माहितीची लाइट, सत्ताधार्‍यांची टाइट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 05:58 AM2019-06-20T05:58:00+5:302019-06-20T06:00:04+5:30

गावात हीरो व्हायचंय? ग्रामसभेत जा, प्रश्न विचारा. पण हवेत बॅट मारू नका, दांडी उडेल. अभ्यास करून जा, तो कसा करायचा, सांगतो, फोन तर घ्या तुमचा हातात.

information is a key, use it for change! | माहितीची लाइट, सत्ताधार्‍यांची टाइट !

माहितीची लाइट, सत्ताधार्‍यांची टाइट !

Next
ठळक मुद्देग्रामसभेत बोलायचं असेल तर थोडी तयारी करून जाणं गरजेचं आहे.

- मिलिंद थत्ते

लोकसभेत एखाद्याला पक्षाला बहुमत, तर त्यांचा नेता तो पंतप्रधान. देश चालवायला, सरकार हाकायला पैसे लागतात. ते कमवायला सरकारला कर गोळा करावा लागतो. पण कर किती नि कुठला गोळा करायचा हे पंतप्रधानाला लोकसभेला विचारावं लागतं. अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर व्हावा लागतो, सरकारचा जमाखर्च सांगावा लागतो, त्यात लोकसभा बदल करायला लावू शकते. हे सारं करून मग पंतप्रधान कारभार करू शकतात. देशासाठी कायदा-नियम करण्याचे अधिकार लोकसभेला असतात. लोकसभा ठरवील त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे हे सरकारचं काम.
आता तुम्ही म्हणाल, हे तर सगळं आम्हाला माहीत आहे ना बे ! काहून बोअर करून राहिला?
हे सगळं जर तुम्हाला माहीत आहे, तर मग हेही माहीत असेल की, देशाची लोकसभा, राज्याची विधानसभा, तशी गावाची ग्रामसभा ! 
अन् मग या ग्रामसभेतले खासदार कोण? 
सही जवाब ! तुम्हीच. 
तुमच्या खासदारकीची मुदत काय? अमर्याद, मरेपर्यंत खासदार! 
मग खासदार म्हणून काम कसं चाललंय तुमचं? जाता की नाही ग्रामसभेत? बोलता तिथे की मूग गिळून बसता?
जर ग्रामसभेत बोलायचं असेल तर थोडी तयारी करून जाणं गरजेचं आहे. नेट प्रॅक्टिस करायची नाही, अचानक ब्याट हातात घ्यायची नि बेफाम फिरवायची - असं केलं तर तिथं दांडी उडणार तुमची! हीरोचा झिरो होनार ! 
म्हणूनच तयारी करायची ग्रामसभेत जाण्यापूर्वी. म्हणजे काय?
तर त्यासाठी हे करून पहा. 
 तो तुमचा लई शाना फोन घ्या, त्यात panchayatonline.gov.in ही वेबसाइट उघडा. तिथं वर्ष निवडा, राज्य निवडा, planning unit किंवा योजना इकाई म्हणून village panchayat  निवडा. मग जिल्हा, तालुका, गाव समदं निवडा.
* डायरेक्ट त्या वर्षाचा पंचायतीचा प्लॅन दिसतो. कामं दिसतात, रक्कम दिसते, कुठून निधी येणार ते दिसतं. त्यात वित्त आयोग  (finance commission) आणि स्वनिधी (own fund) हे दोन नक्की दिसतील. हे दोन्ही पैसे ग्रामपंचायतीकडे हमखास असतात. 
* मागच्या वर्षीचा आराखडा अशा पद्धतीने पहा, डाउनलोडा, अन् आपल्या वस्तीत सर्वांना वाचून दाखवा. 
* कोणती कामे झाली नाहीत, त्यावर बोट ठेवा. मग ग्रामसभेत तुमचा म्हंजी खासदारांचा आवाज उठू द्या. आपण माहितीच्या आधारावर प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्या शब्दाला वजन असतं.
एकदा करून तर पहा. आपण माहितीची लाइट लावली, की सत्ताधार्‍यांची टाइट होती का नाई बगा !


    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत)
 

Web Title: information is a key, use it for change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.