डोळ्यात जांभळं-पांढरं काजळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 05:02 PM2019-05-15T17:02:17+5:302019-05-15T17:05:58+5:30
डोळे भरून काजळ लावण्याची फॅशन जुनी होत नसते; पण काजळही आता काळं राहिलं नाही आणि आयलायनरही! भडक-झगमगीत रंगांनी डोळ्यार्पयत झेप घेतली आहे.
भक्ती सोमण
गेल्या आठवडय़ात प्रियांका चोप्राच्या मेटगाला लूकची भारी उलटसुलट चर्चा झाली. तिथले बाकीचेही लूक चित्रविचित्र होतेच. अर्थात तो इव्हेंट त्याचसाठी असतो. मात्र त्यानंतर अनेकांच्या मेकअपच्या, स्टाइल्सच्या चर्चा रंगल्या.
प्रियांकाच्या लूकबरोबरच पर्पल रंगाच्या भडक लिपस्टिकसह डोळ्यांच्या मेकअपचीही चर्चा झाली. अर्थात फॅशन इव्हेंटमध्येच नाही तर ब्राइट, भलभलत्याच रंगाच्या लिपस्टिक वापरण्याचा हल्ली ट्रेण्ड आहेच. लिपस्टिकमध्ये विविध कलरच्या शेड्स आजकाल सर्रास वापरल्या जातात.
जे लिपस्टिकचं तेच आयलायनरचं. आयलायनर म्हणजे फक्त काळं हा समजच आता मागे पडला आहे. आता आयलायनरचे इतके रंग आणि कॉम्बिनेशन आहेत की, ते कुणीही हौशी अगदी सर्रास वापरू शकतो.
मात्र त्यातले नवीन ट्रेण्डही कलरफुल आहेत.
डबल विंग आयलायनर
प्रियांका चोप्राने मेटगालामध्ये जे लायनर लावलं होतं ते साधारण या प्रकारात मोडणारं आहे. हे आयलायनर वरच्या आणि खालच्या दोन्ही पापण्यांवर लावलं जातं. हा लूक दिसायला खूपच बोल्ड आणि स्टायलिश असतो. पक्ष्याच्या पंखांसारखं लायनर डोळ्याभोवती दिसतं. प्रियांकाने पांढर्या आणि जांभळ्या रंगाचा वापर केला होता. मात्र या आयलायनर लावण्याच्या पद्धतीनं कुठल्याही रंगाचं आयलायनर लावता येतं.
ग्लिटरी आयलायनर
यात आपण जो ड्रेस घालणार आहोत त्या ड्रेसच्या रंगाशी आयलायनर मॅच करता येते. बोल्ड रंगाच्या शेडमध्येसुद्धा हे लायनर वापरता येतं. साधारणपणे अशा प्रकारचे आयलायनर दीपिका पदुकोनने वापरले होते. तिच्या ड्रेसबरोबरीने लायनरही उठून दिसत होते.
मल्टिकलर आयलायनर
मल्टिकलर आयलायनर लावताना डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात दोन्ही वेगवेगळ्या रंगाचे आयलायनर लावले जातात; पण जर यात ब्राईट शेड्स वापरल्या तर ओव्हर मेकअप लूक दिसून येतो.
डबल आयलायनर
या स्टाइलमध्ये आयलायनरच्या वर एक ते दोन स्ट्रोक लावले जातात. यामध्ये दोन वेगवेगळे शेड्स लावता येतात. त्यामुळे दिसायला हे एकदम हटके दिसतं.
मेटॅलिक आयलायनर
या स्टाइलसाठी मेटॅलिक आयलायनरचाच वापर करावा. यासाठी मेटॅलिक आयलायनर पेन्सिलने डोळ्यांच्या वरच्या भागावर आउटर एरियावरून आतल्या बाजूला लावायची. असंच खालच्या बाजूच्या भागावरही करायचे. पार्टी लूकसाठी अशा स्वरूपाचं आयलायनर एकदम योग्य आहे.
शिमरी आयलायनर
शिमरी आयलायनर ग्लिटरी आयलायनरप्रमाणेच लावता येतं. मात्र यात ग्लिटरच्या तुलनेत लहान लहान पार्टिकल्स असतात. जे चकचक करतात; पण डोळ्यांना ग्लिटरी लूक देत नाहीत.
इजिप्शियन आयलायनर
या स्टाइलमध्ये लायनर थोडं बोल्ड आणि वरच्या दिशेने लावतात. यामुळे डोळे मोठे दिसतात. सध्या विविध इव्हेंट, कार्यक्रम यासाठी हे लायनर वापरलं जातं.
कॅट आयलायनर
या स्टाइलमध्ये पापणीवर लायनर लावतो तिथे आणि डोळ्यात काजळ घालतो ते एकमेकांना जोडतील अशा रेषा काढल्या जातात. त्यातून कॅट लूक देण्याचा प्रय} केला जातो.
थिन आयलायनर
ही स्टाइल टीनएज मुलींवर चांगली दिसते. डोळ्यांवर आयलायनरचा पातळसा लेअर द्यावा लागतो. ही सर्वात सोपी स्टाइल आहे.
व्हाइट लायनर
काळं आयलायनर लावण्याचा ट्रेण्ड केव्हाच मागे पडला. निळ्या रंगाचंही लायनर वापरलं जातं. मात्र आता व्हाइट आयलायनरची चलती आहे. डोळ्यांच्या खालच्या भागावर ज्याप्रमाणे काजळ लावतो त्याप्रमाणे आतल्या बाजूला व्हाइट आयलायनर लावतात. आणि डोळ्यांच्या वरच्या भागावर कोणत्याही इतर रंगाचं आयलायनर लावलं जातं. त्यामुळे डोळ्यांखाली लावलेलं व्हाइट आयलायनर जास्त उठून दिसतं.