रॅगिंगच्या नावाखाली आपल्याच सहकार्यांना गुलाम ठरवणं ही कुठली संस्कृती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:31 AM2019-06-20T06:31:00+5:302019-06-20T06:35:04+5:30
ज्युनिअर माजले आहेत म्हणून रॅगिंग होत नाही, आपण सिनिअर असल्याचा इगो असतो म्हणून रॅगिंग केलं जातं. रॅगिंग ही शिस्त नसून गुलामिगरी आहे .
- डॉ. रोहित गणोरकर
सिनिअर - ज्युनिअर हे प्रेमळ नातं. मैत्री पलीकडचं. मैत्री मध्ये असणारी सुख-दुर्ख समजण्याची ताकद तर यामध्ये आहेच, सोबत एकमेकांप्रति आदर आहे. वेळोवेळी मार्गदर्शनसुद्धा या नात्यामध्ये आहे. कॉलेजमध्ये प्रत्येकजण अशी कितीतरी नाती जपत असतो.
मात्र ही नाती, मैत्री वेगळी आणि रॅगिंग वेगळं. रॅगिंग ही शोषण व्यवस्था आहे. सिनिअर - ज्युनिअरचं नातं, त्यांचं परस्परांशी असलेलं इण्टरॅक्शन आणि दुसर्या बाजूनं रॅगिंग या दोन गोष्टी इतक्या विसंगत असताना एकमेकांमध्ये मिसळल्या (इण्टरमिक्सिंग) जातात.
रॅगिंग म्हणजे दुसर्याचा छळ. तो करताना त्यामध्ये आनंद मिळत असेल, कुठलाही विचार न करता रूढी, कॉलेजच्या परंपराच्या नावानं ते रॅगिंग चालू असेल तर हे अन्यायकारक शोषणच आहे. आणि कायद्यानं शिक्षेस पात्न असा गुन्हाही आहे.
एखादा म्हणतो रॅगिंग थोडय़ाफार प्रमाणात ठीक आहे. मात्र थोडय़ाफार प्रमाणात म्हणजे किती आणि कसं? मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 2009 आदेशानुसार कोणत्याही प्रमाणातलं (माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर) रॅगिंग हा शिक्षा पात्न गुन्हा आहे. 2009 मध्ये अमन कचरूचा या रॅगिंगनं जीव घेतला. रॅगिंगमध्ये जीवघेणा मार पडल्यावर दुसर्या दिवशी त्याचं शव पहावं लागलं. ती आत्महत्या नव्हती तर ती रॅगिंगने केलेली हत्या होती. थोडंसं रॅगिंग म्हणत करण्यात आलं. रॅगिंग त्यादिवशी इतकं जास्त झालं की, त्याचा मृत्यू ओढावला. त्याचा बळी कसा गेला हे सांगणारा तो रिपोर्ट वाचला तर कळेल की त्याच्या कॉलेजमध्ये दुसर्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये असतात तसेच रॅगिंगचे नियम (अनऑफिशियल रुल्स) होते. मान वाकवून चालणं, प्लेन पांढरा शर्ट आणि काळी पॅण्ट 24 तास घालणं, सिनिअर्सच्या डोळ्यात न पाहणं. असे हे नियम. हा रिपोर्ट पुढचं वर्णन सांगते की, रॅगिंगचा माइल्ड आणि सिव्हिअर म्हणजे मध्यम आणि गंभीर असा काही प्रकार नसतोच. भावनेच्या भरात काय घडेल हे सांगताही येत नाही. हा रिपोर्ट पुढे म्हणतो, "All the freshers called in common room and where they get "Lined up" with their "heads down" they were Slapped, made to Stand and Sit in torturous postures. Aman suffered pain due to slapping. That was his Mistake "Item" and so Raggers had beaten him brutally.
