जेमतेम दहा दिवस उरले आहेत.
तोच तो जागतिक कीर्तीचा सण, ज्याची तमाम कॉलेजगोइंग कपल्स वर्षभर अगदी आतुरतेनं वाट पाहतात. ज्याच्यासाठी बरेच पैसे साठवले जातात. आणि खूप प्लॅन्सही केले जातात.
सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो गिफ्ट्सचा.
तिला/त्याला काय गिफ्ट द्यायचं याचे सल्ले एक्सपर्ट नसलेल्या मित्रमैत्रिणींकडून तरी घेतले जातात, नाहीतर मग काहीतरी फिल्मी रोमॅण्टिक कल्पना तरी लढवल्या जातात.
मग चांगले दणदणीत पैसे खर्च करून गिफ्ट आणलं जातं, आणि व्हीडेच्या रोमॅण्टिक कल्पनेनं फुललेला चेहरा एकदम कोमेजतो. नजरेत औदासिन्य येतं. शब्दानं सांगितलं जातं की, खूप आवडलं हे गिफ्ट. पण ते आवडलेलं नसतं हे नजर आणि चेहरा सांगतात. अनेकांच्या नव्हे पिढय़ान्पिढय़ा अनेकांच्या व्हॅलेण्टाइन डेचा असा पचका या गिफ्ट्सने केलेला आहे.
त्यामुळे या व्हॅलेण्टाइन डे ला जर तिला किंवा त्याला गिफ्ट द्यायचंच असेल तर थोडा होमवर्क केलेला बरा.
काय करायचं आणि काय करायचं नाही, याच्या कल्पना क्लिअर असल्या तर तुम्हाला तुमचं पर्सनलाइज्ड, रोमॅण्टिक आणि खरंखुरं व्हॅलेण्टाइन गिफ्ट देता येईल. भन्नाट आयडिया सुचेल !
त्यासाठीच हे एक छोटंसं गाइड.
व्हॅलेण्टाइन आतूर जिवांचा अभ्यास करून तयार केलेलं ! तिला आणि त्याला काय द्यावं आणि काय अजिबात देऊ नये, हे माहिती असलेलं बरं !
असू द्या सोबत, पचका होण्यापेक्षा थोडा अभ्यास केलेला कधीही बराच !
तिला ‘हे’ अजिबात देऊ नका !
1) विकतचं ग्रीटिंग कार्ड
तुम्ही दुकानात जाल, एखादं महागडं म्युङिाकल किंवा बिग साइज ग्रीटिंग कार्ड विकत घ्याल, कौतुकानं द्याल. पचका होणार. रेडिमेड उसन्या शब्दांचं ग्रीटिंग कार्ड दिलेलं हल्ली मुलींना आवडत नाही.
2) सेल्फ हेल्प बुक
हाऊ टू लूक ब्यूटिफूल, हाऊ टू लर्न इंग्लिश, हाऊ टू पॉलिश युवर पर्सनॅलिटी अशा छापाची सेल्फ हेल्प बुकं जर गिफ्ट केली तर भांडण अटळ. ती विचारणारच की, एवढी मी वाईट्ट, ढ आहे तर कशाला हे प्रेमाचं नाटक.
3) कपडे
तिला इम्प्रेस करायला महागडा ड्रेस आणाल तर फसाल. कोण सोबत होतं, कुणाला नेलंस शॉपिंगला आणि हा काय कलर आहे का, पॅटर्न कसलाय असं बरंच काही ऐकून घ्यावं लागेल.
4) अॅक्सेसरी
तिच्या गाडीचे हॅण्डल कव्हर, मोबाइल कव्हर, सॅक, डिओडरण्ट हे असलं काहीही देऊ नका. दिलं की समजा, तिनं गैरसमज करून घेतलाच !
त्याला ‘हे’ अजिबात देऊ नका !
1) चॉकलेट
तुम्हाला आवडत असतील म्हणून त्याला चॉकलेट देऊ नका. त्याला हे चॉकलेटचं येडंपण आवडत नाहीच फारसं.
