- डॉ. भूषण केळकर
मागे एकदा सिंगापूरला कामानिमित्त गेलो होतो. एका मित्राकडे भेटायला गेलो तर तिथे करिअर काउन्सिलिंगचा विषय सहजच निघाला. त्याच्या मुलाची प्राथमिक चाचणी केल्यानंतर हा ‘अँक्युरियल’ आणि ‘लॉ’मध्येसुद्धा तो उत्तम काम करेल असं लक्षात आलं. मी त्याला तसं सांगितलं. माझा मित्र इंजिनिअर व त्याची बायको मेडिकलमधली असल्यानं त्यांना त्यांच्या मुलानं सायन्स शाखा सोडावी हे काही झेपेना!
गंमत म्हणजे हा मुलगा, जो आतापर्यंत अगदी गप्प होता, तो अचानक बोलू लागला, तेही उत्साहाने ! म्हणाला मी आई-बाबांना केव्हापासून सांगितलं की मला लॉयर व्हायचंय; पण ते ऐकतच नाहीत!या गोष्टीला आता 5-6 वर्षे झाली आहेत. तो मुलगा आता इंग्लंडमध्ये उत्तम लॉयर होऊ घातलाय. आनंद वाटला!
आज एअरपोर्टवर जुना मित्र भेटला. म्हणाला, शाळेत मला थिअरी कधीच जमली नाही म्हणून दहावीनंतर मी डिप्लोमा केला. मग 10 वर्षे नोकरी केली आणि मला कळलं, की मला गोष्टी विकता उत्तम येतात. मग मनात विचार आला की इतरांसाठी किती दिवस काम करायचं आणि का? मग पगाराचे जमलेले दोन लाख रुपये बायकोला दिले आणि 1 वर्ष स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी मागून घेतलं.
पहिले तीन-चार महिने जरा जम बसायला वेळ गेला; पण मग मला ऑर्डर्स मिळत गेल्या. मग मागे वळून बघितलेच नाही ! आज माझं नुसतंच कन्सलटिंग नाही तर दोन फॅक्टर्या आहेत. 80 लोकं कामाला आहेत.बघा म्हणजे ज्यानं नुसता डिप्लोमा केला आहे त्यानं आज 32 इंजिनिअर्स कामावर ठेवलेत.मुद्दा असा, मी दोन वेगळ्या पिढय़ांची दोन उदाहरणं मुद्दाम तुमच्या समोर ठेवतोय.मागील दोन लेखांमध्ये मी ‘स्व’ची ओळख आणि तद्नुषंगिक स्वोट अँनालिसीस याबद्दल तुमच्याशी बोललो. तोच धागा पकडून आता स्वत:ला ‘नेमकं’ काय जमतं-आवडतं याचा विचार करायला पाहिजे. आणि पुढील काळातील गरज ओळखून सतत जागरूक राहणं, बदलाला तयार राहणंदेखील महत्त्वाचं आहे. तेही एक सॉफ्ट स्किल आहे, अत्यंत महत्त्वाचं.मी स्वत:च तयार केलेलं एक तंत्र- ज्याला मी SWAF Analysis म्हणतो ते तुमच्यासमोर मांडतो. तुम्हाला त्याचा करिअर निवड, त्यात गती मिळवणं आणि अगदी मुलाखतीसाठीसुद्धा उपयोग होईल.यातील S आणि W म्हणजे स्ट्रेंथ (ताकद) आणि Weakness (कमतरता) हे स्वोट मधलंच आहे. परंतु नंतर ए चा अर्थ अचिव्हमेंट (यश) आणि एफचा अर्थ फेल्युअर (अपयश) असा आहे.आता हे सूत्र वापरा आणि बघा, तुम्हाला नेमकं काय आवडतं ते.बाकी पुढच्या अंकात.
--------------------------------------------------------------------
हे एकदा करून पाहा!
एकदा शांतपणे बसून खालीलप्रमाणे चौकट मांडून बघा. आणि प्रत्येक गोष्ट अत्यंत इमानदारीनं लिहा.स्ट्रेंथमध्ये S1, S2.. असं जी काय तुमची ताकद आहे, ते तुम्हाला वाटतं ते क्रमानं लिहा. उदाहरणार्थ भाषाकौशल्य (S1), छान गणित (S2), लोकसंग्रह (S3) असं लिहा.मग विकनेस. म्हणजे आपल्याला काय येत नाही, हे लिहा. (W1) इंग्लिश कच्चं असत, (W2) आत्मविश्वास नसणं असं लिहा. Achievement मध्ये तुमची सर्वात संस्मरणीय यश लिहा. ते इतरांच्या दृष्टीने नाही तर स्वत: तुम्हाला का वाटतं, नेमकं यश काय आहे, ते तुम्हाला का महत्त्वाचं वाटतं ते लिहा. उदा. परीक्षेतील यश (A1), केलेलं उत्तम सामाजिक कार्य (A2).. इ. मग फेल्युअरमध्ये तुमचं मोठं अपयश काय आहे, असं तुम्हाला वाटतं ते लिहा. उदा. वक्तृत्व स्पर्धेत अडखळणे (F1), team मध्ये सिलेक्शन न होणं (F2).. इ.मग अजून एक महत्त्वाची गोष्ट करा म्हणजे A1 घडण्यात S1 पासून कोणती स्ट्रेंथ कारणीभूत ठरली त्याचं विश्लेषण करा. आणि कोणतं विकनेस, कोणत्या फेल्युअरसाठी कारणीभूत ठरलं असेल ते लिहा. ते बाणाने दर्शवा. 2-3 वेळा इतरांकडून तपासून घ्या. तुमचं तुम्हालाच कळेल की कोणत्या एरियात तुम्हाला जास्त काम करण्याची गरज आहे. ताकदपण कळेल आणि कमतरतापण.
(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)
bhooshankelkar@hotmail.com