपल्या गावात, आपल्या घरात बघितली होती. मोबाइलची राक्षसी ताकद विक्रांत स्वत: अनुभवत होता. त्या अनुभवातूनच विक्रांतला ड्रेनेजची कथा सूचली. विक्रांतला फिल्म बनवण्यासाठी कोणी अर्थसाहाय्य करत नव्हतं. त्याचदरम्यान विक्रांतला नवाजुद्दीन सिद्धकी आणि मॅजिक इफ या संस्थेनं आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्मच्या स्क्रीप्ट रायटिंग स्पर्धेविषयी समजलं. त्यानं त्या स्पर्धेसाठी आपली स्क्रीप्ट पाठवली. त्या स्पर्धेत भारतभरातून 1500 स्क्रीप्ट आल्या होत्या. त्यातून 5 स्क्रीप्टची निवड झाली. त्यात विक्रांतची ड्रेनेजची स्क्रीप्ट होती. आणि मग त्याच संस्थेनं ही फिल्म बनवण्यासाठी विक्रांतला अर्थसाहाय्य केलं.

विक्रांत मूळ विदर्भातल्या अकोल्याचा. तो पुण्यात शिकण्यासाठी आला. एस. पी. कॉलेजात बी.ए.ला अँडमिशन घेतले. सोबत तो यूपीएससीची तयारी करत होता. तोपर्यंत त्याचा आणि फिल्मचा संबंध नव्हता. त्याला अधिकारी व्हायचं होतं; पण नाट्य चळवळीशी जोडल्या गेल्यानंतर त्याला नाटक आवडू लागलं, फिल्म आवडू लागल्या. आणि त्याचं स्वप्न बदललं. नंतर विक्रांत मुंबईत आला. वेगवेगळ्या टेलिव्हिजन शोचं लेखन करू लागला. काही फिल्मला असिस्ट केलं. ते करताना स्वत:चं काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली, तेव्हा विक्रांतनं ड्रेनेज ही फिल्म करायची ठरवलं.

नंदू माधव यांनी या फिल्ममधला अंबादास साकारला आहे. शॉर्ट फिल्म असली म्हणून काय झालं पण ताकदीचा अभिनय इथेही होऊ शकतो हे ड्रेनेज ही फिल्म बघताना जाणवत राहातं.  एका चकचकीत आणि आधुनिक साधनाची काळी बाजू दाखवणारी ड्रेनेज ही फिल्म सध्या विविध चित्रपट महोत्सवातून दाखवली जातेय.( समाप्त)