जान्हवी-खुशीची थीम स्टाईल ट्राय करायचीये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:40 PM2018-12-20T13:40:33+5:302018-12-20T13:41:23+5:30
बडय़ा लग्नांचा थाट मोठा, त्यातल्या फॅशन मोठय़ा पण जान्हवी-खुशीनं केलेल्या वेडिंग थीमची आयडिया आपल्याला नक्की ट्राय करता येईल!
- श्रुती साठे
लग्नाचा मोसम दरवर्षीच येतो; परंतु हे वर्ष भारतात सेलिब्रिटीजच्या बिग फॅट वेडिंगचं साक्षीदार ठरलं. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक जोनासच्या लग्नाचे खूप फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्यात त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या कपडय़ांची, त्यांच्या हेअर स्टाइलची चर्चा झाली. कोणाचं लग्न अधिक दिमाखदार याची जणू चढाओढच चालू झाली. ईशा अंबानीच्या लग्नाची तर बातच काही और. संगीत सोहळ्यात देश-विदेशातील नामवंत सेलेब्जनी हजेरी लावली आणि परफॉर्मसुद्धा केलं. यातच जान्हवी आणि खुशी कपूर यांचे संगीत सोहळ्यातल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्ना यानं डिझाइन केलेल्या लेहंगा-चोलीमध्ये कपूर बहिणी सुरेख दिसल्या. जान्हवीचा सोनेरी रंगाचा लेहंगा त्यावरील भरीव सोनेरी धाग्याच्या आणि मण्यांच्या कामामुळे एकदम गॅ्रण्ड दिसला. त्यावर घेतलेली राणी -गुलाबी रंगाच्या ओढणीमुळे आलेला कॉण्ट्रास्ट लूक अतिशय मोहक दिसला, तर खुशीचा चंदेरी रंगाचा लेहंगासुद्धा भरजरी काम केलेला होता. त्यावरचं डिझाइन हे चेक्स पॅटर्नमधलं असल्यामुळे लेहंग्याचा वेगळेपणा उठून दिसला. चोलीची स्ट्रॅपी बॅक तिला ग्लॅमरस लूक देऊन गेली.
भरजरी काम असलेले हे ड्रेस त्याच्या चंदेरी-सोनेरी थीममुळे सगळ्यांच्याच लक्षात राहातील. हल्ली कलर को-ऑर्डिनेशन करण्याची तशीही फॅशन आहे. तुमच्या घरच्या किंवा जवळच्या लग्नात तुम्हीसुद्धा हटके पेअरिंग करून पाहा. बहिणी-बहिणी, आई-मुलगी, सासू-सून, बहीण-भाऊ अशी थीम घेऊन कामाला लागा आणि एक हटके लूक तयार करा. यासाठी तुम्ही कपूर सिस्टर्ससारखी चंदेरी-सोनेरी अशी थीमसुद्धा वापरू शकता.
याशिवाय मावस, आते अशा सात बहिणी मिळून इंद्रधनुष्य अशी थीम करू शकाल. विचार करा आणि एकदम हटके लूक्स करून लग्नाला उपस्थित सगळ्यांनाच छान सरप्राइज द्या !
मुळात काय लग्न कुणाचंही असो, त्यात आपण उठून दिसणंही गरजेचंच आहे. तेच खरं तर महत्त्वाचं!