स्वतःची ‘किंमत’ सोशल मिडीयातल्या लाइक्स-कमेण्टवर मोजताय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:38 PM2018-12-20T14:38:44+5:302018-12-20T14:41:15+5:30
काढ फोटो, कर एडिट की टाक सोशल मीडियात! वाच कमेण्ट, मोज लाइक, हे गणित आपल्याला कुठं नेतं? एखादी निगेटिव्ह कमेण्ट, हेच बदल, तेच बदल म्हणून मिळणारे फुकट सल्ले आपल्या स्व-प्रतिमेचं भजं करतात का?
- प्राची पाठक
कॅमेरा ही गोष्टच आता आम झाली. मोबाइल फोनमध्ये कॅमेरा आला आणि क्लिकक्लिकाट करायची लोकांची हौस जामच पुरी होऊ लागली. ते कॅमर्याचे रोल जपा, त्यात अमूकच फोटो निघणार वगैरे लिमिट होतं, अशा कहाण्या तुम्ही ऐकल्या तर इसवीसनापूर्वीची गोष्ट वाटेल. फोटो काढले कधी काळी, सगळा रोल संपला कधी काळी आणि ते धुऊन आणले कधी काळी अशी ती फार भन्नाट गोष्ट होती. काढलेला फोटो प्रिंट होऊन हातात यायला वेळ लागत असे पूर्वी हे आता कुणाला सांगितल्याशिवाय, वाचल्याशिवाय खरंच वाटणार नाही. माहितीही नसेल तरुण मुलामुलींना ते!
आता सगळं एकदम इन्स्टण्ट. फोटो काढला, झूम केला, हवा तर लगेच प्रिंट केला. नाहीतर मोबाइलवर चटचट काढत राहायचे नुस्ते फोटो. फोटो एडिट करणारे शेकडो अॅप्स आहेत. हजारो फ्रेम्सचे डिझाइन्स. आपल्या चेहर्यातले, शरीरातले व्यंग झाकणारे, लपवणारे अनेकविध ऑप्शन्स आपल्या हातात आहेत. त्यांचा वापर करून आपण भारी, लै भारी दिसू शकतो.
पण दिसणार कुठं?
कुठं म्हणजे काय, हे सारं करून फोटो सोशल मीडियातच पोस्ट केले जातात; पण इतकं सगळं असूनही, इतका खटाटोप करून फोटो टाकूनही दुसर्या व्यक्तीनं (किंवा आपल्याला हव्या त्या व्यक्तीनं) आपल्याला छान म्हणावं अशी आस असतेच. म्हणजे तशी आस लावून बसतो की नाही आपण? का काढतो आपण सेल्फी? का स्वतर्चे फोटो सतत अपलोड करत असतो कुठे कुठे? व्हॉट्सअॅपच्या स्टेटसला आपल्यासारखं काहीतरी भारी, त्याहून भारी टाकत राहायची ऊर्मी कुठून येते, हे प्रश्न पडलेत का कधी आपल्याला? इतरांचे चकचकीत, पॉश फोटो पाहून काय येतं आपल्या मनात? इतरांच्या आनंदात कितीही आनंदानं सहभागी व्हायचं ठरवलं, तरी कळत -नकळत आपल्यावर त्याचं प्रेशर येतं की नाही? ‘कसं काय बाबा यांचं आयुष्य इतकं हॅपनिंग’ असं वाटत राहातं का सारखं? त्यातून आपणही सुपर, सुपरडुपर आणि बंपर सुपरडुपर काहीतरी करायच्या मागे लागलेलो असतो का?
एखादा फोटो आपण सोशल साइटवर अपलोड केला समजा. अमूक कोणी तो बघावा असं आपल्याला वाटत असतं. मग मनात मांडे खाणं सुरू होतं. आता बघूच कशी रिअॅक्शन येणार. बाह्या सरसावून तय्यार! मीपण काही कमी नाही, असं काहीतरी न बोलता केवळ फोटोमधून कोणाला तरी दाखवायचं असतं. काहीतरी कोणापुढे तरी सिद्ध करायचं असतं. मनात असे बरेच उलट-सुलट विचार येऊन आपण ते करतोही. पण ती गोष्ट, असलाच तर बदला वगैरे, टक्कर बिक्कर तिथेच संपत नाही. आपण टाकलेले फोटो नेमके त्यानं/तिनं बघितले की नाही, हा भुंगा डोक्याचा ताबा घेतो. बघितले असतील तर काय आणि नाहीतर काय याचे खेळ मनात सुरू होतात. मनातच एक आख्खं विश्व त्या फोटोभोवती उभं राहातं. मग ज्याला/जिला दाखवायला म्हणून इतकी धडपड केलेली असते, ते सोडून वेगळ्याच कोणी तो फोटो बघून वेगळेच काही तर्क-वितर्कसुरू करतात. कोणी कौतुक करतं, तर कोणी ‘काय हे?’ प्रकारच्या प्रतिक्रि या देतं. ज्या कारणासाठी इतका अट्टाहास केलेला असतो, त्यासार्यांच्या गावीच नसतो हा प्रकार. मग तर फारच फ्लॉप शो होतो.
