चार दिवसांचा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:00 AM2018-06-07T03:00:00+5:302018-06-07T03:00:00+5:30

आदिवासी भागात काम करताना लक्षात आलं, नुसते प्रश्न कळून उपयोग नाही, ते सोडवलेही पाहिजेत. त्यातून आम्ही रियूजेबल सॅनिटरी नॅपकिन बनवलं..

Four days break | चार दिवसांचा तोडगा

चार दिवसांचा तोडगा

Next

- डॉ. कुलभुषण मोरे/ नंदिनी मोरे

अर्थ ( एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) या ंसंस्थेद्वारे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील जिवली या आदिवासीबहुल तालुक्यात काम करतो. आदिवासींच्या प्राथमिक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण, आरोग्याच्या समस्या यासाठी काम करण्याचं ठरवलं. त्यावेळी आमच्या हातात सूत्र होतं, ‘आपलं आरोग्य आपल्या हातात’. या संकल्पनेवर काम करायचं म्हणून आम्ही गावातल्याच शिकलेल्या बेरोजगार मुला-मुलींना प्रशिक्षण दिलं. तेच गावासाठी आरोग्यदूत व आरोग्यसखी म्हणून काम करू लागले. या आदिवासी भागात आरोग्य स्वराज्य निर्माण व्हावं हा हेतू डोळ्यासमोर आहेच. याचाच एक भाग म्हणजे महिलांच्या मासिक धर्माच्या काळात कोणत्या समस्या येतात याचा अभ्यास आम्ही केला तर त्यातून काही धक्कादायक प्रकार लक्षात आले.
काही शाळकरी मुली आणि कर्मचारी वर्ग मिळून फक्त ५% स्त्रिया या भागात सॅनीटरी नॅपकीन किंवा कापड वापरतात. बाकी ९५ टक्के आदिवासी महिला काहीच वापरत नाहीत. आरोग्यसखीच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण केलं , मासीक पाळीमध्ये काय वापरता असं विचारलं तर अनेक मुली-महिलांनी आपण काहीही वापरत नाही असं सांगितलं. कापडही नाही. पाळीच्या दिवसात साडी खराब होते तेव्हा दिवसातून ३ ते ५ वेळा साडी बदलतो असं काहींनी सांगितलं. बाहेर जाता येत नाही मग काम बंद करुन घरीच थांबतो. घराबाहेर झोपतो असंही अनेकींनी सांगितलं.
आरोग्य तपासणीत असंही दिसलं की स्त्रियांचं विविध आजारांचं प्रमाण खूप जास्त आहे. बहुसंख्य स्त्रियांना कोणते न कोणते लैंगिक आजार होते.रक्तप्रदर, श्वेतप्रदर, रक्तक्षय असे आजार तर अनेकींना झालेले होते. आरोग्य शिक्षणाचा अभाव हे त्याचं कारण. त्यात आरोग्याच्या सुविधांचा अभाव.
आम्हाला नेमका प्रश्न कळला पण उपायही शोधायला हवा होता. प्रश्न होता महिलांना द्यायचं काय, सॅनिटरी नॅपकीन की कापडी नॅपकीन? मग आम्ही सखी स्वराज्य हा उपक्रम सुरु केला. आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे महिलांना सांगणं सुरु झालं. मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी आणि प्राथमिक आरोग्याबद्दल माहिती देणं सुरु केलं. गावागावांतल्या शिकलेल्या तरुणी/ स्त्रिया यांची ‘आरोग्य सखी’ म्हणून निवड केली. त्यांना प्रशिक्षण दिलं. आता त्या आरोग्यसखी आपापल्या गावात महिलांना माहिती देण्याचं काम करतात.
मात्र तरीही एक प्रश्न होताच की या भागात सॅनीटरी नॅपकीन वापरा असं कसं सांगणार? कारण एकीकडे सॅनिटरी पॅडचं विघटन होत नाही, त्याचा कचरा ही समस्या. त्यात ते परवडण्याचा प्रश्न. मग कापडी सॅनिटरी का वापरु नये असं वाटलं.हे नॅपकिन हा धुतल्यानंतर उन्हात सुर्यप्रकाशात वाळवल्यावर पूर्णपणे स्वच्छ होतं. पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता येतो.
कापडी सॅनिटरी नॅपकीन ह्या कॉटनच्या असल्यानं ते वापरताना त्रास होत नाही. कापड नरम असल्यानं त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कापडी सॅनिटरी नॅपकीन हे रियुजेबल असल्यानं आम्ही ते बनवायचं आणि द्यायचं ठरवलं. ते पर्यावरणपूरकही बनवलं. एका समस्येवर आम्ही आमच्यापरीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहोत..

kulbhushanmore@gmail.com

Web Title: Four days break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.