पार्किन्सन किंवा कंपवाताचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात सतत हालणारे हात, मान. तोल जाणारे रुग्ण. रोजच्या आवश्यक हालचाली, कामासाठी कोणाची तरी मदत घेणं हे सगळंही अनेकदा पार्किन्सन या शब्दाबरोबर येतंच. साधारणत: पन्नाशी-साठीनंतर येणारा हा आजार परावलंबित्व वाढवण्याबरोबर व्यक्तीच्या एकूण हालचालींवर नियंत्रण आणतो. अनेक रुग्णांना यामुळे मानसिक ताणालाही सामोरं जावं लागतं. थोडासा आत्मविश्वास कमी होतो, मग घराबाहेर पडणंही टाळलं जातं. परंतु पुण्याच्या हृषीकेश पवार या तरुणाने मात्र या रुग्णांच्या आयुष्यात बदल घडवणारा एक वेगळा प्रयोग केला. गेली काही वर्षे त्याला त्याकामात अपेक्षित यशही मिळत आहे.
हृषीकेश पवार. लहानपणापासून शाळेच्या प्रत्येक नृत्यकार्यक्रमात उत्साहानं सहभाग घेणारा मुलगा. आपल्याला नृत्यामध्येच सर्वात जास्त आनंद मिळत आहे हे त्याला वयाच्या नवव्या वर्षीच लक्षात आलं. हा आनंद का मिळतो, नृत्य आपल्या मनाची, भावनांची का जोपासना करत आहे असे त्याला प्रश्न पडू लागले. त्यामुळे नृत्य हेच करिअर म्हणून निवडायचं त्यानं ठरवलं. कथक शिकायचं ठरवलं; मात्र तेव्हा त्याच्या लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये कथक करणारे नर्तक अत्यंत कमी आहेत. तो शिकायला लागला तेव्हा तर हे प्रमाण अगदी २० नृत्यांगनांमागे एक नर्तक असं होतं. भारतीय नृत्यामध्ये ज्यांचं अत्यंत आदराने नाव घेतलं जातं अशा पं. डॉ. रोहिणी भाटे यांच्याकडे त्यानं नृत्याचे धडे घेतले. सध्या तो अमला शेखर यांच्याकडे अध्ययन करत आहे.भारतातील शिक्षणानंतर पुढच्या अभ्यासासाठी तो जर्मनी आणि इंग्लंडला गेला. या इंग्लंडच्या भेटीमध्येच त्याला त्याच्या नव्या प्रयोगाची कल्पना मिळाली. २००४ साली लंडनमध्ये अमेरिकेतील मार्क मॉरिस डान्स ग्रुप हा सुप्रसिद्ध ग्रुप कार्यक्रमांसाठी आला. १९९९ साली या अमेरिकेत सुरूझालेला हा ग्रुप जगभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रम करतो. पण जगातील कोणत्याही शहरात असले तरी दुपारी एक कार्यक्रम स्थानिक कलाकारांसाठी केला जातो. या ग्रुपने पार्किन्सनच्या रुग्णांनाही नृत्य शिकवलं आहे.
२००८ साली हृषीकेश नृत्याचं शिक्षण घेऊन भारतात परतला. परदेशातून येतानाच त्यानं स्वत:ची एक नृत्यसंस्था सुरू करण्याचा विचार केला होता. तो म्हणतो भारतात तेव्हा आणि आताही समकालीन म्हणून समजलं जाणारं नृत्य हे बहुतांश चुकीच्या कल्पनांवर आणि अयोग्य ठोकताळ्यांवर आधारित आहे. तसंच ज्याला ट्रॅडिशनल म्हटलं जातं त्याला तर एकदम उत्सवी आणि बेंगरूळ स्वरूप आलेलं आहे. आत्मा नसलेला आणि केवळ सांगाडा उरलेलं नृत्य माझ्याकडे शिकता येणार नाही ही अट घालूनच त्यानं मुलांना प्रवेश द्यायला सुरुवात केली. नृत्य हे केवळ हातवारे आणि स्टेप्समध्ये अडकलेल्या हालचाली नाहीत. त्यात विज्ञान आहे, त्यात सौंदर्यशास्त्र आहे, त्यात मानसिक स्थितीत होणारे बदल आहेत, शारीरिक हालचाली आहेत हे त्यानं मुलांना समजावून सांगितलं.
