आपण करु ती फॅशन!
आपला कम्फर्ट, आपली सोय
आणि आपला लूक ती म्हणजेही फॅशनच
असं सांगणारा
आणि सॉफ्ट कलर्ससह
साधेपणा आणणारा फॅशनचा
कॉलेजात जाणाऱ्या तमाम मुलामुलींना रोज सतावणारा प्रश्न म्हणजे आज काय घालायचं? तोच डे्रस, तीच स्टाइल आणि तोच लूक ही गोष्ट तारुण्यासाठी बोअरिंगच असते. त्यात आता तर काय तरुणतरुणींना नेहमीच फॅशनसोबत चालायला आवडतं. आणि फॅशन बदलायला एक पिक्चरसुद्धा पुरेसा असतो. फॅशन नवीन आहे, ती आपण करून बघितली तर बाकीचे काय म्हणतील, आपल्याकडे बघून कुणी हसणार तर नाही ना असले प्रश्न फॅशन कॅरी करताना आजकालच्या मुलामुलींना पडत नाहीत.
त्यात आता तर काय फॅशनची दुनिया रोज उठून बदलत असते. पण म्हणून काही कोणी रोज नवीन स्टाइलचे कपडे घालून कॉलेजात जात नाही. जाऊ शकत नाही. ते परवडायलाही हवं ना. फॅशन ही नेहमी आवड, गरज आणि पैसा या तीन गोष्टींचा विचार करूनच केली जाते. आणि अशी फॅशन मग वर्षातून एकदा तरी बदलते.
एकेकाळी फॅशन म्हणजे लांबून दिसणारी, छान छान वाटणारी, सिनेमातल्या हिरोहिरॉईन्सनं करायची आणि आपणही करून बघावी असं वाटायला भाग पाडणारी गोष्ट असे. पण तसं काही स्वत: करणं अनेकांना अस्वस्थ करणारं वाटायचं. ते कॅरी करणं अवघड व्हायचं. पण सध्या फॅशनची ही व्याख्याच बदलून गेली आहे.
फॅशन म्हणजे काय तर सर्वांना सहज करून बघता येणारी, कोणावरही शोभून दिसणारी गोष्ट. तीच खरी फॅशन.
आजपासून नवीन वर्ष सुरू होतंय. यावर्षी तारुण्याच्या अंगाखांद्यावर, हातापायात नेमकं काय फॅशनेबल असणार याबाबतची उत्सुकता खुद्द तरुणांनाही असते. मार्केटमधल्या न्यू अरायव्हलची जाणीवही असतेच. आणि ही जाणीव डोळ्यासमोर ठेवून २०१६ मधल्या तरुण फॅशनची वन लाइन स्टोरी सांगायची तर ती ‘फॅशन विथ कम्फर्ट’ एवढ्या तीनच शब्दात सांगता येईल!
हाच या वर्षीच्या फॅशनचा नवा ट्रेण्ड असेल..
कम्फर्ट!
त्या ट्रेण्डचं इटुकलं नाव!
- प्राची खाडे
( सुप्रसिद्ध स्टायलिस्ट आणि फॅशन एक्सपर्ट)
मुलाखत आणि शब्दांकन
माधुरी पेठकर