जगातल्या टॉप 100 डीजेंच्या यादीत कोल्हापूरची मुलगी कशी पोहचली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 08:10 AM2019-07-25T08:10:00+5:302019-07-25T08:10:02+5:30
आजरा, जि. कोल्हापूर या गावातली श्रेया. तिचा आणि डीजेच्या जगाचा काहीही संबंध नव्हता. पण म्युझिकची ओढ म्हणून तिनं एका नव्या जगात उडी घेतली आणि..
इंदुमती गणेश
मुलीचं शिक्षण पूर्ण झालं की तिचे हात पिवळे करणं ही मानसिकता अजूनही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असते. त्यात ते कुटुंब ग्रामीण भागातील असेल तर मुलीच्या चॉइसला काही वावच नाही. पालक उच्चशिक्षित असतील तर मुलीनं फार तर डॉक्टर-इंजिनिअर व्हावं किंवा सकाळी दहा ते पाचची नोकरी करावी असं वाटणंही अत्यंत आम बात आहे.
या पलीकडे जाऊन मुलीला करिअर करायचं असेल तर पारंपरिकतेच्या चौकटीला छेद देऊन स्वतर्चं अवकाश शोधावंच लागतं. ते शोधणं सोपं कसं असेल? सगळा प्रवासच मग सिंघर्षमय आणि आव्हानात्मक; पण एकदा ती चौकट मोडली की स्काय इज द लिमिट.
मागील आठवडय़ात अशाच रीतीने अचानक प्रकाशझोतात आली ती डीजे श्रेया डोणकर. अमेरिकेतील ‘टॉप 100 डीजे’ या संस्थेने जगातील टॉप 100 महिला डीजेंची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात श्रेयाचं नाव आहे. या यादीत नाव असलेली ती भारतातील एकमेव महिला डीजे आहे. या शंभर जणींतूनच नोव्हेंबरमध्ये निवडली जाणार आहे जगातील टॉप डीजे.
कोण आहे ही श्रेया?
का तिच्या डीजे होण्याचं कौतुक वाटावं?
कोल्हापुरातील आजरा या छोटय़ाशा गावात वाढलेली श्रेया. तिच्या वडिलांचं कपडय़ांचं दुकान, तर आई गृहिणी. तिचं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. त्यानंतर पालकांनी श्रेयासमोर डॉक्टर किंवा इंजिनिअर हे दोन पर्याय ठेवले होते; पण तिला या दोन्हींतही इंटरेस्ट नव्हता. पण वेगळं करिअर करायचं असेल तर चौकटीतून बाहेर पडणं गरजेचं होतं. म्हणून तिने इंजिनिअरिंग करण्याच्या गारगोटीतील मौनी विद्यापीठात मेकॅनिकल डिप्लोमामध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षानी नोकरीसाठी पुण्याला गेली. दहा तासांची नोकरी आणि दोन तासांचा प्रवास करून महिन्याला पगार मिळायचा सहा हजार
रु पये. या प्रवासात तिला सोबत होती ती गाण्यांची. कानांना हेडफोन लावून ती तासन्तास गाणी ऐकत बसायची. एखाद्या कार्यक्रमाला किंवा पार्टीला गेलं की गाणी वाजविणार्यांच्या मागे जाऊन ते गाण्यांचं मिक्सिंग कसे करतात, उपकरणे कशी वापरतात, याचं ती निरीक्षण करायची. याच दरम्यान तिला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाले, ज्यातील बहुतांश डीजे म्हणून काम करीत होते. यातून तिला या क्षेत्राची आवड निर्माण झाली.
अर्थात, आपली मुलगी डीजे होणार हे घरी कळल्यावर आईबाबांना ते मुळीच आवडलं नाही. मुलींबाबतीत नकारात्मक आणि असुरक्षित असलेल्या या क्षेत्रात आपल्या मुलीनं काम करणं त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे डीजेचा कोर्स करणं लांबच होतं. आर्थिक परिस्थितीही नव्हती; त्यामुळे मित्र-मैत्रिणींकडूनच ती अनेक गोष्टी शिकली. पुढं तिनं पालकांना विश्वासात घेतलं. कामाचं स्वरूप दाखवलं. सुरुवातीला ते नाखुश होते; पण जसजशी ती कार्यक्रम करू लागली, जगभर फिरू लागली, लोकप्रियता वाढली, तसा त्यांचा विरोध मावळला.
डीजे म्हणून करिअरबद्दल श्रेया म्हणते, ‘डीजे म्हणजे ग्लॅमर, फॅशन हे आभासी चित्र केवळ चित्रपटांमध्येच दाखवलं जातं. प्रत्यक्षात हे काम करताना तुमचं लक्ष केवळ हेडफोनमध्ये वाजणार्या गाण्यांवर असतं. कार्यक्र मात रंगत आणण्यासाठी समोरच्या मॉबची मानसिकता लक्षात घेऊन गाण्यांचे बिट्स, रिदम जुळवून ते सादर करावे लागतात. सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर असतात. तुम्ही एकाक्षणी दुर्खी असाल तरी डीजे म्हणून काम करताना हसतच राहावं लागतं. फिटनेस जपणं खूप गरजेचं असतं. एक वेळ अशी होती की, मला आईवडिलांसोबत घर सोडावं लागलं; पण ध्येय ठरवून मी स्वतर्ला कामात झोकून दिले आणि एक वर्षाने पुण्यात माझं स्वतर्चं घर आहे. मी भारतात काम केलं, दुसरीकडेही करते. देश कोणताही असो; सगळीकडे पुरु षांची महिलांकडे बघण्याची मानसिकता एकसारखीच आहे. मुलीला यश मिळू लागले की स्रीत्वाचे भांडवल होते; पण कामाप्रतिची मेहनत पाहिली जात नाही. पहाटे दोन-तीन वाजता कार्यक्रम संपतात; सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही इतकं खंबीर असले पाहिजे की या सगळ्याला पुरून उरण्याची ताकद तुमच्यात हवी. स्वतर्बद्दल तेवढा विश्वास असला पाहिजे.’
तो विश्वास एका छोटय़ा गावातील तरुणीनं कमावला म्हणून ती आज जगातल्या टॉप 100 डीजेंच्या यादीत आहे.
मनात आणलं तर आपलं आभाळ सोडूनही नवीन आभाळ शोधता येतं, ते अधिक उंच जाता येतं, याचंच हे एक रूप आहे.
डीजेच्या जगापलीकडचं मनस्वी जगण्याचं संगीत आहे.
श्रेया म्हणते,
भारतात डीजेमध्ये करिअरच्या खूप संधी आहेत; पण केवळ ग्लॅमर किंवा पैसा बघून या क्षेत्रात कधीच येऊ नका. त्यासाठी तुम्हाला गाण्यांची आवड असली पाहिजे. संगीताची जाण असली पाहिजे. मुलींना या क्षेत्रात यायचे असेल तर तुम्ही मनानं खूप स्ट्राँग असलं पाहिजे.