फिट & फाईन
By admin | Published: December 31, 2015 08:04 PM2015-12-31T20:04:34+5:302015-12-31T20:04:34+5:30
झिरो फिगर आणि माचो लूकचं भलतं फॅड कमी होऊन खऱ्याखुऱ्या ‘फिटनेस गोल’ कडे वळणारा
Next
>झिरो फिगर आणि माचो लूकचं भलतं फॅड कमी होऊन
खऱ्याखुऱ्या ‘फिटनेस गोल’ कडे वळणारा
एक नवीन सुदृढ आणि डोळस ट्रेण्ड
जान है तो जहॉँन है..
हे आता तारुण्याला पटायला लागलं आहे.
त्यात फिटनेस आणि डाएट या दोन गोष्टी ‘उद्योग’ म्हणून फोफावू लागल्या आहेत.
एकीकडे मुलांमधे मॅचो दिसण्याचं, ‘डोलेशोले’चं भूत आणि दुसरीकडे मुलींचं परफेक्ट फिगरचं वेड!
या दोन गोष्टींच्या भांडवलावर ही इंडस्ट्री वाढते आहे, हे उघड आहे.
मात्र केवळ गैरसमजुती आणि फॅड या दोन गोष्टींना मागे टाकून, स्वत:च्या तब्येतीकडेही उत्तम लक्ष देतील आणि फिटनेस फ्रिक होतील इतपत मजल अनेक मुलंमुली मारत आहेत.
यंदाच्या वर्षी तरुण मुलांच्या अजेंड्यावर फिटनेस ही गोष्ट प्रायॉरिटी असेल हे नक्की!
त्यामुळेच वर्षाच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत जीमची शोधाशोध सुरू होऊन, गुलाबी झोपेला बायबाय म्हणत मुलंमुली जीम गाठतात हे खरंय!
पण यंदा या ट्रेण्डमधेही काय नवीन असेल हे शोधताना काही बऱ्यावाईट गोष्टी जाणवल्या.
त्यातल्या चांगल्या गोष्टींची चर्चा आधी करू..
१) योगाभ्यास
तमाम ठिकाणच्या योगा क्लासेसला सध्या तरुण मुलांची गर्दी दिसतेय. ती यंदा वाढत जाईल. कारण नुस्ते सप्लिमेण्ट खाऊन आणि मसल्स कमवून शरीर फिट राहत नाही. त्यासाठी शरीराची लवचिकताही वाढायला हवी हे मुलांना कळतं आहे.
दुसरं म्हणजे त्यातून योगाला आलेलं ग्लॅमर. तेही इंटरनॅशनल. खुद्द प्रधानमंत्री योगा करतात हे कळल्यापासून तर अनेकांनी नव्यानं योगा ट्राय करायचं ठरवलं आहे. त्यामुळेच योगाभ्यास ही सध्या सगळ्यात ‘हॉट’ बनलेली गोष्ट आहे. नवीन वर्षात या योगाभ्यासाकडे मुलामुलींचा कल वाढेल.
२) सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कारांचे शास्त्रशुद्ध क्लासेस आता बहुतांश शहरात सुरू झाले आहेत. यंदा तिथंही तरुण गर्दी वाढेल. कारण तेच, सूर्यनमस्कारांनाही आलेलं ग्लॅमर. करिना कपूर दिवसाला शंभर सूर्यनमस्कार घालते हे कळल्यापासून तर अनेक तरुणींसाठीही सूर्यनमस्कार घालता येणं ही महत्त्वाची आणि मस्ट गोष्ट झाली आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार तरी किमान रोज करू असं म्हणणाऱ्यांची संख्याही वाढते आहे.
३) सायकलवेड
सायकल ही खरंतर पूर्वी तरुणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती, ती आता नव्यानं परत येते आहे. पण तिलाही ग्लॅमर मिळतं आहे. शहरांमधे तर सायकल क्लब उभे राहताहेत. आठवड्यातून एकदा सायकलवरून आॅफिसला जाणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईकवेडे तरुणही सायकल राईड करू लागले आहेत. सायकलिंगचा फिटनेसशी संबंध आहे, तसा तो थ्रिलशीही आहे, अॅडव्हेंचरशीही आहे. त्यामुळे भारीतली सायकल घेणं हा अनेकांचा यंदा संकल्प दिसतोय.
