फायर थेरपी - सुंदर दिसण्यासाठी व्हिएतनामी तारुण्याचा आगीशी खेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:34 PM2018-12-20T13:34:07+5:302018-12-20T13:34:37+5:30
सुंदर दिसण्यासाठी काय वाट्टेल ते करताहेत तरुण मुलं.
- निशांत महाजन
फायर थेरपी.
हे दोन शब्द एकत्र वाचतानाही खटकतात. मात्र सध्या सोशल मीडियाला हादरवून टाकणारा आणि जगात ज्याची भयंकर चर्चा आहे, असा एक नवीन ट्रेण्ड आहे. सुंदर दिसण्यासाठी तरुण मुलंमुली काय वाट्टेल ते करू शकतात याचं हे एक ताजं आणि अत्यंत वेडगळ उदाहरण आहे.
ही गोष्ट आहे व्हिएतनाममधली. मात्र ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे जगभर पोहोचली. आणि अनेकजणांना तिकडे अमेरिकेतही वाटलं की, हे प्रकरण तरुण होण्यासाठी काय आहे ते करून पाहावं. व्हायरलची साथ आताशा जगात पसरायला वेळ लागत नाही. त्यातलाच हा एक अचाट प्रकार.
तरुण मुलं एकमेकांना डेअरिंग आव्हान देतही काही ठिकाणी हे फायर थेरपीचं चॅलेंज देत सुटली.
आणि ही फायर थेरपी कशासाठी तर तरुण-तजेलदार-चमकदार चेहरा दिसण्यासाठी. आणि त्यापायी अनेकजण आगीवर चेहरा धरू लागले आहेत. काही हेल्थकेअर सेंटर्सनी तर त्यासाठीची जाहिरातबाजीही सुरू केली. हो चिन मिन्ह या शहरात तर काही स्पा, ब्यूटी सलोन यांना त्यासाठीची रितसर लायसन्स देण्यात आली.
आणि त्यातून आपला चेहरा आगीवर धरायला अनेक तरुण-तरुणी सरसावले. नुस्त तरुण चेहरा दिसणंच नाही तर फटीग, आजारपण, डोकेदुखी यासाठीही काहीजण हा प्रयोग स्वतर्वर करून घेऊ लागले.
त्यातला प्रयोग काय तर भगभगत्या आगीवर आपलं डोकं धरायचं, डोकं म्हणजे खरं तर चेहराच. डोळे घट्ट मिटायचे. आणि 30 सेकंद ते 1 मिनिट एवढा कालावधी चेहरा आगीवर धरायचा आणि बाजूला झालं की दारूत भिजवलेला टॉवेल चेहर्याभोवती घट्ट लपेटून घ्यायचा.
वाचताना हा अवधी कमी वाटतो. पण तोंड पोळणं, भाजणं, चटके बसणं, डोळ्यांना इजा असे काही अपायही त्यातून झालेच.
आता या ट्रेण्डची जेव्हा जगभर चर्चा झाली तेव्हा व्हिएतनाममध्ये आणखी एका चर्चेला तोंड फुटलं, ते म्हणजे सुंदर दिसण्यासाठी इतका आटापिटा का?
त्यासाठी तरुण मुलामुलींचं काउन्सिलिंग सुरू झालं. आपण आहोत ते सुंदरच आहोत, आपली त्वचा सुंदर आहे हे पटवून देण्यासाठी चळवळी सुरू झाल्या.
पण त्यांना फारसं यश लाभलेलं नाही. उलट त्यातून अजून मुलंमुली यासारख्या प्रयोगांकडे खेचले गेले, अशी चर्चा सुरू झाली.
जगभर सौंदर्याच्या बाजारपेठा तरुण मुलामुलींच्या डोक्यात जे भरवत सुटल्या आहेत, त्याची ही भयंकर फळं आहेत.