- आर्यमन दर्डा
प्राणी. मला आवडतात. खूप आवडतात.मी नागपूरला होतो, शाळेत जायचो तेव्हापासूनच प्राणी म्हटलं की, मला फार कुतूहल वाटायचं. लहानपणी माझ्या खेळण्यातही प्राणीच जास्त होते. अॅनिमल प्लॅनेट पहायचो. मन लावून तासन्तास टीव्हीवर दिसणारं प्राण्यांचं जग पहायचो. त्यांचं जगणं, त्यांच्या हालचाली, शिकार करणं हे सारं अद्भुत वाटायचं. अजूनही वाटतं.नागपूर सोडलं मग आधी मुंबईत आणि आता स्वित्झर्लंडमध्ये शिकायला आलो आहे. या काळात मी अनेकवेळा जंगल सफारीला गेलो. जंगलात आधी आपण जातो ते उत्सुकतेने. सहज फिरायला म्हणून. पण नंतर जंगल स्वत:च आपल्याला बोलवायला लागतं.
हळूहळू मला जंगलाच्या हाका ऐकू येऊ लागल्या आणि त्या जगाची ओढ लागली.जंगलातल्या भ्रमंतीमुळे प्राण्यांचं जगही मला थोडंथोडं कळायला लागलं. लहानपणापासून त्यांच्याशी दोस्ती होती, ती अधिक घट्ट होत गेली.
आधी आवड होती. त्यातून उत्सुकता वाढली. प्राण्यांच्या जगाबद्दल मला कळू लागलं, तसतसं वाचन सुरू झालं. या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी भेटी सुरू झाल्या आणि मग मला वाटायला लागलं, जगात इतके लोक इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी प्राण्यांसाठी काम करतात, आपणही आपला लहानसा वाटा उचलला पाहिजे. ..पण मी काय करणार?
उत्तर दिलं, माझ्या हातातल्या कॅमेऱ्यानं.तो कॅमेराही माझ्याकडे एक दिवस अचानकच आला.२०१३ सालची गोष्ट आहे. माझ्या दादाजींबरोबर म्हणजे आजोबांबरोबर आफ्रिकेतल्या सेरेंगटीमध्ये आम्ही ट्रीपला गेलो होतो. त्या ट्रीपच्या आधी पपांनी मला घरातलाच एक चौदा वर्षे जुना; पण चांगला कॅमेरा वापरायला दिला. सुरुवातीला वाटलं हे कशाला माझ्याकडे? त्याचं ओझंही वाटायला लागलं. तो कॅमेरा बाळगावा लागल्यामुळे भरपूर बोअर झाल्यावर मी थोडा विचार केला, आता कॅमेरा हातात आलाच आहे तर तो वापरून पाहायला काय हरकत आहे? म्हणून मी काही फोटो काढले.
- गंमत म्हणजे ते फोटो सगळ्यांना आवडले. मलाही थोडा धक्काच बसला. जुन्या कॅमेऱ्यानंही मी बरेच चांगले फोटो काढले होते. दादाजी खूश झाले. माझ्या ममा-पपांनाही ते फोटो आवडले... जो कॅमेरा बोअर वाटत होता, त्याच्यामुळे त्या ट्रीपमध्ये माझं खूपच कौतुक झालं. त्यामुळे खूश होऊन मी एकापाठोपाठ एक फोटो काढत सुटलो. घरातल्यांना, मित्रांना दाखवले तर त्यांनाही आवडले. आणि माझी दोस्तीच झाली कॅमेऱ्याशी !
नंतर प्रत्येकवेळी जंगलात जाताना कॅमेरा माझ्यासोबतच निघाला. आफ्रिकेतल्या जंगलात जाऊ लागलो. निसर्गातल्या विविध क्षणांचे रंग, आफ्रिकेतल्या जंगलातल्या प्राण्यांचा गूढ वावर, दाट जंगलातून अनुभवलेले सूर्योदय, गवताळ प्रदेश, सदाहरित झाडं, वाळवंटं हे सारं आता माझ्या कॅमेºयात उतरू लागलं. अवतीभोवती प्राणी होते ते तर मी पहायचोच. फोटो काढायचो मात्र ते करता करता थोडी माहिती हाताशी येत माझ्याही नकळत माझा अभ्यास सुरू झाला.
आधी फक्त प्राणी दिसत होते. मग त्यांच्याशी दोस्ती झाली, तसे प्राणी जीवनाशी संबंधित, त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालायला निघालेले प्रश्न दिसू लागले. प्रश्न खूप गुंतागुंतीचे होते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आफ्रिकेतल्या जंगलांचं रक्षण करणारी माणसं, स्थानिक आदिवासी यांच्याशी गप्पा मारायला लागलो. परदेशात जंगल-पर्यटनाची परवानगी असली तरी कायदे अत्यंत कडक असतात. वनभ्रमंतीच्या नियमांचं पालन किती आणि का महत्त्वाचं असतं हे मला तिथं काम करणाºया लोकांशी बोलून समजलं. नवनवीन गोष्टी कळू लागल्या. केनिया, बोटस्वाना,
टान्झानियामधल्या जंगलांचे रक्षक हे स्थानिक आदिवासीच असतात. सारं जंगल त्यांना पाठ असतं. जंगलाची अचूक माहिती देतात, प्रश्न विचारले तर नेमकी माहिती देतात. जंगल त्यांचं घरच, त्यातली एकूण एक खूण त्यांना पाठ असते. मला तर ते जंगलांचे एनसायक्लोपीडियाच वाटतात.