४) दंडबैठका-मॉर्निंग वॉक-व्यायामशाळा
अत्याधुनिक जीम आल्या म्हणजे हे सारं मागे पडेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चूक. उलट जुन्या तालमी, व्यायामशाळा, कुस्ती, दंडबैठका आणि सकाळी मॉर्निंग वॉक हे सारंकाही तरुण मुलांच्या लिस्टवर यावर्षी नव्यानं येतं आहे. कारण काय? या साऱ्याचे साइड इफेक्ट नाहीत, पैसे लागत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनं ते सोनं म्हणत जुन्याच गोष्टी नव्यानं स्वीकारण्याची एक आस आता नव्यानं दिसते आहे.
५) झुंबा, साल्सा इत्यादि
एकीकडे आपल्याच जुन्या गोष्टी. दुसरीकडे हे विदेशी प्रकार. त्यामुळे एखादं झुंबा वर्कशॉप, एखादं साल्सा, अॅरोबिक्स वर्कशॉप करून पाहणं आणि जरा स्वत:ला मोकळं सोडत रिलॅक्स करणं हासुद्धा यंदाचा नवीन ट्रेण्ड आहे.
- चिन्मय लेले
(लेखक हौशी आणि मुक्त पत्रकार आहेत.)
फिटनेसची आस आहे पण वाईट गोष्ट ही की आजही अनेक तरुण मुलामुलींना फिटनेस म्हणजे नेमकं काय हे कळत नाही. एकच एक गोष्ट करून, तब्येत कमवून किंवा झिरो-परफेक्ट फिगर कमवून आपण फीट होऊ असं मानणं चूक आहे. फीट असणं म्हणजे काय?माझ्या लेखी त्याची एक सोपी व्याख्या आहे. रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावर स्माइल हवं, सकाळी उठताना तेच स्माइल हवं. ते स्माइल तुम्हाला दिवसभर कॅरी करता यायला हवं. नाहीतर रात्री झोपताना थकवा, चिडचिड, वणवण जाणवते आणि सकाळी उठतानाही तेच. तसं असेल तर तुम्ही फीट आहात असं म्हणता येणार नाही. त्यामुळे फीट व्हायचं म्हणून स्वत:च्या मनानं स्वत:वर प्रयोग करू नका. मुली क्रॅश डाएट करतात किंवा मुलं स्वत:च्या मनानं किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून सर्रास सप्लीमेण्ट किंवा स्टिरॉईड घेतात हे चूक आहे. मुळात फिटनेस असा लवकरात लवकर, पटकन मिळत नाही. तो मिळवण्याच्या नादात अनेकजण शरीरासाठी घातक चुका करतात. तसं न करता चांगल्या, उत्तम प्रशिक्षित सर्टिफाईड ट्रेनरकडून फिटनेस ट्रेनिंग घ्या. आपला स्वत:चा फिटनेस गोल ठरवा आणि तो साध्य करण्याचा प्रयत्न करा!
आपण आपला फिटनेस गोल, तंदुरुस्ती लक्ष्य ठरवणं हा खरा तर यंदाचा संकल्प आणि ट्रेण्ड असला पाहिजे!
- समर माळी
प्रख्यात फिटनेस ट्रेनर
आपलं शरीर सुदृढ राहण्याकरता रोजच्या जगण्यात, डेली रुटीनमधे व्यायामाला स्थान द्यायलाच हवं. जिथं शक्य आहे तिथं वर्कआऊट करा.. अगदी आॅफिसात, प्रवासातही. फक्त नुस्तं वजन कमी करणं किंवा वाढवणं म्हणजे फिटनेस नाही हे लक्षात ठेवा.
- प्रशांत सावंत
(शाहरुख खानसह बॉलिवूडमधल्या अनेकांना फिटनेस ट्रेनिंग देणारा सेलिब्रिटी ट्रेनर.)