आणि पिंजऱ्याचं दार उघडलं तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:28 PM2018-06-15T15:28:18+5:302018-06-15T15:28:18+5:30

आज दिवसभरात माझी आठवण आली, प्रेम वाटतंय अशा प्रकारचा कुठलाच मेसेज मला त्यानं केला नाही. का केला नसेल?

long distance love makes you insecure, then.. | आणि पिंजऱ्याचं दार उघडलं तेव्हा...

आणि पिंजऱ्याचं दार उघडलं तेव्हा...

Next

श्रुती मधुदीप
हे घरी निघायला लागले की असं होतं; पण तुला कसं समजावून सांगू? घरी जायची इच्छा नसते असं नाही. तीव्र इच्छा असते घरी जायची. आई-बाबांना भेटायची. माझा मिठू मिठू पोपट, ज्याच्याशी लहानपणापासून मी खेळले, ज्यानं माझं जग व्यापून गेलं होतं त्या मिठूला भेटण्याची. पण तुझाही हात सोडवत नाही. अन् घराकडे जाणं टाळता येत नाही. असं वाटतं तुझा हात पकडून तुलाच घेऊन जावं घरी. इनव्हिजिबल होऊन माझ्यासोबत सुटीचा एक महिना आपण सोबत माझ्या घरी घालवावा; पण हे काहीतरीच. किती बालीश ना ! पण वाटणं वाटणं आहे. मग ते कसंही असो, मी त्याला काय करू शकते! 
म्हणून हे असं मधेच घुटमळायला होतं. रडू येतं. आक्रं दून रडावंसं वाटतं. वाटतं मी परतेन तेव्हा तू कुठं असशील? तू माझाच असशील ना? की या एका महिन्यात तुला काहीतरी वेगळं वाटायला लागेल? हे बघ, माझे श्वास हे असे वाढू लागतात, अशा विचारांनी धस्सच होतं काळजात. पुन्हा पुन्हा तुला ओरडून हाक मारत राहावीशी वाटते रे; पण या बसला काही थांगपत्ता लागत नाही माझ्या आतल्या या कोलाहलाचा. ती आपली चालत राहाते मला घेऊन कशाचाही विचार न करता. 

**
 मी : रिच्ड सेफली डिअर मी जरा कमी मेसेज करू शकेन हं आज. बाकी तू कळवत राहा काय करतोयस ते.
तो : येस डिअर, छान एन्जॉय कर.
मी : हो.
     आज दिवसभरात माझी आठवण आली, प्रेम वाटतंय अशा प्रकारचा कुठलाच मेसेज मला त्यानं केला नाही. राहून राहून त्नास होत राहिला मला त्याचा. पण हा त्नास सांगणार कसा? तो आर्टिक्युलेटच करता येत नाही. असा फक्त धुमसत राहातो मनाच्या तळाशी! 

**
ऑनलाइन आलं की जरा बरं वाटतं. स्वतर्‍पासून दूर जाता येतं. स्वतर्‍च्या विचारांपासून, अस्वस्थतेपासून दूर. पण हे कुठलं ठिकाण? किती दूर आहे खर्‍या जगापासून मला माहीत नाही. ऑनलाइन आल्या आल्या मी त्याच्या चॅट विंडोमधे गेले. तर तो ऑनलाइन. 
मी त्याला 7.32 मिनिटांनी मेसेज केला -
हाय!