रॅगिंग समर्थन करणार्या लोकांना जे आपण करतोय तो किती मोठा गुन्हा आहे हे माहिती नसतं. कॉलेज प्रशासन किंवा कोणीही आपलं काहीच करू शकत नाही, असा गैरसमज असतो. आपलं कोणीतरी रॅगिंग घेतलं होतं म्हणून, ही रूढी चालवावी म्हणून रॅगिंग घेण्याचा गुन्हा केला जातो. काही लोक परपीडक विकृती आनंद घेण्यासाठी रॅगिंग घेत असतात. रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारल्यावर त्याला वेदना होतात, त्यात काही लोकांना मजा वाटते. काही विद्यार्थी त्या प्रकारचा असुरी आनंद, परपीडक विकृती आनंद रॅगिंगमधून घेत असतात तसंच काहींना शक्तिप्रदर्शन किंवा आमच्यात किती दम आहे हे दाखवायचं असतं. काही तर रॅगिंग नाही घेतलं तर बाकीचे लोक भित्ना म्हणतील म्हणून हा गुन्हा करतात.
मजा, गंमत म्हणून किरकोळ रॅगिंग करण्याचं समर्थन करणारे अनेकजण म्हणतात यामुळे विद्याथ्र्यामध्ये एकता होते. छळ करून, मारून लोकांना स्वतर्चं मत विसरून तुम्ही म्हणाल ते करायला लावणं म्हणजे इण्टरॅक्शन नव्हे. त्यातून कशी एकता निर्माण होईल. लाइन अप होण्याला युनिटी म्हणत नाहीत. ही गुलामगिरी म्हणजेच झेंडूशाही व त्यातून निर्माण झालेली झुंडशाही व गुंडशाही. युनिटीसाठी जर रॅगिंग महत्त्वाचं असतं तर या पूर्ण देशात कमी शिकलेल्या, कमी अनुभव असलेल्या, लोकांवर जास्त शिकलेल्या, जास्त जग पाहिलेल्या, जास्त अनुभव असलेल्या लोकांनी दबाव टाकणं, मारणं हीच रीत असायला पाहिजे होती. काय गरज आहे एवढय़ा संघटनांची, व्यवस्थांची!
इण्टरॅक्शन आणि इण्ट्रोडक्शन यासाठी करण्यात आलेल्या रॅगिंगचा बळी ठरलेल्या अमन कचरूचे वडील म्हणतात, ‘कई बार लोग बोलते हैं कि रॅगिंग इण्टरॅक्शन के लिए होती है’!’ मगर पूरी दुनिया में हिंदुस्तान, श्रीलंका, बांग्लादेश और पाकिस्तान यह चार ही देश है जिनमें रॅगिंग होता है। इस नीच किस्म का इण्ट्रोडक्शन होता है। आप बाहर जगह फ्रेंड्स नहीं बनाते ! कोर्ट में, इंडस्ट्री में, सड़क पर, चाय पिते पिते, जब वहां पर फ्रेण्ड्स तैयार कर सकते हैं तो कॉलेज में रॅगिंग की क्या जरूरत है?’ रॅगिंगमुळे मरण पावलेल्या दोस्ताच्या वडिलाचे हे उद्गार प्रत्येक कॉलेजमधील संस्कृती व वागणुकीला प्रश्न विचारणारे, विचार करायला लावणारे व धडा शिकवणारे आहे.
मात्र अनेक कॉलेजातली संस्कृती अशी की, सिनिअरला नाव विचारायचं नाही. कुणी विचारलंच तर लगेच ऐकावं लागतं, ज्युनिअर्सला माज आलेला असतो ते सिनिअर्सला त्यांच्या तोंडावर नाव विचारतात. पण त्यात काय कमीपणा आहे. स्वतर्चं नाव ही जर एक आयडेण्टिटी असेल तर ते स्वतर् सांगण्यात कमीपणा कसला? एखादा सुपर सिनिअर किराणा दुकानात गेला व वस्तू घेतली की बिलावर लिहिण्याकरता दुकानदार नाव विचारतोच ना ! तेव्हा त्याला काय लाईन घेऊन नाव पाठ करायला लावतात.
का आणि कसं होतं रॅगिंग?
