‘तिकडे’ तासन्तास टाइमपास कसा का?
By admin | Published: July 23, 2015 05:37 PM2015-07-23T17:37:51+5:302015-07-23T17:37:51+5:30
मुलामुलींच्या सिक्रेट जगाची साक्षीदार असलेल्या ‘त्या’ जागी मुलं स्मार्टफोन वापरून काय काय उद्योग करतात, याचा एक गमतीशीर अभ्यास!
Next
- निशांत महाजन
तरुणांच्या जगात भलतंच चालू असतं.
आणि आपल्या जुन्याच चष्म्यातून किंवा आपल्या तारुण्याच्या आठवणीतून आजच्या तारुण्याकडे पाहणारे लोक काय वाट्टेल ती निरीक्षणं करत तरुण पिढीवर ठप्पे मारतात, असं तरुणांना कुणी सांगितलं तर त्यांना पटेलच! वडीलधारी माणसं म्हणतील झालं, फुटली शिंग. आता हे आपल्याला अक्कल शिकवणार!
मात्र तरुणांची मानसिकता अभ्यासणा:या एका पोर्टलचं म्हणणं आहे की, आजच्या तरुण पिढीविषयी काही प्रचलित गैरसमज आहेत आणि ते ठोकून रेटवले जातात. पण प्रत्यक्षात तसं असतंच असं नाही!
टोटलयुथ रिसर्च डॉट कॉम असं या साईटचं नाव. त्यांनी या चालू वर्षातले तरुण मुलांच्या जगातले 33 ट्रेण्ड्स नुकतेच प्रकाशित केले. त्यांचं म्हणणं आहे की, या ट्रेण्ड्सविषयी गोलगप्पा-भपकारेच जास्त. प्रत्यक्षात तरुण असं वागतच नाहीत.
त्यातलाच एक मोठा समज म्हणजे तरुण कायम स्मार्टफोनला चिकटलेले असतात.
म्हणून मग या पोर्टलने अमेरिकेतल्या (हो, हे सारे निष्कर्ष अमेरिकन तारुण्याविषयीचे आहेत. पण ते आपल्याला लागूच नाहीत असं नाही!) तारुण्याला काही प्रश्न विचारलेत. वय वर्षे 18 ते 29 वयातली ही तरुण पिढी. त्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांनी प्रत्येक ट्रेण्डची एक आकडेवारीच मांडली आहे.
त्यातला एक प्रश्न फार रंजक होता,
तुम्ही टॉयलेटमधे जाता, तिथं फोन घेऊन जाता का? त्या फोनवर काय करता?
हा प्रश्न विचारण्याच्या मुळाशी एक समज आहेच की, तरुण मुलं संडास-बाथरूममधेसुद्धा फोन सोबत घेऊन जातात. तिथंही फोनवरची टुकटुक चालूच!!
मात्र उत्तरं म्हणून जे हाती लागलं ते जास्त गमतीशीर होतं.
67 टक्के मुलांनी सांगितलं की आम्ही टॉयलेटमधे पुस्तक घेऊन जातो आणि पुस्तक वाचतो.
विशेष म्हणजे, दहा टक्के मुलांनी तर असंही सांगितलं की, तिथं बसल्याबसल्याच ऑनलाइन शॉपिंगही उरकून घेतो.
या ट्रेण्डची मांडणी करणा:या विश्लेषकांचं म्हणणं आहे की, फक्त फोनवर वेळ घालवतात हे म्हणणं चिूक. ही तरुण मुलंही पुस्तकं वाचतात. आता त्यांना आवडेल असं काही त्या पुस्तकात असतं की नाही हा त्यांचा नाही तर लेखक-प्रकाशकांचा प्रश्न आहे!
या प्रश्नाच्या पोटात त्यांच्या हाती लागलेली आकडेवारी म्हणूनच गमतीशीर आहे.
आणि पुरेशी बोलकीही!
‘तिकडे’ फोन घेऊन गेलात तर त्यावर काय काय करता?
या प्रश्नाला अनेक पर्यायापैकी मुलामुलींनी दिलेल्या उत्तराची ही आकडेवारी..
फोनवर ‘तिकडे’ ते जास्तीत जास्त करतात काय, हे सांगणारी.
63 टक्के फोन आलाच तर त्यावर बोलतो .
59 टक्के मेसेज पाठवतो.
42 टक्के इमेल करतो.
39 टक्के महत्त्वाचे फोन गुपचूप उरकून घेतो.
38 टक्के वेब सर्फिग करतो.
29 टक्के सोशल नेटवर्किग साइट्सवर असतो.
10 टक्के ऑनलाईन शॉपिंग करतो.
फोन सोबत नेतो, पण पुस्तकही नेतो,आणि तिकडे पुस्तक वाचतो असं 67 टक्के मुलामुलींनी सांगितलं.