त्याचं सीन आलं नाही. जवळजवळ चार मिनिटं! मग मी त्या भल्या मोठय़ा वाटणार्‍या काळात आमच्या ग्रुपमधल्या कोण कोण मुली ऑनलाइन आहेत, हे पाहिलं. रिया ऑनलाइन दिसली. मला प्रचंड त्नास होऊ लागला. इतका की बहुतेक माझं शरीर माझ्या विचारांना रिअ‍ॅक्ट होत होतं. श्वास वाढले होते. प्रचंड ओरडावं असं वाटलं मला. इतक्यात त्याचा मेसेज आला.
  ‘हाय जानू’ आणि पुढे हसायची स्माइली. 
     पण त्या मेसेजमधली ‘जानू’ आणि स्माइली माझ्यार्पयत पोहोचलीच नाही. माझ्यार्पयत पोहोचू देण्यात रिया नावाचा अडथळा मी निर्माण केला होता. भरल्या डोळ्यांनी मी त्या मेसेजकडे पाहत राहिले. माझ्याकडे काहीच नव्हतं रिप्लाय करायला डोळ्यातल्या पाण्याशिवाय! 
मग ऑफलाइन जाऊन मी माझ्या मिठूशी बोलायला त्याच्या पिंजर्‍यापाशी गेले. 
**
 तो : हाय, कशीयेस? काय करतीयेस?
मी : काही नाही. आईशी बोलतेय.
तो : अच्छा. बोल बोल. अरे तुला सांगायचं होतं की, आज संध्याकाळी मी, अनुज आणि रिया फिरायला चाललोय. लेकला जाऊ बहुतेक. नक्की ठरतंय अजून.
    मेसेज वाचला आणि मला काय झालं ते स्वतर्‍लाच कळेना. मी काहीही रिप्लाय न करता फोन गादीवर फेकून दिला. 
   रियासाठीच गेला असणार हा! आणि काय माहीत अनुज आहे की नाही सोबत? की उगाच नावापुरतं सांगतोय मला! मी नाहीय ना आता तिथं म्हणून, म्हणून त्याला रियाला भेटावंसं वाटलं असणार! मी का आलेय घरी? म्हणून हे सगळं होतंय. जाऊदे! मला नकोच आहे तो. अजिबात नकोय. तो रियाला भेटणार नसेल तर आणि तरच आमचं नातं टिकू शकतं नाहीतर.  
    हां, ती माझ्यापेक्षा सुंदर आहे ना. तिचं शरीर कसं माझ्यापेक्षाही जास्त भरलेलं. शी! काय बोलतेय मी हे? पण मला वाटतंय हे सगळं. का म्हणून त्याला मी आवडावी? अगं, तुम्ही जवळ जवळ एक वर्ष झालं आहे रिलेशनशिपमध्ये आहात ! काय बोलतेयस तू हे? 
मी काही चुकीचं बोलत नाहीय. हेच खरंय! प्रत्येकवेळी भेटलं की सगळ्या मैत्रिणींना मिठी मारायची काय गरज आहे? आणि उगीच सगळ्यांच्या जवळ जवळ करायचं ! मला अजिबात आवडत नाही हे. 
पण भेटल्या भेटल्या मिठी तर मीपण माझ्या मित्नांना मारते. त्यात मला काही गैर दिसत नाही मग त्याच्या मिठीत मला असं काय दिसतं? मला काहीच कळत नाही. मुळात त्यानं रियासोबत जायचं नाहीय, इतकंच माझं म्हणणं आहे! पण माझं म्हणणं कोण ऐकून घेतो? आणि का घ्यावं? 
त्याला ती रियाच आवडत असणार! मधे एकदा म्हणालेला ना, ‘रियाना प्रत्येक माणसाशी वागताना एक अंतर ठेवून वागते बघ. हा प्रॅक्टिकलनेस तुझ्यात असायला हवा. तो तू आत्मसात करायला हवास. नाहीतर उगाच आपल्यालाच त्नास होत राहातो.’
आपल्यालाच त्नास होत राहातो म्हणे! उगी रियाचं कौतुक करायचं माझ्यासमोर बाकी काही नाही. कशाला हवेत तिच्यातले गुण! मला काहीच नकोय तिच्यातलं. मी कशाला घेऊ? मला गरजच नाहीय मुळात! मी आहे तशी छान आहे. मला काही कुणाचं उसनं घ्यायची गरज नाहीये. 
आम्ही प्रेमात पडायच्या आधी पण हे बागेतबिगेत फिरायला जायचे. काय गरजये? काही नाही! तो माझा असेल तर तो फक्त माझाच असेल! दुसर्‍या कुणाचंही त्यानं असायचं नाही. 
मी काय बोलतेय हे? असं कसं असू शकतं ! अभी पण माझा किती जवळचा मित्न आहे. पण म्हणून त्यानं कधी अभीला भेटू नकोस किंवा त्याला भेटलीस म्हणजे तू माझी नाहीस, असं कधीच म्हटलं नाही. इन फॅक्ट माझं अभीशी असं लहान मुलासारखं, मजेमजेचं वागणं त्याला कधी चुकीचं वाटलं नाही. कधी आम्ही दोघंच खोलीमधे आहोत म्हणून त्याची चीड चीड झाली नाही. इतका विश्वास कसा काय ठेवू शकला तो माझ्यावर? आणि मला तर साधं  खिडकी उघडून मोकळी हवादेखील घेता येत नाही. श्वास गुदमरत राहातो माझा निव्वळ ! 
इतक्यात त्याचा मेसेज आला
  ‘आम्ही आज 5 वाजता निघू गं. 3-4 तासात येऊ परत. विल मिस यू!
आणि मी खुदकन स्वतर्‍शीच हसले. आणि मिठूकडे जाऊन त्याला म्हणाले, 
‘मिठू! चल तुला उडायचं का? किती दिवस असा माझ्या हट्टापायी पिंजर्‍यात राहाशील. उडून जाशील तिथे माझी आठवण काढशीलच ना! चल’
..आणि मी पिंजर्‍याचं दार उघडलं! 

dancershrutu@gmail.com

Web Title: long distance love makes you insecure, then..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.