शेतमजूर ते मॉडेल व्हाया पोलीस अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:00 AM2021-03-11T08:00:00+5:302021-03-11T08:00:12+5:30
लहानपणी शेतात मोलमजुरी करणारी ती कष्टकरी पोर मोठेपणी पोलीस अधिकारी बनेल आणि त्याचवेळी ‘मिस इंडिया’ स्पर्धाही गाजवेल, असं कोणाला वाटलं नव्हतं; पण पल्लवी जाधव यांनी पीएसआय आणि ‘मिस इंडिया’ स्पर्धा, अशा दोन्ही ठिकाणी आपली छाप पाडली. त्यांच्या खडतर प्रवासाची ही कहाणी..
- रुचिका सुदामे - पालोदकर
आपल्या मायबापासोबत आणि गावातल्या पाेरीसोरींसोबत १०० रुपये रोजाने ती शेतात कामाला जायची. तेव्हा आकाशात उंचच उंच झेप घेतलेलं विमान तिला रोज दिसायचं आणि खुणवायचं. टीव्ही पाहायची तेव्हा टीव्हीतल्या मॉडेल तिला आकर्षित करायच्या आणि आपणही त्यांच्यासारखंच हिरॉइन व्हावं, असं तिला खूप वाटायचं. रात्री बऱ्याचदा तर स्वप्नही तशीच पडायची की ती हिरॉइन झाली आहे आणि छानछान कपडे घालून निसर्गरम्य ठिकाणी शूटिंग करतेय; पण मग जाग आली की, स्वप्न विरून जायचं आणि गरिबीच्या असंख्य खाणाखुणा असलेलं झोपडीवजा घर सभोवताली दिसू लागायचं; पण विमानात बसायचं आणि मॉडेल म्हणून मिरवायचं ही तिची दोन्ही स्वप्नं एका झटक्यात पूर्ण झाली आणि कधीकाळी शेतात राबून, मोलमजुरी करून पोट भरणारी ती कष्टकरी पोर आज पीएसआय आणि मिस इंडिया स्पर्धेची सौंदर्य सम्राज्ञी म्हणून थाटात मिरवू लागली.
एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी ही कहाणी आहे पल्लवी शशिकला भाऊसाहेब जाधव या तडफदार आणि आत्मविश्वासाने ओतपोत भरलेल्या पोलीस अधिकाऱ्याची आणि शेतमजूर ते मॉडेल व्हाया पोलीस अधिकारी या प्रवासाची.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या जालना जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पल्लवी यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या प्रतिमेला नवे आयाम दिले आहेत. त्यांची ही कथा खरोखरच रंजक असून स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या; परंतु थोड्या थोडक्या अपयशाने खचून जाणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
शेतीत मोलमजुरी ते सौंदर्य स्पर्धा हा प्रवास कसा सुरू झाला, हे विचारताच पल्लवी यांनी आपल्या आयुष्याचीच कहाणी सांगितली.
पल्लवी म्हणतात, त्यांचा जन्म झाला तेव्हा दोन बहिणींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाली म्हणून सगळेच दु:खी झाले होते; पण दिवस-मास सरत गेले आणि पल्लवी शाळा आणि शेतमजुरी दोन्ही सांभाळू लागल्या. गावातल्या प्रथेप्रमाणे त्यांच्या दोन्ही थोरल्या बहिणी जेमतेम शिकताच त्यांची लग्नं उरकली गेली. पल्लवी १५-१६ वर्षांच्या होताच त्यांचे हात कधी पिवळे करणार म्हणून गावकरी आई-बापाच्या मागे लागले; पण अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार असल्याने माय-बापाने पल्लवी यांना पदवीपर्यंत शिकू दिले.
लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात झाली, तेव्हा एका परिचिताने पल्लवीला एमपीएससी करू द्या, असा सल्ला आई-वडिलांना दिला. तोपर्यंत पल्लवी यांनी कधी एमपीएससी हा शब्दही ऐकलेला नव्हता. आई-वडिलांनी तो सल्ला ऐकणं आणि त्यासाठी बचत गटाकडून ५ हजार रुपयांचं कर्ज काढून पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला पाठविणं हे खरोखरच माझ्यासाठी स्वप्नवत होतं, असं पल्लवी सांगतात.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमए सायकॉलॉजी करता करता त्यांनी एमपीएससीची तयारी सुरू केली आणि ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. एक वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण करून त्या जालना जिल्ह्यात रुजू झाल्या.
पोलीस अधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पल्लवी यांचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले; पण मॉडेल, अभिनेत्री व्हायचं स्वप्न मात्र अजूनही हृदयाच्या एका कोपऱ्यात घर करून बसलेलंच होतं. अशातच सोशल मीडियावर त्यांना ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेच्या जाहिरातीच्या रूपात दुसरं स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग दिसला. अर्ज भरला, ऑनलाइन पद्धतीने काही ऑडिशन झाल्या आणि स्पर्धेची फायन लिस्ट म्हणून निवड झाल्याचा फाेनही आला; पण अशातच कोरोनाने धडक मारली आणि स्पर्धा पुढे ढकलली गेली.
याविषयी सांगताना पल्लवी म्हणतात, हे ऐकून मी निराश झाले; पण मग २०२१ मध्ये जयपूर येथे स्पर्धा होत आहे, असे समजले. स्पर्धेसाठी अवघा एका महिन्याचा वेळ राहिला होता आणि आता मला एक मॉडेल म्हणून स्वत:ला तयार करायचे होते. उंच टाचाच्या चपला तर मी कधी घातल्याच नव्हत्या. त्या चपला घालून चालायचा सराव करणे, मॉडेलसारखा रॅम्प वॉक करायला शिकणे, स्पर्धेसाठी हाय- फाय आणि स्टायलिश कपडे घेणे, मेकअपचे सामान घेणे अशी अनेक गोष्टींची तयारी करायची होती. दिवसभर पोलिसाची नोकरी आणि नंतर मॉडेल होण्यासाठीचा सराव अशी कसरत सुरू होती. स्पर्धेसाठी आलेल्या इतर मुली मोठ्या शहरातल्या होत्या; पण या गोष्टीचा मला कधी न्यूनगंड वाटला नाही. उलट पोलीस अधिकारी म्हणून मला सन्मानच मिळत गेला.
एकेका राऊंडमध्ये चमकदार कामगिरी करत पल्लवी पुढे सरकत होत्या. अशातच नॅशनल थीम राऊंड आला. यामध्ये भारतीय परंपरा सांगणारी वेशभूषा करणे आवश्यक होते. यात पल्लवी यांनी नऊवारी, एका हातात फावडे, डोक्यावर पाटी आणि त्या पाटीमध्ये खुरपं आणि अन्य शेतीसाठी लागणारी अवजारं असं ३ ते ४ किलोचं ओझं, पायात चार इंच उंचीची हिलची सॅण्डल अशा महाराष्ट्रीयन शेतकरी महिलेच्या वेशभूषेत दणकेबाज रॅम्प वॉक केला. आत्मविश्वासाने वावरणाऱ्या पल्लवी या स्पर्धेच्या फर्स्ट रनर अप ठरल्या आणि मिस फोटोजेनिक हा किताबही त्यांनी पटकाविला.
त्यांना चित्रपटासाठी विचारणाही झाली आहे; पण पल्लवी सांगतात, अभिनेत्री, मॉडेलिंग हे माझ्यासाठी केवळ पॅशन आहे, माझी नोकरी हे माझं कर्तव्य आहे.
पल्लवी आज आपल्या पालकांसाठीच नव्हे, तर गावासाठीही भूषण आहेत.
(रुचिका औरंगाबादच्या लोकमत आवृत्तीत उपसंपादक आहे.)
ruchikapalodkar@gmail.com