नृत्य, संगीत, लेखन, कोणतीही कला अथवा कोणतंही काम निरागसपणे करावं लागतं, त्यात खोटेपणा असून चालत नाही. त्यात साधना असली तरच अपेक्षित यश मिळतं. नृत्यामागचा विचार केल्याशिवाय नृत्य आपल्यात काय बदल घडवून आणू शकतो हे समजणार नाही. हा सगळा विचार हृषीकेशला करणं त्याच्या गुरु पं. डॉ. रोहिणी भाटे यांच्यामुळं शक्य झालं. त्यांच्या अध्यापनामुळे आणि अनुभवकथनाने नृत्याकडे पर्यायाने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्यामुळे मिळाली असं हृषीकेश सांगतो.
काही वर्षांनी त्यानं पार्किन्सनच्या रुग्णांसाठी नृत्य शिकवायला सुरुवात केली. खरंतर पार्किन्सनच्या रुग्णांना दैनंदिन कामासाठीही इतरांची मदत घ्यावी लागते. सरळ उठून चालणं शक्य नसतं, सतत हातांची हालचाल होत असते, पट्टा लावणं, बुटांच्या नाड्या बांधणं अशा हालचाली करणं त्रासदायक वाटावं अशी स्थिती होते. थोडक्यात नाचासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी कमी झालेल्या असतात. पण या नव्या प्रयोगाला त्यांनी उचलून धरलं. हृषीकेशकडे ४५ वयापासून ८६ वयापर्यंतचे लोक पार्किन्सन झालेले सदस्य नृत्य शिकायला येतात. साध्यासाध्या हालचालींपासून सुरुवात झालेले हे शिक्षण या सर्व आजोबांच्या मानसिक स्थितीत, भावनिक आयुष्यात मोठा बदल करणारं ठरलं आहे. कित्येकांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला आहे. मला काहीतरी वेगळं झालंय त्यामुळे आता मी घराबाहेरच पडणार नाही असे म्हणणारे हे आजोबा आनंदाने क्लासला येऊ लागले. काही काही लोक आपल्या लग्न झालेल्या मुलीच्या घरीही जाणं टाळायचे, परंतु या नव्या नृत्य प्रयोगानं त्यांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली. लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी संवाद साधणं या साध्यासाध्या गोष्टींना मुकलेल्या या आजोबांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला.
हृषीकेश म्हणतो, या सगळ्या आजोबांनी आपला आजार मनानं स्वीकारला. हो, मला पार्किन्सन झाला आहे. मग मी आता फक्त कुढत बसण्याऐवजी काहीतरी चांगलं करणार, सकारात्मक ऊर्जा देणारं करणार हे या लोकांनी मनावर घेतलं. ते एकमेकांकडे पाहू लागले. अच्छा या आजोबांनी आज हे केलं ना मग मी उद्या ते करण्याचा प्रयत्न करणार अशी हेल्दी कॉम्पिटिशनही त्यांच्यामध्ये सुरू झाली. रुग्णांच्या प्रगतीची माहिती, हिशेब ठेवायला आमच्याकडे संचेती रुग्णालयाचे फिजिओथेरपिस्टही येतात. या रुग्णांच्या हालचालींमध्ये सुधारणा झाली असून त्यांना घ्याव्या लागणाºया औषधांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे.
हृषीकेशच्या या प्रयत्नांना पुण्यामध्ये पार्किन्सनच्या रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पार्किन्सनचे रुग्ण आनंदाने, उत्साहाने नृत्य शिकतात तेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होणारी नवऊर्जाच एक औषध बनून जाते असं हृषीकेशचं निरीक्षण आहे.
onkark2@gmail.com