तिथं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, जंगल समजून घ्यायचं, त्याच्याशी दोस्ती करायची तर प्रत्यक्ष जंगलात काम करणाऱ्या माणसांशीच बोलायला हवं. त्यांच्यासोबत राहायला हवं, त्यांच्या नजरेनं पहायला हवं.हे सारं कळू लागलं, ते मी माझ्या ममाशी शेअर करत होतो. ती स्वत: उत्तम फोटोग्राफर आहे. तिनं मला फोटोग्राफीची काही टेक्निक्स शिकवली.
हळूहळू जंगल आणि प्राण्यांशी असलेली दोस्ती माझ्या कॅमेºयात अधिक सफाईदारपणे उतरू लागली. गेल्या वर्षी आम्ही आमच्या दोघांच्या फोटोचं मुंबईत एक प्रदर्शनही भरवलं. माझ्यासाठी तो सगळा अनुभवच नवा होता.हे सारं करताना स्वित्झर्लंडमधल्या माझ्या शाळेनेही मला नवी दृष्टी दिली. आणि या दरम्यानच्या भारतभेटीही मला शिकवत राहिल्या.
‘सेव्ह एनव्हॉयर्न्मेण्ट’- पर्यावरणाचं रक्षण करा, असं आपण नेहमी म्हणतो, ऐकतो आणि वाचतोही. त्यापेक्षा ‘हेल्प एनव्हॉयर्न्मेण्ट’ असं म्हटलं तर?
- ती आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे.(जंगल, वन्यजीव या जगात भ्रमंती करणारा, रमणारा आर्यमन फोटोग्राफर असून, ‘इन्स्टिट्यूट ल् रोझे’ या स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध शाळेत शिकतो )
‘लिटल प्लॅनेट फाउण्डेशन’मी परदेशात जे पाहतो, अनुभवतो; त्यातली माहिती माझ्या देशातल्या मुलांपर्यंत पोहचवणं ही माझीही जबाबदारी नाही का, असा प्रश्न पडायला लागला. आपली जंगलं आणि वन्यजीवांचं संरक्षण, स्वच्छता आणि इतर नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठीच्या जबाबदारीची जाणीव, हे सगळं शाळेत असतानाच मुलांपर्यंत पोहचलं, तर? - परिस्थिती खूप बदलेल, सुधारेल.जशी मला वाइल्ड लाइफ आणि जंगलांची गोडी लागली तशी ती माझ्या वयाच्या किंवा थोड्या मोठ्या तरुण मुलांनाही लागली तर?- पण ते कसं जमावं?
वाइल्ड लाइफ, जंगलातले प्राणी, जंगल याविषयी तरुण मुलांना कुतूहल असतं आणि शंकाही असतात. त्यांची उत्तरं कुठं मिळतील? त्यासाठी मुलांकडेच एक हक्काचं व्यासपीठ का असू नये?- असे खूप प्रश्न मनात येत होते. मग वाटलं, आपल्याला जे काम महत्त्वाचं वाटतं, ते आपणच का करू नये?
त्यासाठीच मी एक छोटीशी सुरुवात करायचं ठरवलं आहे. या प्रयत्नाचं नाव ‘लिटल प्लॅनेट फाउण्डेशन’! आपल्या देशात आणि जगभरात अनेक लोक वाइल्ड लाइफ आणि वन्यजीवांसाठी काम करत आहेत. प्राण्यांच्या एकेका जातीवर संशोधन करत, त्यांच्या जतन आणि संरक्षणासाठी अनेकांनी आयुष्य वेचलं आहे. तशी काही माणसं मलाच माझं काम करताना भेटली. अशा भन्नाट माणसांना आणि त्यांच्या त्याहून भन्नाट कामाला माझ्या मित्रांपर्यंत पोहचवायला हवं.. आणि माझ्या मित्रांची संख्याही वाढायला हवी असं मला वाटतं. ‘लिटल प्लॅनेट फाउण्डेशन’ तेच काम करील.वाइल्ड लाइफ नावाच्या अचाट आणि अद्भुत विश्वात रमलेली अनेक माणसं आणि त्यांचं काम ‘लिटल प्लॅनेट फाउण्डेशन’मधून तुमच्यापर्यंत पोहचेल.- पण आपण भेटणार कसे? त्यासाठी ऑक्सिजनमधून एक खास लेखमाला सुरू होते आहे पुढच्या शुक्रवारपासून...