ज्युनिअर माजले आहेत म्हणून रॅगिंग होत नाही, तर त्यात सिनिअर्सचा आपण सिनिअर असल्याचा इगो असतो. त्यामुळे ज्युनिअर्सना कालबाह्य नियम पाळायला भाग पाडलं जातं.
ते नियम काय असतात?
अ) सिनिअर पुढे ज्युनिअरने झंडू (गुलाम) पोझिशनमध्ये उभं राहणं म्हणजेच स्वतर्च्या शर्टच्या तिसर्या बटणाकडे पाहणं व झुकलेली मान, वाकलेले खांदे व बांधलेले हात या ‘अठराव्या शतकातल्या गुलामिगरीच्या’ पोझिशनमध्ये सिनिअरला नमस्ते असा सलाम ठोकणं. स्वतर्चं नाव सांगताना झेंडू नाव, वडिलांचं नाव, आडनाव असं कैदी असल्यासारखं सांगायला लावणं.
- सिनिअर्स सांगतात की, यामुळे शिस्त लागते. ही शिस्त नसून गुलामिगरी आहे आणि एवढा छळ करून कोणाला नमस्ते म्हणायला लावून फक्त सिनिअर्सचा इगो सुखावतो. ज्युनिअर्सना त्यांच्याबद्दल आदर वाटतोच असं नाही. छळ केल्यावर भीतीपोटी कुणीही झुकेल; पण मनातून शिव्या देईल. मान झुकवून उभं राहिल्याने लाचारी द्वेष हेच निर्माण होतं, माणुसकी व स्वाभिमान नाही हे का लक्षात घेतलं जात नाही. गुलामासारखं वागवल्यापेक्षा जर त्याला सहज त्याचं नाव गाव विचारलं, कुठल्या शाळेत होता, त्याच्या आवडी अडचणी जाणून घेतल्या आणि एक मित्न म्हणून स्वतर् व्यक्त झालात तर खरोखरच चांगलं इण्टरॅक्शन होऊ शकेल व मैत्नीसुद्धा.
आ) प्रथम वर्षाच्या मुलांना वर्षभर प्लेन शर्ट, पॅण्ट कॉलेज व हॉस्टेलवर 24 तास घालायला सक्ती करणं.
प्लेन फॉर्मल शर्ट-पॅण्ट घातली की पहिल्या वर्षीच्या मुलांना शिस्त लागते असं रॅगिंगचे समर्थक सांगतात. मग दुसर्या वर्षाला कुठं जाते ही शिस्त? कोणी काय घालावं हे ठरवणारे तुम्ही कोण? सकाळपासून संध्याकाळर्पयत एकसारखाच ड्रेस घालणं शारीरिक - मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे का?
खरं म्हणजे एकसारखे दिसणार्या ड्रेसमध्ये ज्युनिअर्स असले की सिनिअर्स त्यांना फस्र्ट इअरचे म्हणून ओळखू शकतात. या अशा पोशाखात देहाने धिप्पाड व मनाने खंबीर असणारा मुलगाही बाकीच्या मुलांनी मान झुकवली म्हणून मान झुकवतो. बाकीचे सगळे तेच करत आहे आणि याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असं वाटू लागतं. या पोशाखात अशी गंभीर दुर्बल मानसिकता आहे.
पण जर नुकताच एमबीबीएसला लागलेल्या मुलाचं मनोविश्व समजून घेतलं तर समजू शकेल की एवढा अभ्यास करून कॉलेजमध्ये आलेला मुलगा त्याची रंगीबेरंगी स्वप्न, ते फुलपाखरासारखा बागडणं, कॉलेजमध्ये भरपूर काही करू अशी आशा आणि त्यावरही पोशाख सक्ती. त्याच्या भावविश्वालाच तडा जातो !
इ) मुलांचं नाव, गाव, रोल नंबर पाठ करायला लावणं व ते पाठ न झाल्यास लाइनमध्ये जेवढे नाव नाही आले तितक्या गालावर झापडा मारणं. नाव माहिती असलं की मित्नांचं काम चांगलं करू शकतात असं सिनिअर समर्थन करतात; पण असं असलं असतं तर पूर्ण समाजात मार खाऊन नाव पाठ करण्याची सिस्टीम सगळ्यात चांगली असती.
