- स्नेहा मोरे
चल, जरा टपरीवर कटिंग घेऊन येऊया. यार, चार तास बसलो नोट्स काढायला, चल जरा मैदानात बघूया टीम आलीय का, बसू कट्टय़ावर.किंवारात्री भेट, नेहमीच्या कट्टय़ावर, बसू निवांत गप्पा मारत -मित्रांच्या गँगमधले हे रोजचे संवाद. असे संवाद मुलींमध्ये घडताना दिसतात का? उत्तर ‘नाही’ असंच मिळतं. कारण मैत्रिणींना एकत्र वेळ घालवायचा असेल तर त्यांना कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे कुणाच्या तरी घरी जावं लागतं, कॉलेजातच बसावं लागतं, कधीमधी हॉटेलात खायला गेलं तर तेवढय़ाच गप्पा होतात. मैदान, चहाची टपरी, पार्क, उद्यानं, शहर किंवा उपनगरातील वृत्तपत्रं वाचनालय, बंद दुकानांच्या पायर्या या जागांवरही आजही तरुण मुली- महिला जायला कचरतात. तिथं जाऊन गप्पा मारत बसणं हे तर अशक्यच.बाकी शहरांचं सोडा, मुंबईतही असं वातावरण नाही. त्यामुळेच मुंबईतल्या काही मुली सांगताहेत ठणकावून की ‘हे शहर आमचंही आहे!’ पुरुषांच्या नजरा-भाषा, वावर यानं भेदरलेल्या मुली, महिला सार्वजनिक जागांमधील वावरापासून चार हात लांबच असल्याचं नुकतचं एका धक्कादायक सव्रेक्षणातून समोर आलंय. बर्याचदा इच्छा असूनसुद्धा केवळ टपरी, पार्क, मैदान, मंदिर आणि वाचनालयाच्या आवारातील वातावरणामुळे तिकडे जात नसल्याचं मुली-महिलांनी यात म्हटलयं. मुलींच्या सक्षमीकरणासाठी झटणार्या ‘अक्षरा’ संस्थेनं यासाठी पुढाकार घेऊन एक चळवळ राबवायला सुरुवात केलीय. त्यातून ‘वाचनहक्क अभियान’, ‘सार्वजनिक जागा जितकी तुमची तितकीच आमचीही’ अशा स्वरुपाच्या चळवळी मुंबई शहरात आकार घेत आहेत. अक्षरा संस्थेच्या सहसंस्थापिका नंदिता गांधी सांगतात की, संस्थेमध्ये दर आठवडय़ाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक विषयांबद्दल चर्चा होते. अशाच एका चर्चेदरम्यान संस्थेतील मुलींनी ‘आमच्या जागा कोणत्या?’ याविषयी प्रश्न विचारणं सुरू केलं. त्यावेळी घर, कॉलेज, वसतिगृह अशा काही ठरावीक जागा सोडल्या तर सार्वजनिक जागांमध्ये बिनदिक्कत फिरायची भीती वाटते, संकोच वाटतो, सुरक्षित वाटत नाही असा सूर या मुलींनी आळवला. आणि मग याच विचारातून ‘इट्स अवर सिटी टू’ या डॉक्युमेण्ट्रीचा जन्म झाला. मुलामुलींना समान वागणुकीच्या गप्पा मारताना रोजच्या जगण्यात भेदाभेद करणारे आपणच असतो हे विसरून जातो. याचीच काहीशी जाणीव वेगळ्या शैलीत, वेगळ्या माध्यमात, वेगळ्या स्वरुपातून करण्यासाठी ही धडपड हा प्रयत्न आम्ही केला. खरं तर मुंबईसारख्या शहरात या मोहिमेची गरज लागणं हे दुर्दैवाचं आहे; परंतु आता मात्र या मोहिमेच्या माध्यमातून आणि दर आठवडय़ाचा उपक्रम म्हणूनच राबवतोय. यात दर शनिवारी संस्थेच्या माध्यमातून महिला-मुलींनी या सार्वजनिक ठिकाणांच्या भेटीसांठी घेऊन जातो. या माध्यमातून हे शहर तुमचचं तितकचं आहे, याची आंतरिक जाणीव मुलींना व्हावी हा उद्देश आहे.या डॉक्युमेण्ट्रीमध्ये सहभागी असलेल्या संस्थेच्या समन्वयक ऊर्मिला साळुंके यांनी सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या भेटींचा विलक्षण अनुभव मांडला. या अनुभवाविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, 2016 साली ही फिल्म आकार घेत असताना संस्थेतील मुलींनी शहराच्या वेगवेगळ्या कोपर्यातल्या 18-50 वयोगटातल्या 103 महिला व पुरुषांशी चर्चा केली . यातल्या सगळ्या महिलांनी एकदाही टपरी वा वाचनालयात गेलं नसल्याचं सांगितलं. मात्र 69 महिला- मुलींनी या जागा, ठिकाणं ‘जेंडर फ्रेण्डली’ करण्यावर भर द्यावा असं सांगितलं. 45 महिला - मुलींनी दुपारच्या काहीवेळेत कुणी नसताना तिथे जाण्यास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलं. खरं तर टपरीवर जाऊन चहा पिणं, यात काय क्रांतिकारी आहे? पण अजूनही आपण तरुणींसाठी कुठल्याच शहरात तो सुरक्षित अवकाश निर्माण करू शकलेलो नाही.
***
रात्रीची मुंबापुरी
ज्या शहराच्या अंगाखांद्यावर आपण वाढलोय, ते शहर रात्री कसं दिसतं. स्वप्नांनी झपाटलेली ही मुंबापुरी रात्री झोपते का? रात्रीही या शहराच्या गल्लोगल्ल्या, इथले रस्ते, कट्टे मुली-महिलांसाठी सुरक्षित आहेत का? या सगळ्यांची उत्तरं शोधण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून महिन्यांतून एकदा मुलींना एकत्र घेऊन रात्रीच्या मुंबापुरीची सफर घडविली जाते. आजही अनेक तरुणी नोकरी-शिक्षणासाठी उशिरार्पयत काम करतात; मात्र रात्रभर शहरातल्या वेगवेगळ्या सार्वजनिक जागा, ठिकाणांना भेटी देऊन ते अनुभवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नातून मुलींना शहर आपलसं वाटू लागल्याचं दिसून आलंय.......वाचन हक्क अभियानाला यशअभियानाला आकार देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेच्या पातळीवरही प्रयत्न करण्यात आले. त्यातल्या शहर-उपनगरातल्या वाचनालय मंडळांशी संवाद साधून गल्लोगल्ली वसलेल्या वाचनालयाच्या जागा महिला-मुलींसाठी खुल्या करण्यात यावा, त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करावे यासाठी पुढाकाराने चर्चा करण्यात आल्या. त्यानुसार वाचनालय मंडळांनी पुढाकार घेऊन मुली-महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलेच. शिवाय त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी मंडळाच्या विविध उपक्रमांत त्यांना सामावून घेतले.......फिल्मचा सन्मानअमेरिका दूतावासाच्या महिला सक्षमीकरण व सुरक्षाविषयक आधारित डॉक्युमेण्ट्री स्पर्धेत अक्षरा संस्थेच्या ‘इट्स अवर सिटी टू’ या फिल्मचा सन्मान करण्यात आला. या फिल्मने तृतीय स्थान मिळवलं.