2) फुलं
पुन्हा तेच, तुम्हाला आवडतात म्हणून त्याला लाल गुलाब देऊ नका. त्याला त्यातले काटे आणि खर्च झालेले पैसेच दिसतात.
3) लव्हलेटर
तुम्ही ग्रीटिंग विकत न आणता त्याच्यासाठी मारे लांबलचक लव्हलेटर, कविता लिहाल. त्याला ते इतकं बोअरिंग वाटू शकतं की त्याचं मूड फुस्सच !
4) डिओडरण्ट, बेल्ट, पाकीट, शर्ट
हे सोडून बाकी काहीही द्या. हे टिपिकल गिफ्ट मिळालं की मुलं अनेकदा वैतागतात.
तिला ‘हे’ देता येईल
1) कॅण्डल लाईट डीनर
हा तसा तिचा विक पॉईण्ट. त्यामुळे हे प्लॅन करणं सोपं. फसण्याचा धोका कमी.
2) तिला हवं असणारं पुस्तक
ते पुस्तक ती वाचो न वाचो, पण ती इंटिलिजण्ट आहे असं तुम्हाला वाटतं असं ते पुस्तक पाहून तिला वाटलं पाहिजे.
3) चॉकलेट
हे कुठल्याही मुलीला आवडतात. कितीही द्या कमीच.
4) आवडत्या सिनेमाचं तिकीट
तिला आवडणा:या हिरोच्या सिनेमाचं तिकीट. हिरॉईन किती सुंदर आहे असं मात्र सिनेमा पाहताना म्हणायचं नाही.
5) एखादं गिफ्ट व्हाऊचर
गिफ्ट व्हाऊचर देता येईल; पण, ‘घे तुङया आवडीचं काहीतरी’ असं न म्हणता ‘आपण दोघं यातून तुला हवं ते घेऊ’ असं म्हणा, क्या समङो?
6) स्वत: बनवलेलं कार्ड/लव्हलेटर
मुली सेण्टी असतात. अशा गोष्टी त्यांना आवडतात.
7) जुन्या गाण्यांची सीडी
तिला आवडणा:या गाण्यांची, जुन्या गाण्यांची सीडी हा पर्याय उत्तम.
8) एखादी लॉँग ड्राइव्ह
कुठंतरी फिरायला जाणं, गप्पा, भेळबिळ. कमी बजेटमधे काम भागेल.
9) जुन्या फोटोंचा कोलाज
हे अजून एक सेण्टी प्रकरण. चांगले फोटो फक्त निवडा.
10) वेळ
सगळ्या मित्रंना टाळून आज अख्खा दिवस तुझा असं म्हणत रहा. हा सगळा स्पेशल वेळ, फुकट द्यायचं गिफ्ट आहे.
त्याला ‘हे’ देता येईल
1) आवडत्या झाडाचं रोप
त्याला फुलं देण्यापेक्षा त्याच्या आवडीच्या झाडाचं एखादं रोप त्याला गिफ्ट द्या. ते त्याला जास्त आवडेल.
2) कुठलंही गॅजेट
बजेट असेल तर त्याच्या आवडीचं एखाद गॅजेट घेऊन द्या. पण त्याच्या आवडीनं, त्याच्या मित्रच्या सल्ल्यानं किंवा त्याला सोबत न्या. नाहीतर इतकं ऐकावं लागेल की विचारू नका.
3) भन्नाट काहीतरी
एखादी वाइल्ड लाइफ ट्रिपचं बुकिंग किंवा मग जवळच्या फोरडी, थ्रीडी सिनेमा, किंवा मग जवळचं अभयारण्य असं त्याला आवडेल तिथं जाऊद्या. एखाद्या दिवशी मोकाट सोडलेलं फायद्याचं.
4) कलात्मक मातीकाम
कलात्मक मातीकाम, चित्र, रंगकाम असं काही खास मुलांना आवडतं. ते शोधा, इम्प्रेशन वाढतं.
5) घडय़ाळ, टोपी, गॉगल
हे आपले नेहमीचे यशस्वी कलाकार. त्यातलं काही निवडा. ते सोपं. बजेटवालं !