हे कमीच म्हणून शंभर लोकांना आपला फोटो आवडला आणि एका कोणी निगेटिव्ह प्रतिक्रि या दिली, तरी ती निगेटिव्ह प्रतिक्रि या मनात टेपसारखी वाजत राहाते. कौतुक करणारे खोटे होऊन जातात लगेच आणि एक नकोशी कमेण्ट त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आपल्याला घेरते. आणि मग तोच भुंगा मागे लागतो.
या सगळ्यात एक प्रश्न स्वतर्ला विचारायचाच राहून जातो.
तो असा की, इतरांच्या आपल्याबद्दलच्या बर्या-वाईट मतांवर आपली स्वतर्विषयी छान वाटायची गाडी किती काळ चालणार? आपण सारखी तिची ढकलगाडी का करायची? तिला बाहेरून धक्के मारून दामटायची आपल्याला सवय लागली आहे का?
या प्रश्नांची उत्तरं देऊन पाहा स्वतर्ला!
फोटो काढताना आपले दात नीट येत नाहीत, आपण अमूक कोनातून जास्त जाड, बारीक दिसतो, आपले केस असेच बसवले पाहिजेत, असे वेगवेगळे स्व-प्रतिमेबाबतचे पैलू अनेकांच्या मनात आलेले असतात. फोटोसाठी पोझ देताना ते एकदम आपल्यावर हावी होतात. अमूक प्रकारची स्माइल दिल्यावर मी वाईट दिसतो, असं डोक्यात पक्कं झालं की आपण कमी हसून, दात झाकून हसायचा प्रयत्न करतो. कोणी वाकून उभं राहातात, कोणी कायम तिरपे उभे राहातात. चार-चौघांच्या फोटोत आपण बरे दिसू की नाही, केसं नीट दिसतील की नाही, असे खूप बारीक-सारीक ट्रिगर्स आपल्या मनाला सतावत असतात. अनेकदा ते आपल्यावर हावी होतात. मग आपण सगळ्या ग्रुप फोटोत मागे-मागे उभं राहू लागतो. काहीतरी सूचना सतत स्वतर्ला देत राहातो आणि त्यानुसार वागतो. ही आपल्यातल्या न्यूनगंडाची कसरत असते खरं तर. ती आपल्याशीच भांडत असते. आपल्या असण्या-दिसण्यावर ताबा ठेवायला बघते. आणि यासार्यात आपण विचारतच नाही स्वतर्ला की, का आपल्याला इतर कुणी केलेलं कौतुक हवं आहे? त्यातही कोणा विशिष्ट व्यक्तीचंच कौतुक/मान्यता का हवी आहे?
हे प्रश्न स्वतर्ला विचारायला हवेत. अगदी प्रामाणिकपणे स्वतर्ला त्यांची उत्तरं द्यायला हवीत. जोर्पयत आपलं आपल्याला स्वतर्विषयी योग्य असं आणि योग्य तितकंच लै भारी वाटणार नाही, तोर्पयत आपण कितीही महागडय़ा अॅक्सेसरीज घालून फोटो काढून घेतले तरी ते आपल्या देहबोलीतून आपला आत्मविश्वास आणि आनंद दाखवणार नाहीत. सतत आपल्या शरीरात काहीतरी कमी आहे, अशीच फिलिंग ते आपल्याला देत राहातील.
स्वतर्ला विचारा, हे सारं आपल्याला हवंय का? आणि नको असेल, तर इतर कोण काय म्हणतं यावर आपलं छान दिसणं आणि छान असणं अवलंबून ठेवणं बंद करा!
आपण जसे आहोत तसे, जगा बिंधास्त, मजेत!
***
आपली उंचीच कमी आहे. आपला रंगच असा. आपले हात असेच, दात तसेच, आपण जाडच आहोत, फार बारीक आहोत.
- असंच काय काय सतत मनात येतं का?
का येतं?
सांगा, स्वतर्ला - जे असेल, जसे असेल त्यातही मी छान दिसेन! तसा आत्मविश्वास आपल्या चेहर्यावर असला पाहिजे. त्यासाठी स्वतर्च्या मनाला वरचे वर सव्र्हिसिंगला काढायचं आणि त्याची नीटच विचारपूस करायची. खबरबात घ्यायची. एका परीक्षकाच्या नजरेतून त्याचं इन्स्पेक्शन करायचं.
आपण छान दिसतो की नाही, आपले फोटो चांगले येतात की नाही, आपण जे केलं ते अमक्यानं बघितलं की नाही, त्यावर त्याला काय वाटले असेल, हे प्रश्न स्वाभाविक असू शकतात. त्यांच्या मागं लागणं, उत्तरं शोधणं, थोडे बदल स्वतर्त करणं, आज आहोत त्याहून छान असायची, दिसायची धडपड करणं हे सगळं एका मर्यादेत ठीक असतं. पण आपली ‘ओळख’ मात्न इतकीच नसते, नाही; हे आपल्या लक्षात येऊ लागतं. ते एकदा कळलं की स्वतर्च्या शरीराविषयीची आपल्याच मनातली कचकच कमी झालीच समजा.
ती झाली तर, आपण आपल्याही प्रेमात पडू शकतो!
( पर्यावरणतज्ज्ञ असलेली प्राची मानसशास्त्राची अभ्यासक आहे.)