-एम. डी. देसाई
‘लोकमत’ ऑक्सिजन पुरवणीत (2 ऑगस्ट 2018) ‘बर्फाळ पोटातलं रहस्य’ हा लेख वाचला. आणि माझ्या डोळ्यांसमोर ते क्षण आजही जसेच्या तसे उभे राहिले. आता मी निवृत्त झालोय, मात्र त्या दुर्दैवी घटनेचा मी साक्षीदार आहे. त्याला 50 वर्षे झाली आता. पण तरीही तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आजही उभा आहे. माझी 10 जानेवारी 1968 रोजी आसाममधल्या जोरहाटहून चंदीगडला 12 विंग एअर फोर्स स्टेशनला बदली झाली. मी चंदीगडला कामावर हजर झालो. तिथे मी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर, टेलिफोन कम रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत असे. माझी डय़ूटी ट्रॅफिक कंट्रोलला पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेर्पयत असे. एखादं विमान येणार असेल किंवा एखादं एक्सरसाइज ऑपरेशन असेल तर रात्री डय़ूटी (एटीसी) फ्लाइंग कंट्रोलमध्ये करावी लागे.मी फेब्रुवारीत एटीसीमध्ये डय़ूटी रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत होतो. आणि तो दुर्दैवी दिवस उजाडला. त्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी 1968 रोजी एक एएन-12 विमान (25 स्क्वाड्रनचे) 98 प्रवासी व 5 कर्मचारी (त्यात दोन पायलट, नेव्हीगेटर, सिग्नलर व फ्लाइट इंजिनिअर) असे एकूण 103 प्रवासी घेऊन निघालेलं विमान हरवलं. गायबच झालं. हे एएन-12 विमान चंदीगड ते लेह अशा प्रवासाला निघालं होतं. त्याचे कॅप्टन होते फ्लाइट लेफ्टनंट एच. के. सिंग.या विमानाने दुपारी 12.50 वाजता चंदीगडहून लेहसाठी हवेत झेप घेतली. ते नियोजित वेळेनुसार 50 मिनिटांनी लेहला पोहोचायला हवं होतं. मी त्यावेळी त्या विमानाशी आरटी कॉन्टॅक्ट ठेवून होतो. पायलटशी बोलायचं व त्यांचं आणि माझं, आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर ह्यांचं संभाषण लॉग बुकमध्ये शॉर्टमध्यं लिहावयाचं. आमचा संबंध विमानोड्डाण केल्यापासून ते पुढच्या स्टेशनर्पयत आरटी संबंध जोडेर्पयत असायचा. चंदीगड ते लेहमध्ये तीन फ्लाइंग अल्फा, ब्रॅव्हो व चार्ली येत होते. माझी जबाबदारी विमान अल्फा पॉइंटला जाईर्पयत सर्व माहिती पुरवायची. त्यामध्ये हवामान, उंची, दिशा व रेसी प्रोकल ट्रॅफिक असेल तर सांगायचं. एएन-12 हे विमान 550 मैल वेगाने 35000 फुटांवरून चाललं होतं. या विमानाशी माझं संभाषण ते पॉइंट अल्फाला जाईर्पयत होतं. नंतर हे विमान जसं पुढं जाईल तसं त्या स्टेशनचं संभाषण नुसतं ऐकायचे. पूर्वी विमानाचं संभाषण व विमानाची दिशा एडी 200 हे मशीन हातानं रोटेट करून नोंद करून घ्यावं लागत असे. आता सर्व संभाषण हवामान, दिशा, वेग वगैरे सर्व संगणकावर स्वयंचलित यंत्रणेद्वारे होतं. हे विमान लेहच्या हद्दीर्पयत आलेलं मी ऐकलं होतं. उधमपूर स्टेशन पॉइंट ब्रॅव्ही हे त्याला आरटी चॅनेलवर वारंवार बोलावत होतं. पण विमानाचा संपर्क दुपारी 1.25 च्या दरम्यान तुटला. चंदीगडहून मी व पॉइंट अल्फा बॅ्रव्हो सारखे विमानाला आरटी कॉल देत होतो; पण एएन-12 या विमानाकडून कोणताही संदेश व उत्तर मिळत नव्हतं. मी लगेच माझ्या वरिष्ठांना एअर ट्रॅफिक