म्हणजे एका साधारण मुलाला किंवा मुलीला 60 ते 70 लोकांची पूर्ण नाव, रोल नंबर, रूम नंबर पाठ राहू शकत नाही. ही कुणीही मान्य करेल. त्यामुळे त्या ज्युनिअरला एक न्यूनगंड तयार होतो की आपण साधं नावसुद्धा पाठ करू शकत नाही. त्यातून येते ती लाचारी ! दुसरं सिनिअरला ‘लायसन्स’ म्हणजेच परवाना मिळतो की कुणालाही कधीही मारण्याचा कारण कुणाचं तरी नाव हा विसरणारच असतो !
ई) प्रथम वर्ष विद्याथ्र्याला जिम, कॅन्टीन, लायब्ररीमध्ये जाण्यास मनाई करणे.
धीट होण्यासाठी मुलांची लाइन घ्यावी लागते असं म्हणतात मग जिमपासून का वंचित ठेवतात. मुलं कॉलेज कॅन्टीनमध्ये गेले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बसू द्या ना लायब्ररीमध्ये ज्याला आवड निर्माण होईल पुस्तकांची, तो पुढे तरी जाईल. नाहीतर सगळेच परीक्षेच्या वेळेस पुस्तक हाती घेऊन बसतात. पण त्यावरही बंदी असते.
उ) आयटम दिला सिनिअरला तर दणक्यात मार बसतो. आइटम म्हणजे काय? कोणतीही गोष्ट? हसला तरी आयटम, रडला तरी आयटम, वर पाहिलं तरी आयटम, नाही म्हटलं तरी आयटम !! हा आयटम शब्द सिनिअरने, ज्युनिअर्सला मारण्यासाठीच बनवला आहे का?
आणि या लाइनमध्ये मार खाल्लेल्या मुलांचं स्वप्न काय असावं? तर त्याला वाटतं की मी कैदी असतो तर जास्त चांगलं असतं ! कारण होस्टेलमध्ये आल्यावर मुलांना जो युनिफॉर्म असतो कैद्यांना त्यापेक्षा सुटसुटीत व सैल ड्रेस असतो. त्यांना खाली मान घालून तीन तास उभं राहावं लागत नाही. ते ताठ मानेने उभे राहू शकतात हो-नाहीच्या पुढे ते बोलू शकतात. कुणाचंही नाव पाठ करण्याच्या कारणावरून मार खावा लागत नाही.
केम्ब्रिज, आयआयटी, जेएनयूसारख्या विद्यापीठातसुद्धा मुलं शिकतात त्यांच्यामध्ये एकता असते त्यांना कॉलेजचे फंक्शन घेण्यासाठी रॅगिंगचा अवलंब करावा लागत नाही. कारण कोणत्याही कॉलेजमध्ये मुलं तेवढे उत्साही असतात की, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भाग घेणं व यशस्वी करणं जमतं. परंतु हे चांगलं झालं पाहिजे म्हणूनसुद्धा रॅगिंग घेऊन स्वतर्चा अधिकार सिद्ध करणं हा मूर्खपणाच म्हणावा लागेल. केम्ब्रिज, आयआयटी, जेएनयू या विद्यापीठातही मुलं शिकतात व आपल्याकडच्या कॉलेजेसपेक्षा जास्त चांगला प्रकारे शिकतात त्यामुळे ते भीतीमुक्त राहून इतर कार्यक्र मातही भरपूर जास्त प्रमाणात भाग घेतात. त्यांना रॅगिंगची गरज नाही पडत.
विचार करा, हे सारं गरजेचं आहे का? जरा मानवी, संवेदनशील आणि विवेकवादी विचार केला तर उत्तरं सहज सापडतील.
( रोहित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी असून आता मानसिक आरोग्य विभाग, सर्च गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी आहेत)