कंट्रोलरला ही माहिती दिली. त्यांनीही कॉल देऊन विमानाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ. तोर्पयत दुपारचे 1.50 वाजले होते. माझ्या वरिष्ठांना फ्लाइट कमांडर, स्टेशन कमांडर यांनाही माहिती दिली. लॅण्डलाइन (इमर्जन्सी)ने कॉलवर सर्व माहिती अल्फा, ब्रॅव्हो व लेहला कळविली. सर्व पुन्हा विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही सर्वजण कमालीचे चिंतातुर झालो. सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्या केबिनमध्ये आले. त्यांनी माझे लॉग पाहिलं. मी ते शॉर्टमध्ये लिहिलं होतं. त्यांना ते वाचून दाखवलं. तोर्पयत फ्लॅश संदेश आला. लॉग बुक सील करा. त्यानुसार लॉग बुक सील करण्यात आलं. विमान लेहला पोहोचलं नाही किंवा परतही आलं नाही अथवा दुसर्या कुठल्याही तळावर उतरलं नाही. दोन्ही स्टेशनवर हाहाकार उडाला. दुसर्या दिवशी वृत्तपत्रांत व रेडिओवरही विमान गायब झाल्याच्या बातम्या झळकल्या.मला एमआय 21 हेलिकॉप्टरमधून शोधमोहिमेसाठी पाठविण्यात आले. ही मोहीमही आठ दिवस सुरू झाली; परंतु हाती काहीच लागलं नाही. लोकसभेत या विमानावरून बरीच चर्चा झाली. रोज दोन विमाने शोधमोहिमेवर जात; पण सगळं व्यर्थ. त्यासाठी 5 कोटी रुपयांचे इंधन खर्च झालं. हिमालयातील बर्फ वितळल्यावर काही धागेदोरे लागतील असं सांगण्यात आलं. शेवटी बर्फ वितळला; परंतु विमानाचा थांगपत्ता लागला नाही. पुढे 2000-2001 च्या दरम्यान विमानाचे सुटे भाग व काही मृतदेह मिळाले. एक मृतदेह सापडल्याची बातमी दूरदर्शनने 15 ऑगस्ट 2003 ला दिली. मृत जवान बळीरामची 73 वर्षाची पत्नी व 45 वर्षाची मुलगी या दोघी चंदीगड स्टेशनवर त्यावेळी मृतदेह ताब्यात घ्यायला आल्या होत्या. डोग्रा रेजिमेंटने 2005 ते 2007 या काळात तीनदा शोधमोहीम केली; पण बर्फामुळे यश आलं नाही. शेवटची शोधमोहीम 2009 मध्ये लाहोर, स्पिती, बटाला या भागात 21 हजार फुटांर्पयत राबविण्यात आली.या आठवणी पुन्हा ताज्या केल्या ऑक्सिजन पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या त्या लेखामुळे. ही घटना घडल्यापासून मी रोज वृत्तपत्रं चाळतो, वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहतो. कारण फक्त एकच की चुकून त्या बेपत्ता विमानाची बातमी वाचायला, ऐकायला वा पाहायला मिळेल. गेली 50 वर्षे त्या विमानाची आणि त्यातून प्रवास करणार्या जवानांची प्रतीक्षा कायम आहे. या विमानाचा शोध घ्या म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मी पत्र लिहिलं. मराठी माणूस संरक्षणमंत्री झाला म्हणून मनोहर र्पीकर यांना दोन पत्रे लिहिली; परंतु पुढे काही झालं नाही.आयुष्यात कधीही न विसरण्यासारखी ही दुर्घटना आहे. आपल्यासमोर 103 जवान विमानात बसतात. विमानाचं उड्डाण होतं आणि पुढच्या काही तासांत ते गायब होतं. हे सारंच अनाकलनीय आहे. या विमानाचा शोध लागावा एवढीच इच्छा आहे.(एम. डी. देसाई हे मूळचे कुर्लीचे. ते 12 जानेवारी 1963 ते 25 जानेवारी 1973 र्पयत एअर फोर्समध्ये होते. निवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. )(शब्दांकन र् विश्वास पाटील, कोल्हापूर)